विदेशी तंत्रज्ञानाने शुद्ध देशी गाईची निर्मिती
०१. शुद्ध देशी गाईंची निर्मिती करण्याकरिता विदेशात नव्याने वापरले जाणारे भ्रूण प्रत्यारोपणाचे (एम्ब्रिओ ट्रान्स्फर) हे तंत्र आता वापरले जाणार आहे. त्यामुळे भारतीय गोवंशाच्या आनुवंशिक सुधारणेत मोठी क्रांती भविष्यात होऊन चांगल्या प्रतीचे दूध ग्राहकांना मिळू शकेल.


०२. रामदेवबाबा यांचा पतंजली उद्योगसमूह व उद्योगपती विजयपत सिंघानिया यांच्या जे.के. ट्रस्टने देशी गाईमध्ये विदेशी तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला आहे. भ्रूण प्रत्यारोपण किंवा प्रयोगशाळेतील गर्भधारणा (आयव्हीएफ) याचा वापर अमेरिका, इस्रायल व ब्राझिलसारख्या देशांत केले जाते. 

०३. स्वातंत्र्यापूर्वी देशातून शुद्ध गीर गाई विदेशात नेण्यात आल्या. याच गाई ब्राझिलमध्ये एका वेतात ४० ते ५० हजार लिटर दूध देतात. पण आपल्या गीर गाई दोन ते अडीच हजार लिटर दूध देतात. त्यात आनुवंशिक सुधारणा केल्याने अधिक दूध मिळू शकेल. 



लिंगनिदानासंबंधित माहिती हटवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
०१. सर्व माहिती शोधून देणाऱ्या गुगल, याहू आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या सर्च इंजिन्सनी जन्मापूर्वी भ्रूणाची लिंगनिश्चिती करणाऱ्या जाहिराती तसेच इतर माहिती ३६ तासांत हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असून, या वेबसाइटवर देखरेख ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एका नोडल संस्थेची स्थापना करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

०२. नोडल संस्था या इंजिन्सवर लक्ष ठेवून असेल. गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि याहू या वेबसाइटने भ्रूणाचा लिंग स्पष्ट करणाऱ्या जाहिराती टाकल्यास त्या ३६ तासांच्या आतमध्ये त्यांना हटविण्यासाठी सांगण्यात येईल, असे खंडपीठाने आदेश देताना म्हटले आहे. 

०३. सतत मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी होण्यावर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे.



अंटार्क्टिकावरील उल्कापाषाणांचा शोध पुन्हा सुरू
०१. नासाने अंटार्क्टिकावरील उल्कापाषाणांचा शोध पुन्हा सुरू केला असून त्यामुळे सौरमालेतील पूर्वीच्या निर्माण घटकांचा अभ्यास शक्य होणार आहे. मंगळ व चंद्र यांच्याबाबतच्या अनेक प्रश्नांना यातून उत्तरे मिळणार आहेत. 


०२. नासाच्या नॅशनल सायन्स फाउंडेशन व स्मिथसॉनियन इन्स्टिटय़ूशन या संस्थांनी अलीकडेच अंटार्क्टिकातील उल्कापाषाणांचे संशोधन करण्याचा भागीदारी करार केला असून त्याला अंटार्क्टिक सर्च फॉर मीटिऑराइट्स प्रोग्रॅम असे नाव देण्यात आले आहे. नवीन करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्यामुळे आता १९८० च्या जुन्या कराराची जागा नवीन करार घेणार आहे.

०३. अमेरिकेने 
अंटार्क्टिकातील उल्कापाषाणांचा अभ्यास १९७६ मध्ये अ‍ॅन्समेट या कार्यक्रमात सुरू केला. त्यात २३ हजार उल्कापाषाण जमवण्यात आले व नंतर हे नमुना उल्कापाषाण संख्यने वाढत गेले. 

०४. चंद्र, मंगळ, लघुग्रह यांचा अभ्यास यातून शक्य होणार आहे. पहिले उल्कापाषाण शोधले गेले ते चंद्र व मंगळावरून आलेले होते. एएलएच ८४००१ हा मंगळावरील उल्कापाषाण आहे त्यामुळे १९९० मध्ये मंगळ संशोधनाला प्रेरणा मिळाली होती.

०५. उल्कापाषाण हे अवकाशातून पृथ्वीवर येत असलेले नैसर्गिक घटक असून ते पृथ्वीवर पडल्यानंतर गोळा करता येतात. 
अंटार्क्टिकातील पर्यावरण उल्कापाषाण गोळा करण्यास अनुकूल आहे कारण तेथे थंड वाळवंट आहे. असे मानले जाते तेथे उल्कापाषाण बराच काळ चांगल्या स्थितीत टिकून राहतात. 

०६. जास्त उल्कापाषाण हे लघुग्रहापासून येत असतात, लघुग्रह हे ग्रहांच्या निर्मितीनंतरचे अवशेष आहेत.



चीनचा महासंगणक जगात पहिल्या क्रमांकावर
०१. चीनने लागोपाठ आठव्या वर्षी वेगवान महासंगणकाचा मान पटकावला आहे, त्यांचा सनवे ‘तियानहू लाइट’ हा महासंगणक जगात पहिला आला. त्याचा गणनाचा वेग सेकंदाला ९३ दशलक्ष अब्ज आकडेमोडी इतका आहे. तियानहू लाइट हा संगणक मोठा असून त्याचे प्रोसेसर हे चीनमध्ये तयार करण्यात आले आहेत.

०२. अर्धवार्षिक टॉप ५०० यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. त्यात महासंगणकांमध्ये चीनने बाजी मारली आहे. 

०३. तियानहू लाइट या महासंगणकाचे प्रदर्शन जूनमध्येच झाले होते व त्याने मागचा विजेता तियानहे २ ला मागे टाकले होते. तो संगणकही चीनचाच होता पण त्यात इंटेलच्या चीप आहेत. तियानहे २ पेक्षा तो तीनपट वेगवान आहे.



चायना सुपर सीरिज
०१. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेती पी.व्ही.सिंधू हिने चायना सुपर सीरिज स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. सिंधूने चीनच्या तैपेईच्या शिआ सिन ली हिचा २१-१२, २१-१६ असा सरळ सेटमध्ये अवघ्या ३४ मिनिटांमध्ये पराभव केला. पुढील फेरीत सिंधूचा सामना अमेरिकेच्या बीवेन झॅन्ग हिच्याशी होणार आहे.

०२. दुसऱ्या बाजूला भारताची फुलराणी सायना नेहवाल हिचा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये पुनरागमनाचा प्रयत्न अयशस्वी ठरला. सायनाला सलामीच्याच सामन्यात पराभवाचा धक्का बसला आहे. थायलंडच्या पर्णतिपने सायनाला २१-१६, १९-२१, २१-१४ अशा सेटमध्ये पराभवाची धूळ चारली. 

०३. गुडघ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे तिला तीन महिने सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. बंगळुरूत प्रशिक्षक विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केल्यानंतर सायना पुनरागमनासाठी उत्सुक होती. पण पहिल्याच फेरीत पराभव स्विकारावा लागल्याने आता तिला हाँगकाँग सुपर सीरिजची वाट पाहावी लागणार आहे.



रंग न जाणारी दोन हजारची नोट बनावट – अर्थसचिव
०१. दोन हजार रुपयांच्या नोटेचा रंग जात असल्याने तिच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. मात्र केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी मात्र नोटांचा रंग जाण्यात चुकीचे काहीच नसल्याचे स्पष्ट केले. दोन हजारच्या नोटेचा रंग गेला नाही तर ती बनावट नोट समजावी असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


०२. दोन हजारच्या नोटसाठी इंटेक्विओ शाई वापरण्यात आली आहे. या शाईचा गुणधर्मच तसा असतो. म्हणून त्यांचा रंग जात असतो. पण समजा त्या नोटेचा रंग जात नसेल तर ती बनावट असल्याचे समजावे असे त्यांनी सांगितले. जुन्या शंभर, पाचशेच्या नोटांमध्येही हीच शाई वापरली जात होती असे त्यांनी नमूद केले.



इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर ५ वर्षांची बंदी
०१. मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईकयांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन संस्थेवर केंद्र सरकारने पाच वर्षांची बंदी घातली आहे. मंगळवारी रात्री झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बेकायदा कृत्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. 

०२. यापूर्वी स्वंयसेवी संस्थांना थेट विदेशी निधी मिळत होता. गृह मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने विदेशी निधी घेण्यापूर्वी परवानगीची अट घातली होती. केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यात झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनला विदेशातून मिळणाऱ्या निधीच्या चौकशीचेही आदेश दिले होते.



रेल्वे तिकिटांवर पाच हजारांपेक्षा जास्त रिफंड नाही
०१. ९ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान बूक आलेल्या रेल्वे तिकिटांवर ५ हजार रुपयांपेक्षा अधिक परतावा (रिफंड) मिळणार नाही, असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. रेल्वे काऊंटरवर तिकीट बूक केलेल्यांसाठी हा नियम असणार आहे. 

०२. ५०० व हजारच्या नोटा रद्दबातल झाल्यानंतर रेल्वे तिकिटांसाठी जुन्या नोटा सध्या चालत आहेत. त्यामुळे अनेकांनी जुन्या नोटा खपवण्यासाठी महागडे रेल्वे तिकीट बूक करण्याचा मार्ग अवलंबला.

०३. नोटा रद्दबातल करण्याचा निर्णय ८ नोव्हेंबरला झाला. या दिवशी रेल्वेचे २ हजार तिकीट बूक करण्यात आले. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ नोव्हेंबरला तब्बल २७ हजार जणांनी एसी फर्स्ट क्लास श्रेणीचे तिकीट बूक केले. एकाच दिवसात रेल्वेची तिकीट कमाई ४ कोटींवरुन १३ कोटी रुपये झाली.

०४. तिकिटाची वाढती बुकिंग पाहता दहा हजारांपेक्षा जास्त शुल्क असणाऱ्या तिकीटाचे रिफंड रोख न देता थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल, असा निर्णय रेल्वेने घेतला होता. मात्र आता ही मर्यादा ५ हजार करण्यात आली आहे. 



पाणी जीवाणूमुक्त करण्यासाठी डीप ट्रीट द्रावणाची निर्मिती
०१. भारतातील दूरस्थ खेडय़ांमध्ये पाणी जीवाणूमुक्त करण्यासाठी नवीन पद्धत कॅनडातील संशोधकांनी विकसित केली असून त्यात भारतीय वंशाच्या वैज्ञानिकांचे मोठे योगदान आहे. यात ई कोलायसारखे घातक जीवाणूही नष्ट करण्याची व्यवस्था आहे. 

०२. या जीवाणूंना मारण्यासाठी शर्करावगुंठित अशा कागदी पट्टय़ा पाण्यात सोडल्या जातात. यॉर्क विद्यापीठाचे संशोधक सुशांत मित्रा यांच्या मते डीप ट्रीट असे आमच्या या संशोधनाचे नाव आहे. यात किफायतशीर, कुठेही नेता येतील अशी पाणी प्रक्रिया साधने तयार केली आहेत.

०३. डीप ट्रीट हे नवे संशोधन असून ते यॉर्कच्या लासाँदे स्कूलमधील मायक्रो अँड नॅनो स्केल ट्रान्सपोर्ट लॅबने तयार केले आहे. यापूर्वी त्यांच्या संशोधकांनी मोबाईल वॉटर कीटच्या मदतीने ई कोलाय जीवाणू शोधण्याची पद्धत विकसित केली होती. 

०४. युनिसेफने मित्रा यांना २२ नोव्हेंबर रोजी कोपनहेगन येथे निमंत्रित केले असून तेथे हा प्रयोग दाखवला जाणार आहे. या संशोधनात मित्रा यांच्या शिवाय सौम्यदेब दासगुप्ता, नागाशिवा गुंडा यांचा समावेश आहे. एनव्हरॉनमेंटल सायन्स वॉटर रीसर्च अँड टेक्नॉलॉजी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.



‘बॉंबे हायकोर्टा’च्या नामांतराचा विधेयक मागे
०१. ‘बॉम्बे हायकोर्टा’चे नामांतर मुंबई उच्च न्यायालय करण्याचे विधेयक मागे घेण्याचा आश्चर्यकारक निर्णय सरकारने घेतला आहे. याचे अधिकृत कारण समजू शकले नाही. परंतु कोलकाता उच्च न्यायालय असे नामकरण करण्यास कलकत्ता उच्च न्यायालय आणि पश्चिम बंगाल सरकारने केलेल्या विरोधामुळे हे विधेयक मागे घ्यावे लागल्याचे कारण सांगितले जात आहे.

०२. ‘बॉम्बे हायकोर्टा’चे मुंबई उच्च न्यायालय असे नामकरण करण्याबरोबरच ‘मद्रास हायकोर्टा’चे नामांतर चेन्नई उच्च न्यायालय आणि कलकत्ता हायकोर्टाचे नामांतर कोलकाता उच्च न्यायालय करण्याचा प्रस्ताव असलेली उच्च न्यायालये (नामांतर) विधेयक जुलैमध्येच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केले होते. 

०३. त्यानुसार ते लोकसभेत सादर करण्यातही आले होते. मात्र, पुढे ते स्थायी समितीकडेसुद्धा पाठविलेले नाही. आता तर ते थेट मागेच घेण्यात आले आहे. 

०४.१९९५ मध्ये तत्कालीन युती सरकारने ‘बॉम्बे’चे मुंबई असे अधिकृतपणे नामकरण केल्यानंतर बहुतेक सरकारी आणि बिगरसरकारी संस्थांनी आपली नावे बदलली आहेत. 

०५. जे मोजके अपवाद राहिले आहे, त्यामध्ये ‘बॉम्बे हायकोर्ट’, ‘बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज’ (बीएसई) आणि ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ (बीएनएचसी) आदींचा समावेश आहे. त्यापैकी ‘बॉम्बे हायकोर्टा’चे नामकरणाचा पाठलाग राज्य सरकार २००५ पासून करीत आहे.