संपर्क तंत्रज्ञान निर्यातीत भारत अग्रेसरमाहिती व संपर्क तंत्रज्ञान सेवा निर्यातीत भारत सर्वात मोठा देश म्हणून पुढे आला असल्याचे मत संयुक्त राष्ट्राने व्यक्त केले आहे. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या (डब्ल्यूआयपीओ) दहाव्या आवृत्तीत ही माहिती देण्यात आली आहे.


भारत हा आशियातील उदयोन्मुख नावीन्यपूर्ण केंद्र असल्याचे मत यात व्यक्त करण्यात आले आहे. तथापि, राजकीय स्थिरता आणि सुरक्षितता यात भारत १०६ व्या क्रमांकावर आहे.

जगातील उदयोन्मुख १३० देशात भारताचे स्थान ६० वे आहे. मध्य व दक्षिण आशियात भारत प्रथम क्रमांकावर आहे. गतवर्षीच्या ६६ व्या स्थानावरून भारत यंदा ६० व्या स्थानावर आला आहे.
भारत, केनिया, व्हिएतनामसह अन्य काही देशांनी आपल्या समकक्ष देशांपेक्षा या क्षेत्रात आघाडी घेतली आहे. 

संयुक्त राष्ट्राच्या एजन्सीच्या ते नव्या उत्पादनांच्या संदर्भात जागतिक परिवर्तनात समृद्ध देशांचे वर्चस्व कायम आहे. सलग सातव्या वर्षी स्वित्झर्लंड अव्वल स्थानावर आहे.



अमेरिकेमध्ये होणार इंडियन अॅकॅडमी अॅवॉर्ड सोहळा
भारतीय सिनेमाचे जागतिक पातळीवर कौतुक होण्यासाठी इंडियन अॅकॅडमी अॅवॉर्डस सोहळ्याची घोषणा करण्यात आली आहे.

येत्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतील सॅनफ्रान्सिसको शहरात हा भव्यदिव्य पुरस्कार सोहळा रंगणार आहे. गोव्यात सध्या सुरू असलेल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये या भव्यदिव्य पुरस्कार सोहळ्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली. 

बॉलिवूड, मराठी सिनेमा तसेच टॉलिवू़डच्या सिनेमांनाही गौरवण्यात येणार आहे. तसेच हॉलिवूडच्या सिनेमात जे भारतीय कलाकार आपल्या अदाकारीने प्रेक्षकांना खिळवून ठेवतात अश्या दिग्गजांचाही या पुरस्कार सोहळ्यात विशेष गौरव होणार आहे.

या पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे शाहरूख खान इंडियन अॅकॅडमी अॅवॉर्ड सोहळ्याचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे.



५० हजारांपेक्षा जास्त व्यवहारासाठी आधार कार्ड अनिवार्य
बँकेत खाते उघडण्यासाठी आणि ५० हजार रुपयांपेक्षा अधिकच्या रकमेची देवाण घेवाण करण्यासाठी सरकारने आता आधार कार्ड अनिवार्य केले आहे. विद्यमान बँक खातेधारकांना आधार कार्ड ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत जमा करण्यास सांगण्यात आले. आधार नंबर न दिल्यास बँक खाते सक्रीय राहणार नाही. 

२०१७-१८ च्या अर्थसंकल्पात सरकारने आधारला पॅनशी जोडणे अनिवार्य केलेले आहे. 

आता व्यक्ती, कंपनी आणि भागीदारीतील कंपनी यांना ५० हजार रुपयांपेक्षा अधिकच्या व्यवहारासाठी आधारसोबत पॅन नंबर, फॉर्म नंबर ६० देणे अनिवार्य करण्यात आले आहे.



रॅन्समवेअर सायबर हल्ल्यामागे उत्तर कोरियाच्या हॅकर्सचा हात
जगात धुमाकूळ घालणाऱ्या रॅन्समवेअर सायबर हल्ल्यामागे उत्तर कोरियाच्या हॅकर्सचा हात असल्याचा दावा ब्रिटनच्या सुरक्षा संस्थानी केला आहे. रॅन्समवेअरमुळे जगभरातील अनेक देशांतील संगणक यंत्रणा ठप्प झाली होती व अनेक कंपन्यांचे अफाट नुकसान झाले होते.

जगातील नामवंत मानल्या जाणाऱ्या ब्रिटनच्या नॅशनल सायबर सुरक्षा संस्थेने याचा कसून तपास केला आहे. या संस्थेने ‘बीबीसी’ला दिलेल्या माहितीनुसार उत्तर कोरियातील लाझारूस नावाच्या हॅकर्सच्या गटाने हा सायबर हल्ला घडवून आणला. 


याच गटाने २०१४ मध्ये सोनी पिक्‍सर्सला लक्ष्य बनविले होते. उत्तर कोरियातील हुकूमशाहीवर बेतलेल्या ‘द इंटरवह्यू’ हा सिनेमा प्रदर्शित केल्याने त्यांनी सोनीला लक्ष्य केले होते. 

गेल्या महिन्यात वॉना क्राय या रॅन्समवेअरने जगातील अनेक संगणक बंद केले व ते सुरू करण्यासाठी पैशांची मागणी केली. ब्रिटनमधील आरोग्यव्यवस्था या हल्ल्यामुळे जवळपास ठप्प झाली होती.

रॅन्मवेअरने ब्रिटनला किंवा त्यांच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेला लक्ष्य केलेले होते. प्रचंड पैसा मिळवणे हे या हल्ल्यामागचे कारण होते, मात्र नंतर ते हाताबाहेर गेल्याचे तपासात पुढे आले आहे. 



जर्मनीचे माजी चान्सलर हेलमट कोल यांचे निधन
जर्मनीचे माजी चान्सलर हेलमट कोल यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.  

१९८२ ते १९९८ या प्रदीर्घ कालावधीत ते जर्मनीचे चान्सलर होते. जर्मनीच्या एकीकरणात हेलमट यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.

हेलमट कोल यांचा जन्म ३ एप्रिल १९३० रोजी झाला होता. १९४६ च्या काळात ते राजकारणात आले आणि ख्रिश्चन डेमोक्रेटीक युनियनमध्ये ते सामील झाले. 

१९९० च्या दशकात बर्लिन भिंत कोसळली आणि पूर्व-पश्चिम जर्मनी एकत्र आले. जर्मनीच्या एकत्रीकरणात हेलमट यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. 

१९८२ ते १९९० या कालावधीत कोल हे पश्चिम जर्मनीचे चान्सलर होते. पूर्व आणि पश्चिम जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर १९९० ते १९९८ ते जर्मनीचे चान्सलर होते. 

जर्मनीच्या चान्सलर पदावर सर्वाधिक काळ (१६ वर्ष) राहण्याचा मान त्यांना मिळाला. त्यांच्या नेतृत्वाखाली जर्मनीने विकासाच्या दिशेने वाटचाल केली.