लाल किल्ला येथे ‘भारत पर्व’ कार्यक्रमाचा शुभारंभ
26 जानेवारी 2019 रोजी नवी दिल्लीत लाल किल्ला येथे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेवर चौथा ‘भारत पर्व’ या वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पर्यटन मंत्रालयाचे महासंचालक सत्यजीत राजन यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले.


भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयातर्फे पाच दिवस चालणार्‍या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजनाचा मुख्य उद्देश्य म्हणजे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देणे आणि विकासात नागरिकांची भागीदारी सुनिश्चित करणे हा होय.

यामध्ये भारताची पाक संस्कृती, कला संस्कृती आणि राज्यांच्या विविधतापूर्ण संस्कृती, प्रदर्शनी आणि मेळावे अश्या कार्यक्रमांचे दर्शन घडविले जाते.



‘समानता एक्सप्रेस’: IRCTCची नवी पर्यटन एक्सप्रेस 
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, ‘समानता एक्सप्रेस’ नावाची नवी पर्यटन एक्सप्रेस आपला पहिला प्रवास नागपूर येथून दिनांक 14 एप्रिल 2019 रोजी सुरू करणार आहे.

‘समानता’ या एक्सप्रेसचे संचलन इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) करणार असून डॉ. बाबासाहेबांचे जन्मस्थान असलेल्या मध्यप्रदेशाच्या इंदोर येथील ‘महू’पासून ते भगवान गौतम बुद्धांचा जन्म झालेल्या नेपाळच्या लुंबिनीपर्यंत या एक्सप्रेसचा प्रवास होणार आहे. 

चैत्यभूमी (मुंबई), महोव (इंदौर), बोधगया (गया), सारनाथ (वाराणसी), लुंबिनी (नौटनवा), कुशीनगर (गोरखपूर), दीक्षाभूमी (नागपूर) या सर्व ठिकाणी ही ट्रेन भेट देणार आहे. त्यामुळे नागपूरपासून एक्सप्रेसचा प्रवास सुरू होणार आहे. या ट्रेनचा प्रवास नागपूर-मुंबई(दादर)-इंदोर-गया-गोरखपूर-वाराणसी-नागपूर असा असणार आहे.

या पर्यटन एक्सप्रेसचे तिकीट प्रत्येक प्रवाशामागे 11,340 रुपये इतके असणार आहे. IRCTCच्या संकेतस्थळावरून तसेच प्रवासी आरक्षण केंद्रातूनही एक्सप्रेसचे आरक्षण करता येणार आहे.

 या एक्सप्रेसचा प्रवास 12 दिवसांचा असणार असून रेल्वे, रस्तेमार्ग, बसमधून प्रेक्षणीय स्थळांना भेट, धर्मशाळांमध्ये निवास असे समानता एक्सप्रेसच्या पर्यटनाचे स्वरूप असणार आहे.



टेनिसपटू नाओमी ओसाकाने ‘ऑस्ट्रेलियन ओपन 2019’ स्पर्धेचे अजिंक्यपद जिंकले
जपानची नाओमी ओसाका हिने ‘ऑस्ट्रेलियन ओपन 2019’ या टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद जिंकले आहे.

स्पर्धेच्या महिला एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात 21 वर्षीय नाओमी ओसाकाने झेक प्रजासत्ताकच्या पेट्रा क्विटोवाचा पराभव केला. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे जेतेपद मिळवणारी ओसाका पहिली जपानी खेळाडू आहे. 

या जेतेपदासह ती WTA क्रमवारीमध्ये अव्वल स्थानावर पोहचली आहे. टेनिस एकेरीच्या अव्वल स्थानावर पोहचणारी पहिली आशियाई खेळाडू ठरली आहे. ओसाकाचे हे यूएस ओपन 2018 नंतर दुसरे ग्रँड स्लॅम आहे.


टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचने ऑस्ट्रेलियन ओपन 2019 स्पर्धा जिंकली
‘ऑस्ट्रेलियन ओपन 2019’ या टेनिस स्पर्धेत सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने स्पेनच्या राफेल नदालचा पराभव करत पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले आहे.

या विजयासह नोव्हाक जोकोव्हिचने रॉजर फेडरर आणि रॉय इमर्सन यांना मागे टाकत सातव्यांदा ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केला आहे.



‘2019 विश्व पॅरा-जलतरण’ स्पर्धेच्या यजमानपदाचा अधिकार मलेशियाकडून काढून घेतला
आंतरराष्ट्रीय पॅरालंपीक समितीने (IPC) ‘2019 विश्व पॅरा-स्विमिंग अजिंक्यपद’ स्पर्धेच्या यजमानपदाचा अधिकार मलेशियाकडून काढून घेतला आहे.

29 जुलै ते 4 ऑगस्ट 2019 या कालावधीत कुचिंग या शहरात होणे नियोजित होते. यामध्ये 60 राष्ट्रांमधून सुमारे 600 जलतरणपटू भाग घेणार आहेत. टोकियो (जपान) येथे 2020 मध्ये पॅरालंपीक खेळांचे आयोजन होणार आहे.

IPCने निश्चित केलेल्या शिष्टाचाराचे पूर्ण अनुपालन आणि संबंधित व्हिसाची तरतूद पूर्ण करणे आवश्यक आहे. परंतु स्पर्धेत इस्राएलच्या पॅरा-जलतरणपटूंना भाग घेण्यापासून न रोखण्याची, भेदभाव न करण्याची आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्याची आवश्यक हमी प्रदान करण्यास मलेशिया सरकार अपयशी ठरले. त्यामुळे IPCने हा निर्णय घेतला.



‘नारी शक्ती’: ऑक्सफोर्ड डिक्शनरीने निवडलेला 2018 सालचा हिंदी शब्द
ऑक्सफर्ड डिक्शनरीने 2018 सालचा हिंदी शब्द म्हणून ‘नारी शक्ती’ या शब्दाची निवड केली आहे.

जयपूरच्या साहीत्य महोत्सवात याची घोषणा करण्यात आली. ऑक्सफर्ड डिक्शनरीनुसार ‘नारी शक्ती’ हा संस्कृत शब्द आहे आणि आताच्या आधुनिक युगात स्वत:च्या हिमतीने जगत असलेल्या महिलांना उद्देशून हा शब्द आहे. ऑक्सफर्डने 2017 सालापासून ही योजना अंमलात आणली आहे.