बेशिस्तपणाच्याबाबतीत एअर इंडिया जगात तिसरी
प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, विमानांच्या पाळल्या जाणाऱ्या वेळा यांच्या आधारे फ्लाईटस्टॅट्सने सर्वोत्तम सेवा देणाऱ्या कंपन्यांची यादी तयार करण्यात आली आहे. 


विमानांच्या वेळा न पाळण्याच्या, चांगल्या सुविधा न देणाऱ्या कंपन्यांच्या यादीत एअर इंडिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. एअर इंडियाचे वेळ न पाळण्याचे प्रमाण तब्बल ३८.७१% इतके आहे

या यादीत एल अल ही इस्रायली कंपनी पहिल्या क्रमांकावर आहे. एल अल कंपनीच्या विमानांच्या वेळा न पाळण्याचे प्रमाण ५६% आहे. . तर या यादीत आईसलँडएअर कंपनी (४१.०५%) दुसऱ्या क्रमांकावर आहे.

विमानांच्या वेळा कसोशीने पाळण्यात केएलएम या नेदरलँडच्या कंपनीचा क्रमांक पहिला लागतो. केएलएम कंपनीच्या विमानांची वेळ चुकण्याचे प्रमाण (११.४७%) इतके आहे. दुसऱ्या क्रमांकावर आयबेरिया (११.८२%), तिसऱ्या क्रमांकावर जपान एअरलाईन्स (१२.२%) आहे.


कल्याण कृष्णमुर्ती फ्लिपकार्टचे नवे सीईओ
इ-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टच्या व्यवस्थापनामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. टायगर ग्लोबलचे माजी अधिकारी कल्याण कृष्णमुर्ती यांची फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) म्हणून बिन्नी बन्सल यांच्याजागी नियुक्ती करण्यात आली आहे. 

बिन्नी बन्सल यांच्यासाठी नव्या पदाची निर्मिती करून त्यांना ग्रुप सीईओ बनवण्यात आलं आहे. पहिले आंतरराष्ट्रीय एक्स्चेंज सुरू
मुंबई शेअर बाजाराच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय एक्स्चेंजचे (इंडिया आयएनएक्स) सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील गांधीनगर येथील गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक (गिफ्ट) सिटी येथे उद्घाटन झाले. 

हे एक्स्चेंज २२ तास कार्यरत राहणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार आणि अनिवासी भारतीयांना जगभरात कोठेही ट्रेडिंग शक्य होणार आहे. फिफाच्या उत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने रोनाल्डो सन्मानित
फिफा संघटनेतर्फे दिल्या जाणार्‍या उत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्काराने ख्रिस्तीयानो रोनाल्डोला सन्मानित करण्यात आले.फिफाचे अध्यक्ष जिआनी इन्फॅन्टीनो यांच्या हस्ते त्याने हा पुरस्कार स्वीकारला.


रोनाल्डोने यापूर्वी बॅलन डीओर पुरस्कारही पटकावला होता. पोर्तुगाल संघाच्या युरो चषक स्पर्धेतील विजयामध्ये रोनाल्डोने महत्वाची भूमिका बजावली होती.

उत्कृष्ट मॅनेजर म्हणून इटलीच्या क्लाऊडीओ रेनोडी यांना फिफाने याच कार्यक्रमात सन्मानित केले. त्यांनी फ्रान्सच्या झिनेदीन जिदानला मागे टाकून हा पुरस्कार पटकावला.‘सावली’ उभारणार देशातील पहिला वॉटर थेरपी टॅंक
पॅरालिसिस, कोमा, फ्रॅक्‍चर, अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी, मतिमंदत्व, स्किझोफ्रेनिया, अल्झायमर्स आदी व्याधींनी अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांसाठी लोकसहभागातून प्रकल्प साकारला जात आहे.

जूनअखेर बांधकाम पूर्ण होऊन हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असून, भारतातील पहिला वॉटर थेरपी टॅंक येथे उभारला जाणार आहे. सध्या अशा पद्धतीचे टॅंक फक्त अमेरिका, युरोप, चीन येथेच उपलब्ध आहेत

कमरेखालचा भाग लुळा असणाऱ्या रुग्णांसाठी ही उपचार पद्धती वरदान ठरणार आहे. 

संपूर्ण दक्षिण महाराष्ट्रात अशा पद्धतीचे काम गेली तेरा वर्षे करणारी सावली केअर सेंटर ही एकमेव संस्था असून, चाळीस ते पंचेचाळीस टक्के रुग्णांना पूर्ण मोफत किंवा सवलतीच्या दरात संस्थेमध्ये दाखल करून घेतले जाते. राज्यात ९७ गावात जलव्यवस्थापन समिती
योग्य जलव्यवस्थापनाद्वारे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी राज्यातील ९७ गावांत जलव्यवस्थापन समिती स्थापण्यात येणार आहे. पडणाऱ्या पावसाचा हिशेब या माध्यमातून ठेवण्यात येणार असून, त्या आधारेच पिण्याचे पाणी व शेतीच्या पाण्याचे नियोजन केले जाणार आहे.

जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्यात ‘जलस्वराज्य-२’ प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्या अंतर्गत दुष्काळी, भूजल शोषित व दुषित जलस्त्रोत असलेल्या गावांमध्ये विविध जल योजना हाती घेण्यात आल्या आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून पुणे, सातारा, जळगाव, नगर, बुलडाणा, अमरावती व औरंगाबाद येथील ९७ गावांत ही मोहीम राबविण्यात येत आहे. लोकसहभागातून गावातील पेय जल व पिकांसाठी लागणऱ्या पाण्याचे नियोजन केले जाणार आहे.

राज्यात सरासरी ८ गावांचे असे जलधर क्षेत्र निर्धारीत करण्यात आले आहे. या प्रत्येक गावांतील एक सदस्य या समितीवर असेल.पंचायत समितीचा सभापती या समितीचा अध्यक्ष असेल. शिवाय भूजल विभागातील तज्ज्ञ आणि प्रशासकीय अधिकारी अशा १६ जणांची ही समिती असेल. भारत व्हिएतनामला ‘आकाश’ देणार
‘आकाश’ या जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रांची विक्री व्हिएतनामला करण्यासंदर्भात भारताने उत्सुकता दर्शविली आहे.  २५ किमी पल्ला असलेले हे क्षेपणास्त्र विमान, हेलिकॉप्टर्स वा ड्रोन्सचा वेध घेऊ शकते.

दक्षिण चिनी समुद्रात चीनच्या दांडगाईचा सामना करत असलेल्या व्हिएतनामच्या वैमानिकांस या वर्षापासून भारत प्रशिक्षणही देणार आहे. 

आशिया-प्रशांत महासागर भागामधील चीनच्या वाढत्या आक्रमकतेच्या पार्श्‍वभूमीवर भारत व व्हिएतनाममधील सबंधही हळुहळू दृढमूल होऊ लागल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. भारताकडून चीनला व्हिएतनाम व जपानशी लष्करी संबंध अधिक बळकट करण्याच्या कृतीमधून प्रत्युत्तर देण्यात येत असल्याचे मानले जात आहे.पाकिस्तानने बाबर-३ ची केली यशस्वी चाचणी
पाकिस्तानने पहिल्यांदाच पाणबुडीतून मारा करणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्र बाबर-३ ची यशस्वी चाचणी घेतली आहे. बाबर-३ ची मारक क्षमता ४५० कि.मी.पर्यंत इतकी आहे. 


पाकिस्तानचे इंटर-सर्विसेज पब्लिक रिलेशन्सचे महासंचालक(ISPR) मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली.  

भारतानेही २००८ मध्ये पाणबुडीतून अणू हल्ला करणाऱ्या मिसाईलचं तर २०१३ मध्ये क्रूझ मिसाईलचं यशस्वी परिक्षण केलं होतं. भारतातर्फे नेपाळला एक अब्ज रुपये
रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया नेपाळ राष्ट्र बँकेला (एनआरबी) एक अब्ज रुपये उपलब्ध करून देण्यास तयार आहे. 

भारताने ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर नेपाळने आमच्याकडे १०० रुपये मूल्यांच्या नोटांची टंचाई झाल्याचे भारताला सांगितले होते.

चलन रद्द झाल्यानंतरची परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत वाट पाहा, असे रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने नेपाळला सांगितले होते.भारताने उच्च मूल्यांच्या नोटा रद्द केल्यानंतर नेपाळ राष्ट्र बँकेने नेपाळमध्ये भारतीय चलनी नोटा बदलून देण्याची मर्यादाही खाली आणली आहे.YAHOO होणार इतिहासजमा
YAHOOची कॉर्पोरेट ओळख लवकरच बदलण्याची शक्यता आहे.  कंपनीचं Altaba असं लवकरच नामकरण होणार असल्याची चर्चा आहे.

कंपनीचा ४.८ अरब डॉलरचा वेराइजन करार झाल्यानंतर कंपनीच्या बोर्डाचं स्वरुपही छोटं होणार आहे.याहू स्वतःची डिजिटल सर्व्हिसेस वेराइजन कम्युनिकेशनला विकण्याच्या तयारीत आहे.

याअंतर्गत ईमेल, वेबसाइट्स, मोबाईल अ‍ॅप्स, जाहिरातीचे टूल्स वेराइजनला मिळणार आहेत. त्यानंतर सीईओ मेरिसा मेयरलाही राजीनामा द्यावा लागणार आहे. 

याहूच्या १० सदस्यांच्या बोर्डात सध्या सीईओ मेरिसा मेयरसह चार डायरेक्टर आहेत. वेराइजन करारानंतर सर्व बोर्डाचे सदस्य राजीनामा देतील. या कराराअंतर्गत एरिक ब्रांट यांना कंपनीचे चेअरमन बनवण्यात आलं. वेब वेराइजन करार पूर्ण होईपर्यंत एमिरटसही चेअरमनपदावर कार्यरत राहणार आहेत. 

या करारांतर्गत नवं नाव alternative and Alibaba यांच्या अक्षरातून निवडण्यात आलं आहे. याहूमध्ये १५ टक्के शेअर्स हे चिनी कंपनी अलिबाबाचे आहेत.जागतिक अर्थव्यवस्थेला धूम्रपानामुळे मोठा फटका
धूम्रपानामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला दर वर्षी तब्बल एक ट्रिलियन (एक हजार अब्ज) डॉलरचा फटका बसत असल्याचे धक्कादायक वास्तव जागतिक आरोग्य संघटनेच्या (डल्ब्यूएचओ) ताज्या अहवालातून समोर आले आहे.

धूम्रपानामुळे सध्या जेवढे मृत्यू होतात, त्यात २०३० मध्ये ३३ टक्‍क्‍यांनी वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तंबाखूवर आकारल्या जाणाऱ्या करातून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा धूम्रपानावर होत असलेला खर्च प्रचंड मोठा आहे. 

अहवालात नमूद करण्यात आले आहे, की तंबाखूमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या २०३० पर्यंत प्रतिवर्षी ६० लाखांवरून ८० लाखांवर पोचणार असल्याची शक्‍यता आहे. एकूण मृत्यूंपैकी ८० टक्के मृत्यू हे अल्प आणि मध्यम उत्पन्न गटांतील असणार आहेत.