एप्रिलमध्ये होणार चांद्रयान-२ चे प्रक्षेपण 
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो ) चांद्रयान-२ या भारताच्या महत्त्वाकांक्षी यानाचे एप्रिल महिन्यात प्रक्षेपण होईल, अशी माहिती अंतराळ विभागाचे प्रमुख जितेंद्र सिंग यांनी दिली.


भारताची ही दुसरी चांद्रमोहीम असून त्याला ८०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आजवर फारसे संशोधन न झालेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडील प्रदेशात ते उतरवण्याचे उद्दिष्ट असल्याचे इस्रोचे नवनियुक्त अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितले.

चांद्रयान-१ ने चंद्रावरील पाण्याचा शोध लावला होता. दुसरी मोहीम त्यापुढील संशोधनाच्या उद्देशाने आखली आहे. चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणासाठी एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान योग्य कालावधी आहे. एप्रिलमधील प्रक्षेपण यशस्वी झाले नाही तर नोव्हेंबरमध्ये पुन्हा प्रयत्न केला जाईल, असे सिवन म्हणाले.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणे खूप कठीण काम आहे. त्या भागात लाखो वर्षांपूर्वी तयार झालेले खडक आहेत. त्यांच्या नमुन्यांच्या अभ्यासातून विश्वाच्या उत्पत्तीचे रहस्य उकलण्यास मदत होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.निवडणुकीतील उमेदवारांना उत्पन्नाचा स्रोत जाहीर करणे बंधनकारक 
आजवर निवडणुकीचा अर्ज भरताना उमेदवारांना त्यांचे उत्पन्न जाहीर करावे लागत होते. मात्र आता तेवढय़ाने भागणार नाही. 

उमेदवारांना त्या उत्पन्नाचा स्रोतही जाहीर करावा लागेल, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. अनेक राज्यांत नजीकच्या भविष्यात होणाऱ्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर या निर्णयाला महत्त्व आहे.

तशा स्वरूपाची मागणी करणारी याचिका लोक प्रहरी या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने तिचे सरचिटणीस एस.एन. शुक्ला यांनी दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने १६ फेब्रुवारी हा निकाल दिला. त्यामुळे आता उमेदवारांना उत्पन्नाचा स्रोतही जाहीर करणे बंधनकारक ठरणार आहे. नव्या उमेदवारी अर्जामध्ये त्यासाठी वेगळा रकाना असेल.पंतप्रधानांच्या हस्ते ‘जागतिक शाश्वत विकास परिषद’चे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १६ फेब्रुवारी २०१८ रोजी नवी दिल्लीत ‘जागतिक शाश्वत विकास परिषद २०१८’ (WSDS २०१८) चे उद्घाटन करण्यात आले.

यावर्षी ‘पार्टनरशिप फॉर ए रेझीलिएंट प्लॅनेट’ या विषयाखाली परिषद भरविण्यात आली आहे. परिषदेचा समारोप १७ फेब्रुवारीला होणार.

जागतिक शाश्वत विकास परिषद (WSDS) हा ‘द एनर्जी अँड रि‍सोर्सेस इंस्‍टीट्यूट (TERI)’ चा प्रमुख मंच आहे, जो शाश्वत विकास, ऊर्जा आणि पर्यावरण क्षेत्राशी जोडलेल्या वैश्विक नेता आणि विचारवतांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो.

द एनर्जी अँड रि‍सोर्सेस इंस्‍टीट्यूट (TERI) ही नवी दिल्लीतील एक विना-नफा संशोधन संस्था आहे, जी ऊर्जा, पर्यावरण आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात संशोधन कार्य चालवते. सन १९७४ मध्ये याची स्थापना ‘टाटा एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट’ म्हणून करण्यात आली होती.


मुंबईमध्ये ‘पश्चिम लहर’ या तिहेरी सेवा सागरी सरावाचा समारोप
मुंबईमध्ये १२-१६ फेब्रुवारी या कालावधीत ‘पश्चिम लहर’ हा तिहेरी सेवा सागरी सराव आयोजित केला गेला.

भारताच्या पश्चिम किनारपट्टीलगत झालेल्या या सरावामध्ये सुमारे ४० जहाजे, पाणबुड्या, हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमानांनी भाग घेतला. भारतीय नौदल, लष्कर आणि वायुदल तसेच तटरक्षक दल यांच्यामध्ये कार्यात समन्वय राखण्यासाठी हा सराव आयोजित केला गेला होता.सायरिल रामाफोसा दक्षिण आफ्रिकेचे नवीन राष्ट्रपती
दक्षिण आफ्रिकेचे उपराष्ट्रपती सायरिल रामाफोसा यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली.

राष्ट्रपती जॅकोब जुमा यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुढील निवडणुकीपर्यंतचा त्यांचा नऊ महिन्यांच्या उर्वरित कार्यकाळासाठी अंतरिम राष्ट्रपती म्हणून रामाफोसा यांनी पद सांभाळले आहे.

दक्षिण आफ्रिका हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला असलेला एक देश आहे. केपटाउन ही देशाची राजधानी (वैधानिक) आहे. रँड हे देशाचे चलन आहे.ब्राझील व्हेनेझुएला सीमेवरती सामाजिक आणीबाणी घोषित करणार
ब्राझील सरकारने ‘सामाजिक आणीबाणीची स्थिती’ घोषित करण्याचा निर्णय घेत व्हेनेझुएलाच्या सीमेलगत सैन्य तैनात करणार आहे.

व्हेनेझुएलामधील संकटग्रस्त लोकांच्या ब्राझीलकडे वाढलेल्या स्थलांतरणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय व्हेनेझुएलाच्या सीमेवर पायाभूत सुविधांसाठी निधीची तरतूद करण्यास तसेच मानवतावादी उपाययोजना करण्यास अधिकार्‍यांना सक्षम करणार. शिवाय दुप्पट लष्करी तैनात केले जाणार.

तेल-संपन्न व्हेनेझुएलातील आर्थिक कमकुवतपणा आणि राजकीय अशांतता यामुळे ४० हजाराहून नागरिकांनी ब्राझीलच्या सीमावर्ती राज्य रोराइमाची राजधानी बोवा व्हिस्टामध्ये आश्रय घेतला.

व्हेनेझुएला हा दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागातला एक देश आहे. या देशाची राजधानी कॅराकस ही असून बोलिव्हर हे देशाचे चलन आहे. ब्राझील हा एक विशाल दक्षिण अमेरिकी देश आहे. या देशाची राजधानी ब्राझिलिया हे शहर आहे आणि ब्राझिलियन रियाल हे चलन आहे.