गुगलचे नवीन मेसेजिंग ऍप 

०१. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक मेसेंजर, टेलिग्राम, हाइक यांसारख्या संदेशवहन अ‍ॅपच्या स्पध्रेत आता गुगलने ‘अलो’ नावाचे संदेशवहन अ‍ॅप आणले आहे. 


०२. इतर संदेशवहन अ‍ॅपच्या तुलनेत हे अ‍ॅप अधिक स्मार्ट असून यामध्ये ‘गुगल साहाय्यक’ (गुगल असिस्टंट) आपल्या सोबत देण्यात आला असून आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरे हा साहाय्यक देऊ शकणार आहे. इतकेच नव्हे तर विचारलेल्या प्रश्नांची काही संभाव्य उत्तरेही यामध्ये देण्यात आली असून यामुळे ही उत्तरे टाइप करण्याचा वेळ वाचू शकणार आहे.


७ रेसकोर्स
०१. देशाच्या पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या ‘रेसकोर्स रोड’चे बुधवारी नवी दिल्ली महानगरपालिकेकडून नामांतर करण्यात आले. ‘रेसकोर्स रोड’चे ‘लोककल्याण मार्ग’ असे नामांतर करण्यात आले आहे. त्यामुळे पंतप्रधानांचे निवासस्थान आता ‘७ लोककल्याण मार्ग’ या नावाने ओळखले जाईल.

०२. ‘७ लोककल्याण मार्ग’ या पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी एकूण पाच बंगले आहेत. हा संपूर्ण परिसर १२ एकरांमध्ये पसरलेला आहे. यामध्ये १, ३, ५, ७ आणि ९ अशा क्रमांकाचे बंगले आहेत.

०३. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः ५ क्रमांकाच्या बंगल्यामध्ये वास्तव्याला आहेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे या क्रमांकाच्या बंगल्याचा वापर अधिकृत कार्यालय म्हणून करत होते.

०४. बंगला क्रमांक एकचा वापर हा सर्वसाधारणपणे हेलिपॅडच्या स्वरुपात केला जातो. तर सात क्रमांकाच्या बंगल्याचा वापर पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या ‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप’च्या जवानांच्या निवासासाठी केला जातो. यापैकी एका बंगल्यामध्ये पंतप्रधानांचे कार्यालयही असून, तेथे नरेंद्र मोदी हे विविध पाहुण्यांना आणि शिष्टमंडळांना भेटत असतात.

०५. माजी पंतप्रधान राजीव गांधी हे ‘७ रेसकोर्स रोड’वर राहणारे पहिले पंतप्रधान होते. १९८४ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ते आपल्या कुटुंबीयांसमवेत या बंगल्यामध्ये वास्तव्याला होते.

०६. माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांनी ‘७ रेसकोर्स रोड’ या बंगल्याला पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान म्हणून घोषित केले. त्यापूर्वीचे पंतप्रधान हे संसदेकडून दिल्या जाणाऱ्या बंगल्यांमध्ये राहात असत. इंदिरा गांधी या पंतप्रधानपदी असताना १, सफदरजंग रोड या निवासस्थानी राहात होत्या.

०७. पंतप्रधानांचे अधिकृत कार्यालय ज्याला पीएमओ असेही म्हणतात ते रायसीना हिल्सवरील साऊथ ब्लॉकमध्ये आहे.




नवतेज सरना भारताचे अमेरिकेतील नवीन राजदूत
०१. ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त नवतेज सरना यांची अमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे.  भारताचे अमेरिकेतील राजदूत अरुण सिंग हे निवृत्त होत असून, सरना हे लवकरच त्यांची जागा घेतील.

०२. भारतीय परराष्ट्र सेवेचे (आयएफएस) १९८० च्या बॅचचे असलेल्या सरना यांनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणून बराच काळ काम केले आहे.  सरना यांनी २००८ ते २०१२ या काळात इस्राईलमध्ये भारताचे राजदूत म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.  परराष्ट्र मंत्रालयात विविध देशांसाठी अतिरिक्त सचिव म्हणून काम पाहत होते. 

०३. श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त यश सिन्हा यांच्या जागी तरणजितसिंग सिद्धू यांची नियुक्ती झाली आहे.



कुलाबा वेधशाळेस १७५  पूर्ण
०१. अलिबाग येथील कुलाबा भूचुंबकीय वेधशाळा बुधवारी १७५ वर्षांची झाली आहे. भूचुंबकीय शक्तीचा आणि हालचालीचा वेध घेण्याचे काम इथे अव्याहतपणे केले जात आहे. भूगर्भ आणि हवामानातील चुंबकीय लहरींचे अतिसूक्ष्म नोंदीचे संकलन या ठिकाणी उपलब्ध आहे. 

०२. जगभरातील चार सर्वात जुन्या चुंबकीय वेधशाळांमध्ये या वेधशाळेचा समावेश असून जागतिक पातळीवर भूगर्भ शास्त्रज्ञ, भूभौतिक शास्त्रज्ञ आणि खगोल अभ्यासकांकडून कुलाबा वेधशाळेच्या नोंदींना खूप महत्त्व असते.

०३. ब्रिटिशांनी १८४१ साली मुंबईतील कुलाबा येथे कुलाबा वेधशाळेची स्थापना केली. मुंबई बंदरातील खगोलीय घटनांचा अभ्यास करण्यासाठी या वेधशाळेची स्थापना करण्यात आली. रॉयल सोसायटी ऑफ लंडन यांच्या शिफारसीनुसार भूचुंबकीय क्षेत्राचे नियमित मापन सुरू करण्यात आले. 

०४. १८४६ पासून दर तासाला सुसंगतपणे भूचुंबकीय लहरींच्या नोंदी ठेवण्यास सुरुवात झाली. मॅग्नेटोग्राफच्या साह्य़ाने फोटोग्राफीक पद्धतीने या नोंदी ठेवल्या जाऊ लागल्या. 

०५. १८९६ च्या सुमारास डॉ. नानाभॉय आर्देशर फार्मजी मुस यांनी कुलाबा वेधशाळेची धुरा सांभाळली. 

०६. त्याकाळात मुंबईत वाहतुकीसाठी घोडय़ावर चालणाऱ्या ट्राम्स वापरल्या जात असत. मात्र १९०० सालच्या सुमारास मुंबईतील ट्राम्सचे विद्युतीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे भूचुंबकीय नोंदीच्या संकलनात अडथळे निर्माण होणार होते. त्यामुळे कुलाबा येथील वेधशाळा स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

०७. अलिबाग येथील समुद्र किनाऱ्यावरील सात एकरची जागा निवडण्यात आली. चुंबकीय परिणामांपासून मुक्त अशा दोन इमारती येथे बांधल्या गेल्या. पोरबंदर येथील दगड, वाळू आणि तांब्यापितळाच्या वस्तूंचा वापर करून या ठिकाणी इमारतींचे बांधकाम करण्यात आले. 

०८. बाहेरील तापमानाचा परिणाम न होणाऱ्या एका इमारतीत मॅग्मोमीटर बसवण्यात आले. तर दुसऱ्या इमारतीत भूचुंबकीय क्षेत्रातील विविध घटकांचे निरपेक्ष मापन सुरु झाले. १९०४ साली अलिबाग येथील कुलाबा वेध शाळेतून भुचुंबकीय लहरीचे मापन सुरू झाले. ते आजही अव्याहतपणे सुरू आहे.

०९. भूचुंबकीय घडामोडींचे अचूक आणि संकलन या ठिकाणी जनरल्सच्या स्वरूपात संकलित आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि रशिया येथील वेधशाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्याकाळात फक्त अलिबाग येथील वेधशाळा कार्यरत होती. त्यामुळे गेल्या पावणे दोनशे वर्षांतील भूचुंबकीय हालचालींचे अविरत संकलन असणारी ही जगातील एकमेव वेधशाळा असल्याचे सांगितले जाते.

१०. काळानुसार गरज लक्षात घेऊन चुंबकीय वेधशाळेत बदल होत गेले. १९९७ सालापासून इंटरमॅग्नेट या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाची गरज म्हणून १ मिनट इतक्या सुक्ष्म कालावधीत होणाऱ्या भुचुंबकीय बदलांची नोंद ठेवण्यास सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर या नोंदी पाठवल्या जात आहेत. 



मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
०१. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा फोर्ब्जच्या देशातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीमध्ये सलग ९व्यांदा  पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळवले आहे. यंदाच्या यादीचे वैशिष्ट म्हणजे पतंजली आयुर्वेदाचे सहसंस्थापक आचार्य बाळकृष्ण यांनीही या यादीमध्ये स्थान मिळवले आहे. 

०२. यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेले मुकेश अंबानी यांच्याकडे भारतातील सर्वाधिक २२.७ अब्ज डॉलरची संपत्ती आहे. त्यांच्यानंतर यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर सन फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीजचे दिलीप संघवी यांचा क्रमांक लागला आहे. संघवी यांच्याकडे १६.९ अब्ज डॉलरची संपत्ती असल्याचे फोर्ब्सने म्हटले आहे. भारतातील यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर हिंदूजा बंधुंचा समावेश आहे. त्यांच्याकडे एकूण १५.२ अब्ज डॉलरची संपत्ती आहे.

०३. पतंजलीमध्ये सहसंस्थापक असलेले आचार्य बाळकृष्ण यांच्या नावावर २.५ अब्ज डॉलरची संपत्ती असल्याचे फोर्ब्सने म्हटले आहे. यादीमध्ये आचार्य बाळकृष्ण यांचा ४८ वा क्रमांक आहे. त्यांच्याकडील एकूण उत्पन्नापैकी सर्वाधिक ९७ टक्के ग्राहकोपयोगी वस्तूंच्या विक्रीतूनच मिळाले असल्याची माहिती पुढे आली आहे.

०४. यादीमध्ये याआधी तिसऱ्या क्रमांकवर असलेले अझीम प्रेमजी आता चौथ्या क्रमांकावर गेले आहेत. त्यांची संपत्ती १५ अब्ज डॉलर असल्याचे फोर्ब्सने म्हटले आहे.



मुंबईत राष्ट्रकुल संसदीय मंडळाची बैठक
०१. राष्ट्रकूल संसदीय मंडळाची सहावी परिषद २० ते २३ जानेवारी या कालावधीत होणार असून या परिषदेस राज्यसभेचे सभापती, लोकसभा अध्यक्ष तसेच देशातील विविध राज्यांच्या विधिमंडळ पीठासीन अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

०२. परिषदेच्या तयारीसंदर्भात विधिमंडळात उच्चस्तरीय बैठक झाली. सर्व राज्यांचे विधिमंडळाचे पीठासीन अधिकारी व प्रधान सचिव आदी सुमारे साडेतीनशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. 



‘विसानाराई’ हा तामिळ चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत
०१. ‘विसारानाइ’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या तामिळ चित्रपटाचे नाव पुढील वर्षीच्या ऑस्कर महोत्सवातील विदेशी भाषिक चित्रपटांच्या श्रेणीत भारताच्या अधिकृत प्रवेशिकेच्या स्वरूपात पाठवण्यात आले आहे. 

०२. या श्रेणीत स्पर्धेत असलेल्या २९ चित्रपटांमधून ‘विसारानाइ’ची निवड करण्यात आल्याचे भारतीय चित्रपट महासंघाचे (फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया) सरचिटणीस सुप्रान सेन यांनी सांगितले. 

०३. या वर्षी झालेल्या ६३व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट तामिळ फीचर फिल्म, सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट संकलन, असे तीन पुरस्कार त्याने पटकावले होते.

०४. अभिनेते व चित्रपट निर्माते धनुष यांनी तयार केलेला हा गुन्हे- थरारपट वेत्रिमारन यांनी दिग्दर्शित केला असून त्यांनीच पटकथा लिहिली आहे. एम. चंद्रकुमार यांच्या ‘लॉक अप’ कादंबरीवर तो आधारित आहे. दिनेश रवी, आनंदी व आदुकलम मुरुगदोस यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात पोलिसांचे अत्याचार, भ्रष्टाचार आणि अन्यायामुळे निर्दोष लोकांचे जाणारे बळी यांचा ऊहापोह करण्यात आला आहे.




जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांत ‘आयआयएससी’ची झेप
०१. जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीमध्ये भारतीय विज्ञान संस्थेने (आयआयएससी) आतापर्यंतचा सर्वोत्तम क्रमांक पटकाविला आहे. टाइम्स हायर एज्युकेशन(‘द’) या संस्थेने ही यादी सर्वेक्षणानंतर प्रसिद्ध केली आहे. 

०२. भारतीय विज्ञान संस्थेने जागतिक क्रमवारीत २०१ ते २५० या गटात स्थान मिळविले आहे. सत्तर देशांमधील ९८० विद्यापीठांमध्ये भारतातील केवळ ३१ विद्यापीठांना स्थान मिळविता आले आहे. 

०३. ऑक्‍सफर्ड विद्यापीठ या क्रमवारीत पहिल्या स्थानावर असून, मागील बारा वर्षांत प्रथमच ब्रिटनमधील विद्यापीठाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. 

०४. भारतातील ३१ संस्थांपैकी सात संस्था या आयआयटी असून, आयआयटी मुंबई यात आघाडीवर (३५१ ते ४००) आहे. याशिवाय दिल्ली, कानपूर, मद्रास, खरगपूर, रुरकी आणि गुवाहाटी हे आयआयटीदेखील यादीत आहेत. याशिवाय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (रुरकेला), श्री वेंकटेश्‍वर विद्यापीठ, टाटा मूलभूत संशोधन संस्था आणि तेजपूर विद्यापीठ या चार संस्था यादीत स्थान मिळविण्यात प्रथमच यशस्वी झाल्या आहेत.

०५. ‘द’च्या यादीत पहिल्या दहा क्रमांकांवर अमेरिका आणि ब्रिटनमधील विद्यापीठांचेच वर्चस्व आहे. ऑक्‍सफर्डशिवाय केंब्रिज आणि इम्पेरिअल कॉलेज ऑफ लंडन या संस्था पहिल्या दहामध्ये आहेत. उर्वरित सात संस्था अमेरिकेतील आहेत.