साहित्य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड 
बडोदा येथे फेब्रुवारीत होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त आयएएस अधिकारी, कथाकार व कादंबरीकार लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाली. 


संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांचा ७० मतांनी पराभव केला.
निवडणुकीत लक्ष्मीकांत देशमुख यांना ४२७ मते, तर डॉ. शोभणे यांना ३५७ मते मिळाली.



काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी
१३२ वर्षांची परंपरा असलेला देशातील सर्वात जूना पक्ष काँग्रेसला ११ डिसेंबर रोजी ४७ वर्षीय राहुल गांधी यांच्या रूपाने नवे नेतृत्व मिळाले. 

काँग्रेस अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत राहुल गांधी यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर राहुल यांची काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा अखिल भारतीय काँग्रेस समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी पत्रकार परिषदेत केली.

राहुल यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव ठेवणारे ८९ अर्ज आले होते. छाननीत हे सर्व अर्ज वैध ठरले असून अध्यक्षपदासाठी राहुल हे एकमेव उमेदवार असल्याने त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले जात आहे, असे रामचंद्रन यांनी नमूद केले.

विद्यमान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी १६ डिसेंबर रोजी सकाळी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देतील. त्यानंतर त्याचदिवशी सकाळी ११ वाजता सोनिया तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाची अधिकृतपणे सूत्रे स्वीकारतील अशीही माहिती देण्यात आली.



प्रा. एम. एस. स्वामीनाथन यांना ‘येरारिंगनर’ पुरस्कार मिळाला 
भारत सरकारकडून प्राध्यापक एम. एस. स्वामिनाथन यांना ‘येरारिंगन’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

भारतीय कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल घडविणारे व्यक्तित्व म्हणून प्राध्यापक एम. एस. स्वामिनाथन यांना ओळखले जाते. त्यांच्या नेतृत्वात नवीन कृषी धोरणाचा अवलंब आणि उच्च उत्पन्न देणारे विविध बियाणे व रासायनिक खतांचा वापर केल्याने १९६० साली भारताने कृषी उत्पादनात लक्षणीय वाढ नोंदवली होती. 

त्यांनी डॉ. नॉर्मन बोरलॉग यांच्यासोबत गव्हाच्या उच्च उत्पन्न देणार्‍या जाती विकसित करण्याचे काम केले.



कचेगुडा भारतामधले पहिले ऊर्जा कार्यक्षम रेल्वे स्थानक
दक्षिण मध्य रेल्वे विभागातले हैदराबादमधील कचेगुडा रेल्वे स्थानक हे भारतामधले पहिले ऊर्जा-कार्यक्षम ‘ए१ श्रेणी’ तले रेल्वे स्थानक ठरले आहे.

कचेगुडा रेल्वे स्थानकाने तेथील सर्व १३१२ पारंपरिक दिव्यांना LED प्रकाश दिव्यांनी बदलवून तसेच ३७० ऊर्जा-कार्यक्षम DC पंखे आणि १२ वातानुकूलित उपकरणे बदलवून १००% ऊर्जा कार्यक्षमता लक्ष्य साध्य केले आहे.



आयन ग्रिलॉटला ‘टाइम’ चा सन्मान
यंदाच्या वर्षी ह्य़ूस्टन येथे वर्णविद्वेषातून गोळीबारात श्रीनिवास कुचीभोटला या भारतीय तंत्रज्ञाचा गोळीबारात मृत्यू झाला. त्या वेळी हल्लेखोराच्या काही गोळ्या अंगावर झेलणारा अमेरिकी नागरिक आयन ग्रिलॉट याचा ‘टाइम’ नियतकालिकाने गौरव केला आहे. 

या घटनेत कुचीभोटला याचा सहकारी आलोक मदासानी हा जखमी होऊन वाचला होता. 

२०१७ मध्ये आशेचा किरण ठरलेले नायक म्हणून ज्या पाच जणांची नावे टाइम नियतकालिकाने घेतली आहेत त्यात ग्रिलॉट याचे नाव आहे. 

नौदलाचा माजी अधिकारी असलेल्या अ‍ॅडम प्युरींटन याने फेब्रुवारीत कन्सासमधील ओलाठ येथे एका बारमध्ये कुचीभोटला व त्याच्या सहकाऱ्यांवर गोळीबार केला होता. या हल्ल्यात गोळीबार सुरू असताना अमेरिकी नागरिक ग्रिलॉट हा मदतीसाठी धावून गेला व त्याने काही गोळ्या अंगावर झेलल्या, त्यात तो जखमी झाला होता. 

‘टाइम’ नियतकालिकाने कन्सास येथील ग्रिलॉट याचा सन्मान करताना त्याला ‘खरा अमेरिकी नायक’ अशा शब्दात गौरवले असून भारतीय अमेरिकी समुदायाने त्याला कन्सास येथे त्याच्या मूळ गावी घर घेण्यासाठी १ लाख डॉलर्सची मदत केली होती.


UAE लवकरच भारतात ३ वाणिज्यदूतावास उघडणार आहे
भारतासोबत द्विपक्षीय संबंध वाढविण्यासाठी संयुक्त अरब अमिरात (UAE) भारतात आणखी तीन नवीन वाणिज्यदूतावास (consular office) उघडणार आहे. सोबतच देशात अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी (ADIA) या त्यांच्या सार्वभौम संपदा निधीच्या $75 अब्जची गुंतवणूक करणार आहे.

भारतीयांना UAE ला व्हिसा हवा असल्यास त्यांना मुंबई, दिल्ली किंवा केरळ येथून प्रवास करावा लागणार. UAE आपले वाणिज्यदूतावास आणि व्हिसा केंद्रे या शहरांमध्ये उघडणार आहेत.

संयुक्त अरब अमिरात (UAE) हा एक अरबी द्वीपकल्प देश आहे जो प्रामुख्याने अरब आखाती प्रदेश आहे. हा देश ७ अमिरातीचा महासंघ आहे. अबू धाबी ही या देशाची राजधानी आहे आणि संयुक्त अरब अमिरात दिरहॅम हे चलन आहे. देशाचे वर्तमान राष्ट्राध्यक्ष खालिफा बिन जयाद अल नाहयान हे आहेत.



UN ने अमेरिकेचा जेरुसलेम ही इस्रायलची राजधानी म्हणूनचा निर्णय अमान्य केला
संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) अमेरिकेच्या प्रशासनाने अलीकडेच घेतलेल्या जेरुसलेम ही इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्यासंबंधीचा निर्णय अमान्य केला आहे.

या मुद्द्यावरून उठलेल्या विवादासंबंधी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने आपल्या आपातकालीन बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला.


जेरुसलेम राजधानीचे ठिकाण करण्यावरून इस्रायल व पॅलेस्टाइन यांच्यात दीर्घकाळापासून विवाद सुरू आहेत. दोनही देश जेरुसलेम हा आपल्या देशाचा भाग असून आपली राजधानी असल्याचा दावा वारंवार करत आहेत. 

यहुदी धर्म, इस्लाम व ख्रिश्चन धर्माचे मुख्य ठिकाण म्हणून जेरुसलेम शहराची ओळख असल्याने हा आंतरराष्ट्रीय विवादाचा मुद्दा बनत आहे.



आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस १० डिसेंबर 
दरवर्षी १० डिसेंबरला जगभरात ‘आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस’ साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार कार्यालयाच्या (UNHRO) नेतृत्वात जगभरात हा दिवस साजरा केला जातो.

या वर्षी ‘लेट्स स्टँड अप फॉर इक्वेलिटी, जस्टीस अँड ह्यूमन डिगनीटी’ या विषयाखाली हा दिवस साजरा केला गेला आहे. मानवाधिकारांचे सार्वत्रिक घोषणापत्र (Universal Declaration of Human Rights) याचे हे ७० वे वर्ष आहे.

न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात तसेच पॅरीस मधील पॅलेस डे चाएलोट येथे ‘# स्टँडअप 4 ह्यूमन राइट’ या वर्षभर चालणार्‍या मोहिमेला सुरुवात केली गेली आहे.

मानवी अधिकार किंवा मानवाधिकार म्हणजे सर्व मनुष्यप्राण्यांचे मूलभूत अधिकार आहेत, जे त्याच्या राष्ट्रीयत्व, रहिवासी, लिंग, राष्ट्रीय, जात, वर्ण, धर्म, भाषा किंवा इतर कोणत्याही स्थितीवर अवलंबून नसतात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसतो. 

वैश्विक मानवाधिकारांचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदे, करार, सरावपद्धती, सर्वसाधारण तत्त्वे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे अन्य स्रोत अश्या विविध पद्धतीचा अवलंब केला जातो.

१९४८ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेमध्ये (UNGA) मानवाधिकाराचे सार्वत्रिक घोषणापत्र (Universal Declaration of Human Rights) अंगिकारले गेले. मानवाधिकारांचे सार्वत्रिक घोषणापत्र आज जगातील ५०० हून अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे

त्यानंतर १९५० साली, UNGA मध्ये आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस म्हणून १० डिसेंबर हा दिवस साजरा करण्यासंबंधी ठराव 423 (V) पारित केला गेला. 

निर्वासित किंवा स्थलांतरित, अपंग, LGBT व्यक्ती, स्त्री, मूलं, स्थानिक, अल्पसंख्याक तसेच भेदभाव किंवा हिंसाचाराचा याचा धोका असलेल्या व्यक्ती अश्या समाजातील विविध घटकांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.

मानवाधिकार उच्चायुक्त (High Commissioner for Human Rights) हे मुख्य संयुक्त राष्ट्रसंघाचे अधिकार कार्यकारी मंडळ आहे. हे अधिकृत कार्यालय जगभरात या दिवशी विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यामध्ये प्रमुख भूमिका निभावते.