५४ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषणा
५४ व्या राज्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ‘दशक्रिया’ सिनेमाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कारासहीत अनेक पुरस्कार पटकावले आहेत.


बबन अडागळे (एक अलबेला), अमन विधाते (डॉ. रखमाबाई राऊत) या चित्रपाटासाठी उत्कृष्ट कलादिग्दर्शन कै. साहेबमामाऊर्फ फत्तेलाल पारितोषिक, ५०००० रुपये व मानचिन्ह त्यांना जाहीर करण्यात आले. 

तसेच उत्कृष्ट बालकलाकारसाठी आर्य आढाव (दशक्रिया) आणि ओंकार घाडी (कासव) यांना कै. गजानन जहागिरदार पुरस्कार, ५०००० रुपये व मानचिन्ह जाहीर करण्यात आले. 

सर्वोत्कृष्ट पटकथा – संजय कृष्णाजी पाटील (दशक्रिया)

सर्वोत्कृष्ट संगीत – अमितराज (दशक्रिया)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – स्वप्नील (दशक्रिया)

सर्वोत्कृष्ट कथा – राहुल चौधरी 



लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्रच घ्याव्यात
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवेळी प्रचार-मोडवर जाणारे राजकीय नेते आणि यामुळे येणारे व्यत्यय टाळण्यासाठी दोन्ही निवडणुका एकत्रच घेण्याची शिफारस निती आयोगाने केली आहे. 

दोन टप्प्यांत होणाऱ्या या निवडणुकांची २०२४ पासून अंमलबजावणी करावी, अशी सूचनाही आयोगामार्फत करण्यात आली आहे. 

निती आयोगाचा हा प्रस्ताव लागू करायचा झाल्यास काही विधानसभांचा कार्यकाळ वाढवावा लागेल, तर काही विधासभांचा कार्यकाळ कमी करावा लागणार आहे. यासंबंधीचा रोड मॅप तयार करण्याचे आणि याबाबत सूचना देण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत.



‘रेरा’ कायद्याची 1 मेपासून अंमलबजावणी
बहुप्रतिक्षित रिअल इस्टेट कायद्याची (रेरा) १ मेपासून अंमलबजावणी होत असून देशातील १३ प्रमुख राज्यांमध्ये हा लागू करण्यात येणार आहे. 

केंद्रीय रिअल इस्टेट कायद्यातील तरतुदींनुसार राज्य सरकारने स्थावर संपदा (विनियम व विकास) अधिनियम (रेरा) कायदा अधिवेशनात मंजूर केला आहे. या कायद्याची अंमलबजावणी जागतिक कामगार दिनाच्या म्हणजेच १ मेच्या पार्श्‍वभूमीवर करण्याचा निर्णय राज्याने घेतला आहे. 

या कायद्यानुसार स्थापन करण्यात आलेल्या प्राधिकरणावरील सदस्यांची नेमणूक पुढील आठवडाभरात होणार आहे. नागपूर, पुणे आणि मुंबई येथे प्राधिकरणाची कार्यालये उघडण्यात येतील. मुख्यालय मुंबईत असेल.

देशातील काही राज्यांमध्ये बांधकाम व्यवसाय प्राधिकरण स्थापन करण्यात आलेले नाही. त्यामध्ये गुजरात, राजस्थान, हरियाणा, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यांचा समावेश आहे. 

रेरा कायद्याअंतर्गत प्रत्येक विकसकाला नवीन प्रकल्प सुरू करण्याआधी प्राधिकरणाकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.


या कायद्यानुसार इस्टेट एजंटनाही प्राधिकरणाकडे नोंदणी करावी लागेल. 
कोणतीही बाधित व्यक्ती प्राधिकरणाकडे तक्रार नोंदवू शकेल. मात्र ज्याची प्राधिकरणाकडे नोंदणी झालेली असेल, अशाच प्रकल्पाबाबत तक्रार करता येईल. विकसकाला प्रकल्पाची सर्व माहिती प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर टाकावी लागेल. 



सुमीत नवा ‘हिंदकेसरी’
नॅशनल कॅपिटल रिजन (दिल्ली) संघाचा सुमीत पन्नासावा ‘हिंदकेसरी’ ठरला. मातीमधील भारताचा या वर्षीचा सर्वोत्तम मल्ल असलेल्या सुमीतने सुवर्णमहोत्सवी किताबी लढतीत महाराष्ट्राच्या अभिजित कटके याचे आव्हान गुणांवर ९-२ असे मोडून काढले. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सहकर्याने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने या स्पर्धेचे आयोजन केले होते. कणखर मानसिकता आणि अनुभवाच्या जोरावर सुमीतने बाजी मारली. अभिजितला ‘महाराष्ट्र केसरी’ पाठोपाठ “हिंदकेसरी’ लढतीतही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. 



जगविख्यात गिर्यारोहक उली स्टेकचा ‘माऊन्ट एवरेस्ट’ चढताना मृत्यू
जगातील सर्वोच्च शिखर दोन वेळा यशस्वीरित्या पार केलेल्या स्वित्झर्लंडचा सुप्रसिद्ध गिर्यारोहक उली स्टेकचा माऊंट एव्हरेट चढताना अपघाती मृत्यू झाला. 

उली स्टेकने याआधी २०१२ आणि २०१५ साली यशस्वीरित्या ‘एव्हरेस्ट’ सर केला होता. तेही ऑक्सिजन पुरवठ्याविना त्याने ही कमाल केली होती. अतिशय सहजपणे पर्वत रांगा सर करणाऱ्या स्टेकला ‘स्विस मशीन’ या नावाने ओळखले जायचे. 

४० वर्षीय स्टेक यावेळी एव्हरेस्ट शिखर तिसऱ्या नव्या मार्गाने सर करण्याचा प्रयत्न करत होता. या दरम्यान ३२८० फूट उंचीवर असताना त्याचा अपघाती मृत्यू झाला. स्टेकचा मृतदेह हेलिकॉप्टरच्या सहाय्याने काठमांडू येथे आणण्यात आला.



मुहम्मद अनस, कऱ्हाना यांची सुवर्ण कामगिरी
राष्ट्रीय विक्रमवीर धावपटू मुहम्मद अनस आणि गोळाफेकपटू ओम प्रकाश कऱ्हाना यांनी आशियाई अ‍ॅथलेटिक्स ग्रां. प्रि. स्पध्रेच्या तिसऱ्या आणि अखेरच्या दिवशी सुवर्णपदकाची कमाई केली. या दोन पदकांसह भारताची पदकसंख्या आठ झाली आहे.

अनसने येथे ४५.६९ सेकंदांची नोंद करून सत्रातील पहिले आंतरराष्ट्रीय स्पध्रेतील सुवर्णपदक पटकावले. मात्र त्याला जागतिक अजिंक्यपद स्पध्रेसाठीची ४५.५० सेकंदांची पात्रता वेळ गाठण्यात अपयश आले. व्हिएतनामच्या चाँग लीच (४६.६६ से.) व कझाकस्तानच्या मिखल लिटव्हीन (४७.०३ से.) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले.


पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात कऱ्हानाने तिसऱ्या प्रयत्नात सर्वोत्तम १९.५८ मीटर अंतर गाठून सुवर्ण कमाई केली. त्याचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक आहे. चीनच्या वू जिक्सिंग (१९.२१) आणि इराणच्या अली समारी (१८.६८) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले. 

मनप्रीत कौर (महिला गोळा फेक), टिंटू लुका (८०० मी.), जिन्सन जॉन्सन (पुरुष ८०० मी.) आणि द्युती चंद (१०० मी.) यांनी आपापल्या गटात रौप्य, तर नीरज चोप्रा (भालाफेक) आणि एमआर पूवाम्मा (महिला ४०० मी.) यांनी आपापल्या गटात कांस्यपदक जिंकले. भारताने या स्पध्रेत एक सुवर्ण, ४ रौप्य आणि २ कांस्यपदकांची कमाई केली.



भारतात सुरू होणार ‘अॅपल’चे ऑनलाइन स्टोअर
मोबाइल निर्मिती क्षेत्रातील जगातील अग्रगण्य कंपनी अॅपल मोबाइल भारतात लवकरच आपले पहिले ऑनलाइन स्टोअर सुरू करणार आहे.

अॅपलच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये सुरूवातीला ‘आयफोन एसई’ची विक्री होईल. याची निर्मिती भारतातच केली जाणार आहे. त्यानंतर आयफोनच्या दुसऱ्या मॉडेल्सचीही भारतातच निर्मिती केली जाईल. काही कालावधीनंतर ऑनलाइन स्टोअरची व्याप्ती वाढवली जाणार आहे.

अॅपलचे जून २०१७ पासून बेंगळुरूमधून आयफोनचे असेम्बलिंग युनिट सुरू करण्याचे नियोजन आहे



दहशतवादविरोधी लढय़ात तुर्कस्तानचा भारताला पाठिंबा
तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसीप तय्यीप एर्दोगन यांनी सोमवारी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी विविध विषयांवर व्यापक चर्चा केली. तुर्कस्तानचे अध्यक्ष दोन दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत.

मोदी आणि एर्दोगन यांच्यातील भेटीनंतर दोन्ही देशांनी तीन करार केले असून त्यामध्ये दूरसंचाराबाबतच्या कराराचाही समावेश आहे. 


सुकमा जिल्ह्य़ातील नक्षलवादी हल्ल्याचा निषेध करून एर्दोगन म्हणाले की, दहशतवादाशी मुकाबला करताना तुर्कस्तान पूर्ण ताकदीनिशी भारताच्या बाजूने उभा राहील आणि दहशतवाद्यांनी ज्या पद्धतीने रक्तपात घडविला आहे तेच त्यांच्याबाबत केले जाईल, असेही एर्दोगन म्हणाले.

काश्मीर प्रश्न व्यापक चर्चेद्वारे सोडवून शांतता प्रस्थापित करावी, काश्मीरमध्ये आणखी बळी जाण्याच्या प्रकारांना आळा घातला पाहिजे, व्यापक चर्चा करून आपण हा प्रश्न सोडवू शकतो, असे एर्दोगन यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले.