महाराष्ट्राचे माजी मंत्री पतंगराव कदम यांचे निधन 
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील एक हजरजबाबी व दिलखुलास व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पतंगराव कदम यांचे ९ मार्चला निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.


पतंगराव कदम महाराष्ट्राच्या राजकारणात सांगली जिल्ह्यात त्यांनी काँग्रेसचा जनाधार कायम राखला होता. राज्य मंत्रिमंडळात त्यांनी शिक्षण, वन, मदत व भूकंप पुनर्वसन, उद्योग, महसूल अशा विविध खात्यांची जबाबदारी यशस्वीपणे पेलली.

पतंगराव कदम यांचा जन्म ८ जानेवारी १९४४ रोजी सांगलीतील कडेगावातील सोनसळ या लहानशा गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी जिद्दीने शिक्षण घेतले आणि दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले ते सोनसळ गावातील पहिले विद्यार्थी होते. 

पुढे त्यांनी ‘कमवा आणि शिका’ या योजनेखाली महाविद्यालयीन, पुणे विद्यापीठातून कायद्याची पदवी व पदव्युत्तर पदवी तसेच ‘८० च्या दशकातील शैक्षणिक व्यवस्थापनातील समस्या’ या विषयावर संशोधन करून पुणे विद्यापीठातून व्यवस्थापनाची डॉक्टरेटही मिळवली. 



स्वेच्छा मरणाबाबत सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय 
स्वेच्छा मरणाबाबत सुप्रीम कोर्टाने ९ मार्च रोजी ऐतिहासिक निकाल दिला असून स्वेच्छा मरणाला सुप्रीम कोर्टाने सर्शत परवानगी दिली आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने हा निर्णय दिला.

स्वेच्छा मरणाबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाल्या होत्या. या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. स्वेच्छा मृत्यूला कोर्टाने सशर्त परवानगी दिली आहे. सुप्रीम कोर्टाने असे म्हटले आहे की, एखादी व्यक्ती जिवंतपणी असे इच्छापत्र करु शकते की ‘भविष्यात कधीही मी बरा होऊ न शकणाऱ्या कोमामध्ये गेलो तर मला कृत्रिमरित्या जगवणारी वैद्यकीय सेवा (व्हेंटिलेटर) देऊ नये.’

घटनेने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. याचाच अर्थ घटनापीठाने सन्मानाने मरण्याचाही अधिकार दिला असल्याचे ध्वनित केले आहे.

घटनापीठातील चार न्यायाधीशांनी आपले मत मांडले. परंतू पाच सदस्यीय घटनापीठाने जिवंतपणी मृत्यूपत्र करुन स्वेच्छा मरणाचा पर्याय योग्य असल्याचे नि:संदिग्धपणे सांगितले. हा निर्णय ऐतिहासिक ठरणार असून अनेक वृद्ध तसेच जराजर्जर रुग्णांसाठी महत्त्वाचा असेल.



स्वाक्षरी असलेल्या महात्मा गांधी यांच्या दुर्मिळ छायाचित्राची विक्री USD 41,806 ला 
महात्मा गांधी यांच्या स्वाक्षरी असलेल्या एका दुर्मिळ छायाचित्राला अमेरिकेत बोस्टनमधील एका लिलावात तब्बल USD 41,806 एवढी बोली लावण्यात आली.

या छायाचित्रात गांधीजी यांच्यासोबत मदन मोहन मालवीय देखील आहेत. हे छायाचित्र लंडनमध्ये सप्टेंबर १९३१ मध्ये दुसर्‍या गोलमेज परिषदेनंतर घेतले होते. 

त्यावर महात्मा गांधींनी फाउंटेन पेनने ‘एम. के. गांधी’ लिहून स्वाक्षरी केली होती. मालवीय औपचारिक रूपात तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्ष होते आणि गांधी यांच्या नेतृत्वात झालेल्या असहकार आंदोलनात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.


भारत आणि फ्रान्समध्ये १४ महत्वाचे करार 
भारत दौऱ्यावर आलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये हैदराबाद हाऊसमध्ये बैठक झाली. यावेळी दोन्ही देशांमध्ये एकूण १४ करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.

यामुळे संरक्षण, अवकाश आणि उच्च तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक वाढवणारअसल्याचे म्हटले जात आहे.

चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या मॅक्रॉन १२ मार्चपर्यंत भारतात आहेत



कॅनडाने पहिल्यांदा नोटेवर महिलेचा छापला फोटो 
कॅनडात ७२ वर्षांपूर्वी वोइला डेस्मंड यांनी वर्णभेदाविरोधात आंदोलन सुरू केले होते. मृत्यूच्या ५३ वर्षांनंतर त्यांच्या संघर्षाला नवी ओळख मिळाली.

कॅनडा बँकेने १० डॉलरची नवीन नोट जारी केली. यात डेस्मंड यांच्या रूपाने पहिल्यांदा एखाद्या महिलेचा फोटो नोटेवर घेतला आहे.

यासाठी मतदानात २६ हजार लोकांनी वोइला यांच्या फोटोसाठी मत दिले आहे.

१९४६ मध्ये वोइला यांनी कॅनडात सार्वजनिक जागी श्वेत वर्गासाठी आरक्षित असलेल्या जागेच्या नियमांविरुद्ध आवाज उठवला होता.



मॉरीशसच्या राष्ट्रपती अमीनाह गुरीब-फकीम राजीनामा देणार 
अलीकडेच करण्यात आलेल्या वित्तीय घोटाळ्यांच्या आरोपांवरून मॉरीशसचे राष्ट्रपती अमीनाह गुरीब-फकीम यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

५८ वर्षीय अमीनाह गुरीब-फकीम या आफ्रिकेमधील एकमेव महिला राष्ट्रपती आहेत. त्यांच्यावर असा आरोप लावण्यात आला आहे की, एका NGO कडून मिळालेल्या बँक कार्डचा त्यांनी वैयक्तिक खरेदीसाठी वापर केला. त्या १२ मार्चला ५० व्या स्वातंत्र्यदिनानंतर पदावरून हटणार.

फकीम आंतरराष्ट्रीय पातळीवर एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि जीवशास्त्र तज्ञ म्हणून ओळखल्या जातात. त्या २०१५ सालापासून राष्ट्रपतीपद सांभाळत आहेत.

मॉरीशस आफ्रिका खंडाच्या तटावरील दक्षिण-पूर्व क्षेत्रातला एक बेट राष्ट्र आहे. पोर्ट लुईस हे राजधानी शहर आहे आणि मॉरीशस रुपया हे चलन आहे.