जागतिक पर्यटन दिन: 27 सप्टेंबर

दरवर्षी 27 सप्टेंबर या दिवशी जगभरात ‘जागतिक पर्यटन दिन’ साजरा करतात.

जगभरात पर्यटन क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने 1980 सालापासून संयुक्त राष्ट्रसंघ महासभेच्या पुढाकाराने हा दिवस पाळला जात आहे.

यावर्षी म्हणजेच 2020 साली पर्यटन दिन “पर्यटन आणि ग्रामीण विकास” या संकल्पनेखाली साजरा करण्यात आला.

वर्ष 1970 च्या 27 सप्टेंबर या तारखेला संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक पर्यटन संघटनेचे (UNWTO) संविधान स्वीकारण्यात आले होते.

या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ 27 सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक पर्यटन दिन’ म्हणून पाळण्याची घोषणा करण्यात आली होती. “निळा” हा जागतिक पर्यटन दिनाचा रंग आहे.

भारत-डेन्मार्क यांच्यातली हरित धोरणात्मक भागीदारी

डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट्टे फ्रेडरिक्सन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 सप्टेंबर 2020 रोजी भारत आणि डेन्मार्क दरम्यान आभासी शिखर परिषदेचे सह-अध्यक्षपद भूषवले.

पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान फ्रेडरिक्सन यांनी द्विपक्षीय संबंधांबाबत मैत्रीपूर्ण वातावरणात विचारांचे आदानप्रदान केले.

कोविड-19 महामारी आणि हवामानातले बदल आणि हरित परिवर्तन यासारख्या जागतिक मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. शाश्वत अर्थव्यवस्था आणि संस्थांना गतिमान करण्याबाबत यावेळी सहमती झाली.

डेन्मार्क हा उत्तर युरोप व स्कॅंडिनेव्हियातला एक देश आहे.

डेन्मार्कच्या मुख्य भूमिच्या दक्षिणेला जर्मनी, ईशान्येला स्वीडन व उत्तरेला नॉर्वे आहे. डेन्मार्कला उत्तर समुद्र व बाल्टिक समुद्रांचा किनारा आहे.

कोपनहेगन ही डेन्मार्कची राजधानी आहे. आणि डॅनिश क्रोन हे राष्ट्रीय चलन आहे.

महाराष्ट्रात सुटी सिगारेट किंवा बिडी विकायला बंदी

महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने एक आदेश काढत राज्यात कुठेही सुटी सिगारेट किंवा बिडी विकायला बंदी घातली आहे.

‘सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादन अधिनियम-2003’ ( जाहिरात, प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) याच्यानुसार सिगारेटच्या पाकिटाच्या 85 टक्के भागावर सिगारेट वा बिडी आरोग्याला घातक असल्याचा संदेश असावे बंधनकारक करण्यात आले होते.

त्यामुळे सिगारेट हे आरोग्याला धोक्याचे असल्याचा संदेश दिला गेला.

परंतु, सिगारेटच्या पाकिटातून सिगारेटची आणि बिडीची एकेक विक्री केली जात आहे आणि त्यामुळे आरोग्याचा संदेश पोहचविण्याला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे निर्णय घेण्यात आला.

‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया’ने कार्यालय बंद केले

केंद्र सरकारकडून सतत दबाव आणला जात असून संघटनेला मिळणारी कायदेशीर आर्थिक मदतही रोखली गेल्याने मानवी हक्कांसाठी लढणारी जगातली एक प्रतिष्ठित संघटना असणाऱ्या ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ने भारतातले आपले कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या अनेक वर्षांत ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया’ने भारतातल्या मानवी हक्कांच्या गळचेपीची अनेक प्रकरणे जगापुढे आणली होती.

अटल बोगदा: महामार्गावरचा जगातला सर्वाधिक दीर्घ बोगदा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रोहतांग येथे 3 ऑक्टोबर 2020 रोजी अटल बोगद्याचे उद्घाटन होणार आहे.

तो 9.02 किलोमीटर लांबीचा महामार्गावरचा जगातला सर्वाधिक दीर्घ बोगदा आहे.

आठ मीटर रूंदीचा दुपदरी मार्ग त्यामध्ये तयार केला गेला आहे. बोगद्याची उंची 5.525 मीटर ठेवण्यात आली आहे.

बोगद्याची एकूण रूंदी 10.5 मीटर असून त्यामध्ये 3.6 गुणिले 2.25 मीटरचा आपत्तीकाळासाठी अग्निरोधक बोगदा मार्ग तयार करण्यात आला आहे.

प्रतिदिनी 3000 गाड्या आणि 1500 मालमोटारी ताशी 80 किलोमीटर गतीने या बोगद्यातून वाहतूक करू शकणार, अशा पद्धतीने तो तयार करण्यात आला आहे.

या बोगद्यामध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रोमेकॅनिल प्रणाली तसेच हवा खेळती राहण्यासाठी सर्व व्यवस्था, SCADA नियंत्रक अग्निरोधक प्रणाली बसविण्यात आली आहे.

सुरक्षा व्यवस्थेमध्ये, प्रत्येक 150 मीटरवर संपर्क यंत्रणा, प्रत्येक 60 मीटरवर अग्निशमन यंत्रणा, प्रत्येक 250 मीटरवर CCTV, स्वयंचलित घटना शोध प्रणाली, प्रत्येक एक किलोमीटरवर बोगद्यामधल्या हवेची गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा, प्रत्येक 50 मीटरवर अग्निशमनासाठी सुविधा, प्रत्येक 60 मीटरवर कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

हा बोगदा मनाली ते लाहौल-स्पिती या शहरांना जोडतो. लाहौल स्पितीच्या संपूर्ण खोऱ्यात हा बोगदा तयार करण्यात आला आहे.

या भागामध्ये होणाऱ्या हिमवर्षावामुळे लाहौल स्पितीच्या पुढच्या भूप्रदेशाला जवळपास सहा महिने उर्वरित देशाबरोबर संपर्क साधणे शक्य होत नव्हते.

हिमालयी पर्वतरांगांमध्ये समुद्र सपाटीपासून 3000 मिटर (10,000 फूट) उंचीवर असलेल्या पिर पंजाल येथे हा बोगदा तयार करण्यात आला आहे.

या बोगद्यामुळे मनाली ते लेह या शहरांमधले 46 किलोमीटरचे अंतर कमी झाले आहे.

अतिउंचीवरच्या डोंगराळ भागामुळे अवघे 46 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनांना 4 ते 5 तासांचा कालावधी लागत होता.

सीमा मार्ग संघटनेच्यावतीने (BRO) हा अतिउंचीवरचा डोंगराळ भौगोलिक प्रदेशामध्ये बोगदा तयार करण्यात आला.

स्वदेशी ‘बूस्टर’ अंतर्भूत असलेल्या ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या सुपरसॉनिक ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची 30 सप्टेंबर 2020 रोजी ओडिशाच्या बालासोर येथून यशस्वी चाचणी घेण्यात आली.

स्वदेशी ‘बूस्टर’ आणि एअरफ्रेम सेक्शन असणारे ब्रह्मोस क्षेपणास्त्र इतर अनेक स्वदेशी उप-यंत्रणांनी युक्त आहे.

ब्रह्मोस लँड-अटॅक क्रूझ क्षेपणास्त्राचा (LACM) कमाल वेग मॅक 2.8 होता.

“बोंगोसागर”: भारतीय नौदल आणि बांगलादेश नौदल यांची संयुक्त सागरी कवायत

भारतीय नौदल आणि बांगलादेश नौदल यांनी “बोंगोसागर” नामक संयुक्त सागरी कवायत आयोजित केली.

3 ऑक्टोबर 2020 पासून तीन दिवस हा युद्धसराव चालणार आहे. यंदा या कवायतीचे हे दुसरे वर्ष आहे.

दोन्ही देशांच्या नौदलांची ही संयुक्त कवायत बंगालच्या उपसागरात आयोजित करण्यात आली.

दरम्यान दोन्ही देश संयुक्तपणे गस्त घालून परस्परांच्या सागरी सीमेचे रक्षण करणे तसेच गस्त घालताना सतत एकमेकांशी समन्वय ठेवणे या मोहिमा पार पाडणार.

भारताकडून कवायतीसाठी INS किल्टन ही पाणबुडीविरोधी युद्धनौका आणि INS खुकरी ही अचूक क्षेपणास्त्र हल्ले करणारी युद्धनौका सहभागी झाली.

भारताच्या ‘सागर’ (Security And Growth for All in the Region – SAGAR) नामक दृष्टीकोनाच्या पार्श्वभूमीवर शेजारी देशांसोबत समन्वय राखण्यासाठी, एकमेकांना सहकार्य करण्यासाठी ‘बोंगोसागर’ कवायत केली जात.

स्वदेशी बनावटीच्या ‘शौर्य’ हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

4 ऑक्टोबर 2020 रोजी ओडिशा राज्यातल्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम चाचणी स्थळावरून अण्वस्त्रांचा मारा करण्याची क्षमता असलेल्या स्वदेशी बनावटीच्या ‘शौर्य’ हायपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. ही चाचणी संरक्षण संशोधन व विकास संस्थेनी घेतली.

अर्मेनिया-अझरबैजान युद्ध

अर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यातला दशकांपासून सुरू असलेला सीमावाद 27 सप्टेंबर 2020 रोजी पुन्हा एकदा उफाळून आला.

दोनही देश वादग्रस्त नागोर्नो-काराबाखच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत.

नागोर्नो-काराबाख हा 4,000 किलोमीटरवर पसरलेला डोंगराळ प्रदेश आहे.

तिथे अर्मेनियातले ख्रिश्चन आणि मुस्लीम तुर्क राहतात.

सोव्हियत संघादरम्यान ते अझरबैजानमधले एक स्वायत्त क्षेत्र होते.

आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या परिसराला अझरबैजानचा भाग समजले जाते. परंतु, तिथे बहुतांश अर्मेनियाचे नागरिक राहतात.

1980च्या दशकाच्या शेवटापासून ते 1990च्या दशकापर्यंत चाललेल्या युद्धात 30 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि 10 लक्षाहून अधिक लोकांचे स्थलांतर झाले.

त्यादरम्यान फुटीरवादी गटांनी नागोर्नो-काराबाखच्या काही भागांवर ताबा मिळवला होता.

परंतु, 1994 सालामधल्या युद्ध विरामानंतरही तिथे सातत्याने संघर्ष चालू आहेत.

अर्मेनिया आणि अझरबैजान ही आशिया खंडातली शेजारी-शेजारी राष्ट्रे आहेत.

दोन्ही देश एकेकाळी सोवियत संघाचे भाग होते. दोन्ही देश यूरोपच्या अगदी जवळ आहेत.

दोन्ही देश सोवियत संघाचे भाग होते. 1980च्या दशकात जेव्हा सोवियत संघाचे पतन झाले, तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये वाद सुरु झाला. नागोर्नो-काराबाख या भागावरुन उभय देशांमध्ये वाद आहे.

हा भाग अर्मेनिया आणि अझरबैजानच्या सीमेवर आहे. 1991 साली दोन्ही देशांमध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली होती. तीन वर्षांच्या संघर्षानंतर रशियाने हस्तक्षेप केल्याने 1994 साली युद्धविराम देण्यात आला होता.

आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार हा भाग अजरबैजानचा आहे, परंतु त्यावर अर्मेनियातल्या टोळ्यांचा ताबा आहे. त्यामुळे आर्मेनियन सैन्याने हा भाग आपल्या ताब्यात ठेवला आहे. या भागात नेहमीच तणावाची स्थिती राहिली आहे.