देशातील पहिला पारदर्शक पुल माळशेज घाटात 
जुन्नर जवळील माळशेज घाटातील निसर्ग सौंदर्याची भुरळ फक्त महाराष्ट्रच नाही तर देशभरातील पर्यटकांना पडली आहे. माळशेजचे हे सौंदर्य आता जगाच्या नकाशावर आणण्याच्या हालचाली सुरु आहेत. लवकरच माळशेज घाटात देशातला पहिला ‘पारदर्शक पूल’ (वॉक वे ) बांधण्यात येणार आहे.

माळशेज घाटातील ७०० मीटर खोल दरीवर १८ मीटर लांबीचा पारदर्शक वॉक वे बांधण्याचा प्रस्ताव ठाणे जिल्हा प्रशासनाने मांडला आहे. प्रस्ताव आणि बजेटला मंजुरी मिळाल्यास येत्या तीन वर्षांत हे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल तसं झाल्यास हा देशातील पहिला पारदर्शक पूल ठरणार.


कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर माळशेजमध्ये पर्यटन विभागाचे रिसॉर्ट आहे. त्याच्या जवळच माळशेजच्या दरीलगत दुमजली इमारत बांधण्यात येणार असून त्यावर हा पारदर्शी वॉक वे असेल. 


१८ मीटर लांबीचा यू-शेप वॉक वे बांधण्याची प्रशासनाची योजना आहे. ‘वॉक वे’ चं फ्लोरिंग पारदर्शी काचेचे राहील. या वॉक वे वरुन चालताना पर्यटकांना हवेत चालण्याचे थ्रिल अनुभवता येईल. खोल दरीचा नयनरम्य नजारा पाहता येईल आणि अर्थात डेकवर (काळजी घेऊन) फोटो काढण्याचीही मुभा देण्यात येईल.


पहिल्यांदाच भारतीय महिला मिग विमाने उडवणार
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला फायटर पायलट ‘सुपरसॉनिक फायटर जेट’ विमाने उडवणार आहेत. 


अवनी चतुर्वेदी , भावना कांत आणि मोहना सिंग अशी या महिला वैमानिकांची नावे आहेत. या तिघींनी आपले प्रशिक्षण नुकतेच यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.


अवनी आणि भावना मिग-२१ बिसन्स हे विमान उडवणार आहेत. मिग-२१ विमान हवेत उडवण्याचे प्राथमिक प्रशिक्षण दिल्यानंतर हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. 


त्यानंतरच्या टप्प्यात चंद्रप्रकाशात आणि गडद काळोखातही विमान चालवण्याचे प्रशिक्षण वैमानिकांना देण्यात येते. हे प्रशिक्षण अत्यंत खडतर असते. तसेच अवनी, भावना आणि मोहना या तिघींनी जून २०१६ पासून हे प्रशिक्षण घेतले आहे. 


इतिहासात पहिल्यांदाच महिला मिग-२१ बिसन्स हे विमान उडवणार आहेत पण, त्या महिला आहेत म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारचे झुकते माप देण्यात आले नसल्याचंही स्पष्ट करण्यात आले आहे.


तिरुवनंतपुरम येथे प्रथम आंतरराष्ट्रीय धरण सुरक्षितता परिषद आयोजित
केरळच्या तिरूवनंतपुरममध्ये प्रथम ‘आंतरराष्ट्रीय धरण सुरक्षितता परिषद’ आयोजित करण्यात आली आहे.


आंतरराष्ट्रीय धरण सुरक्षितता परिषदेला (International Conference on dam safety) २२ जानेवारी २०१७ पासून सुरुवात झाली. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या हस्ते या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.


परिषदेत मोठ्या धरणांच्या सुरक्षेसंबंधी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. परिषदेत २० हून अधिक देशांमधून ५५० प्रतिनिधींनी सहभाग घेतला.


दिल्ली उपराज्यपालांच्या हस्ते राष्ट्रीय वीरता पुरस्कार विजेत्यांचा सन्मान
उपराज्यपाल अनिल बैजल यांच्या हस्ते नवी दिल्लीत ‘राष्ट्रीय वीरता पुरस्कार २०१७’ घोषित विजेत्यांचा गौरव केला आहे.


पुरस्कार विजेत्या १८ बालकांपैकी २ मुली आणि एक मुलाला मरणोत्तर हा पुरस्कार दिला गेला आहे. १८ वीर बालकांमध्ये ७ मुली आणि ११ मुलांचा समावेश आहे.


‘भारत पुरस्कार’ :- उत्तर प्रदेशची नाजिया

‘गीता चोपडा पुरस्कार’ :- मरणोत्तर कर्नाटकची नेत्रावती एम. चावन
‘संजय चोपडा पुरस्कार’ :- कर्णवीर सिंह
‘बापु गायधनी पुरस्कार’ :– मेघालयचा बैश्वाजान पेनलांग, ओडिशाची ममता दलाई आणि केरळचा सेबेस्टियन विन्सेट


अन्य पुरस्कार विजेता :- लक्ष्मी यादव (छत्तीसगड), मनसा एन. (नागालँड), एन. शेनपांन कोनयक (नागालँड), योकनई (नागालँड), चिंगई वांगशा (नागालँड), समृद्धी सुशील शर्मा (गुजरात), जोनंटुलांगा (मिजोरम), पंकज सेमवाल (उत्तराखंड), नदाफ एजाज अब्दुल रउफ (महाराष्ट्र), पाकपम रजेश्वरी चानू (मणीपुर, मरणोत्तर), एफ. लालछांदामा (मिजोरम, मरणोत्तर) आणि पंकज कुमार महंत (ओडिशा)


राष्‍ट्रीय वीरता पुरस्कार भारतात दरवर्षी २६ जानेवारीच्या आधल्या दिवशी शौर्य दाखविणार्‍या बालकांना दिला जाणारा नागरी पुरस्कार आहे. भारतीय बाल कल्याण परिषदेने १९५७ साली या पुरस्काराची स्थापना केली. विजेत्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देखील प्रदान केली जाते. या पुरस्कारांमध्ये पुढील पाच पुरस्कारांचा समावेश आहे – भारत पुरस्‍कार (१९८७ पासून), गीता चोपडा पुरस्‍कार (१९७८ पासून), संजय चोपडा पुरस्‍कार (१९७८ पासून), बापू गायधनी पुरस्‍कार (१९८८ पासून) आणि सामान्य राष्‍ट्रीय वीरता पुरस्‍कार (१९५७ पासून).

शाहरुख खानला WEF चा क्रिस्टल पुरस्कार प्राप्त
बॉलीवुड अभिनेता शाहरुख खानला दावोसमध्ये आयोजित जागतिक आर्थिक मंच (WEF) बैठकीत क्रिस्टल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


२४ वा वार्षिक क्रिस्टल पुरस्कार भारतात बाल व महिला अधिकारांची बाजू घेण्यासाठी दिला गेला आहे. संगीतकार एल्टन जॉन आणि अभिनेत्री केट ब्लॅंचेट यांना सुद्धा क्रिस्टल पुरस्काराने सन्मानित केले गेले.


क्रिस्टल पुरस्कार जगाची परिस्थिती सुधारण्यासाठी कार्य करणार्‍या कलाकारांना दिला जातो.


भारतीय महिला संघाची नवी कर्णधार हरमनप्रीत कौर
भारतीय महिला संघाची अष्टपैलू खेळाडू हरमनप्रीत कौरकडे भारतीय महिला संघाचे नेतृत्व सोपवण्यात आलेले आहे. 


आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टी-२० मालिकेत हरमनप्रीत भारतीय महिला संघाचेचं नेतृत्व करताना दिसेल.


१३ फेब्रुवारीपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. हरमनप्रीत कौरसोबत महाराष्ट्राच्या स्मृती मंधानाकडे भारतीय संघाचे उप-कर्णधारपद सोपवण्यात आलेले आहे.


एकदिवसीय मालिकेनंतर भारतीय महिलांचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.

इंग्लंडमध्ये पार पडलेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत भारताला अंतिम फेरीत पोहचवणाऱ्या मिताली राजकडे भारताच्या वन-डे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आलेले आहे.

दावोसमध्ये जागतिक आर्थिक मंचची ४८ वी बैठक आयोजित
२२ जानेवारी २०१८ रोजी स्वित्झर्लंडच्या दावोस शहरात जागतिक आर्थिक मंच (WEF) च्या ४८ व्या वार्षिक बैठकीला सुरूवात झाली.


‘क्रिएटिंग अ शेयर्ड फ्यूचर इन अ फ्रॅक्चर्ड वर्ल्ड’ या विषयावर आधारित पाच दिवसांच्या या बैठकीत व्यापार, राजनीति, कला, शिक्षण आणि नागरी समाज या विषयांशी जुळलेल्या हितधारकांची उपस्थिती राहणार आहे.भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जवळपास २० वर्षांनंतर दावोसला जाणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. याआधी १९९७ साली एच. डी. देवेगौडा यांनी दावोसला भेट दिली होती.

जागतिक आर्थिक मंच (World Economic Forum) हे स्वित्झर्लंडमध्ये स्थित एक ना-नफा प्रतिष्ठान आहे. याचे संस्थापक क्लाउस श्वाब यांनी सन १९७१ मध्ये ‘युरोपियन मॅनेजमेंट फोरम’ या नावाने स्थापना केली. याचे मुख्यालय जिनेव्हा (स्वीत्झर्लंड) येथे आहे. ही सार्वजनिक-खासगी सहकार्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून स्विस प्रशासनाकडून मान्य करण्यात आलेली आहे.