देशात सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेशात 
२०१६ मध्ये देशातील सर्वाधिक जास्त गुन्ह्य़ांची नोंद उत्तर प्रदेशात झाली, पण गुन्ह्य़ांचे सर्वाधिक कमी प्रमाणही उत्तर प्रदेशाने नोंदविले. तसेच त्यापाठोपाठ मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळमध्ये गुन्ह्य़ांची नोंद झाल्याची माहिती देणारा सर्वंकष अहवाल राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (एनसीआरबी ) ३० नोव्हेंबर रोजी प्रकाशित केला. 


महिलांवरील अत्याचारांच्या आणि दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली नोंदविलेल्या गुन्ह्य़ांच्या संख्येतही किंचित वाढ झाल्याचे अहवाल सांगतो.

२०१६ मधील एकूण गुन्ह्य़ांची संख्या ४८ लाख ३१ हजार ५१५ इतकी आहे. २०१५ मध्ये हीच संख्या ४७ लाख १० हजार ६७६ इतकी होती. गुन्ह्य़ांमध्ये २.६ टक्क्यांनी वाढ झाली. त्यापैकी उत्तर प्रदेशात २ लाख ८२ हजार गुन्ह्य़ांची नोंद आहे.

राष्ट्रीय गुन्हेगारी नोंद विभाग (National Crime Records Bureau -NCRB) चा ‘भारतात गुन्हेगारी (Crime in India) – २०१६’ वार्षिक अहवाल जाहीर करण्यात आला. हा वर्ष २०१६ मध्ये नोंद केल्या गेलेल्या पोलीस नोंदीनुसार फौजदारी खटल्यांचा अहवाल आहे.

भारतात १९ मोठ्या शहरांपैकी दिल्लीत बलात्काराच्या घटना सर्वाधिक (४०%) नोंदवल्या गेल्या आहेत. याशिवाय हत्या, अपहरण, गुन्हेगारीमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश आणि आर्थिक गुन्ह्यांमध्ये दिल्ली सर्वात पुढे आहे. महिलांविरुद्ध गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक ३३% प्रकरणे तसेच कौटुंबिक हिंसा आणि हुंडाबळीची २९% प्रकरणे दिल्लीत नोंदवली गेली आहेत. 
दिल्लीनंतर मुंबईमध्ये गुन्हेगारीचा आकडा १२.३% वर पोहचलेला आहे. 

NCRB ची स्थापना गृह मंत्रालयाकडून ११ मार्च १९८६ ला करण्यात आली. या विभागाचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे. हे विभाग देशभरात नोंद केल्या गेलेल्या खटल्यांचे विश्लेषन करून ‘भारतात गुन्हेगारी’ नावाचा अहवाल दरवर्षी प्रकाशित करते. ‘भारतात गुन्हेगारी’ ची पहिली आवृत्ती सन १९५३ मध्ये प्रकाशित केली गेली होती.



स्नेहलता श्रीवास्तव प्रथम महिला लोकसभा महासचिव
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी IAS (निवृत्त) अधिकारी स्नेहलता श्रीवास्तव यांची लोकसभा महासचिव पदावर नेमणूक केली आहे. यासोबतच त्या लोकसभा आणि लोकसभा सचिवालयाच्या प्रथम महिला महासचिव ठरल्या आहेत.

ही नियुक्ती १ डिसेंबर २०१७ पासून प्रभावी होणार आणि त्यांना कॅबिनेट सचिव स्तरचा दर्जा दिला गेला आहे.



IOA कडून भारतीय मुष्टियुद्ध महासंघाला अधिकृत मान्यता
भारतीय ऑलंपिक महामंडळ (IOA) ने भारतीय आर्मेचर मुष्टियुद्ध महासंघाला (IABF) देशामधील अधिकृत क्रीडा संघटना म्हणून मान्यता दिली आहे.

यापूर्वी IOA कडे असलेले IABF चे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते, मात्र या निर्णयानंतर आता IABF IOA चे संलग्न मंडळ असणार. IABF ला यापूर्वीच आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संघटना आणि क्रीडा मंत्रालयाकडून मान्यता मिळालेली आहे.

भारतीय आर्मेचर मुष्टियुद्ध महासंघ (Indian Amateur Boxing Federation -IABF) ही ऑलंपिक मुष्टियुद्ध क्रीडाप्रकारासाठीची भारताची राष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे आणि इंटरनॅशनल आर्मेचर बॉक्सिंग असोसिएशन (AIBA) चे भारताची सदस्य संघटना आहे. याचे नवी दिल्ली येथे मुख्यालय आहे. हिला सध्या AIBA कडून निलंबित केले गेले आहे. २५ फेब्रुवारी १९४९ रोजी IABF ची स्थापना झाली.

भारतीय ऑलंपिक महामंडळ (IOA) ही भारतामधील खेळाडूंना ऑलंपिक, आशियाई खेळ व अन्य आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी खेळाडूंची निवड करणारी आणि कार्यक्रमांमध्ये भारतीय संघाचे व्यवस्थापन करण्यास जबाबदार संघटना आहे. याची स्थापना १९२७ साली करण्यात आली.


विश्वचषकच्या बोधचिन्हाचे अनावरण
ओडिशाच्या भुवनेश्वरच्या कलिंगा क्रीडामैदानावर होणार्‍या ‘हॉकी पुरूष विश्वचषक २०१८’ चे बोधचिन्ह आणि कासवाच्या रूपात असलेले शुभंकर (मस्कट) यांचे अनावरण करण्यात आले आहे.

भारतात खेळल्या जाणार्‍या १४ व्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत एकूण १७ देश भाग घेणार आहेत. ही स्पर्धा २८ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर २०१८ या काळात खेळली जाणार आहे.

हॉकी विश्वचषक ही आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाद्वारे (IHF) आयोजित केली जाणारी आंतरराष्ट्रीय फील्ड हॉकी स्पर्धा आहे. १९७१ साली ही स्पर्धा सुरू करण्यात आली. दर चार वर्षांनी ही स्पर्धा आयोजित केली जाते.



देशातील प्रदूषणाला अमेरिका जबाबदार
भारतामध्ये दिल्लीसारख्या शहरांनी प्रदूषणाची धोक्याची पातळी गाठलेली असताना अमेरिकेसारखा मित्रदेशच भारताला अस्वच्छ इंधनाचा पुरवठा करत आहे.

तेल शुद्धीकरण प्रकल्पांमध्ये कच्च्या तेलावर प्रक्रिया केल्यानंतर बॅरलच्या तळाशी उरणाऱ्या डांबरासारख्या पदार्थाचा भारताला पुरवठा केला जात आहे. 

हा पदार्थ स्वस्त आणि जाळल्यानंतर कोळशापेक्षा उष्णता निर्माण करत असला तरीही हृदयाला धोकादायक असा अतिप्रमाणात कार्बन आणि फुप्फुसांना हानिकारक अशा सल्फरचे उत्सर्जन करत असल्याने प्रदूषण पातळीत वाढच होत आहे.एपी या वृत्तसंस्थेच्या चौकशीमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

भारत हा नेहमीच इंधनाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. अमेरिकेने काही वर्षांपूर्वीच स्वत:चे तेल उत्पादन सुरू केले आहे, परंतु देशभरात ‘पेटकोक’ प्रकारातील हा पेट्रोलियम पदार्थ पाठविण्याचे सोडून केवळ भारतालाच हे इंधन पाठविले जाते. 

२०१६ मध्ये अमेरिकेने तब्बल आठ दशलक्ष मेट्रिक टन पेटकोकचा भारताला पुरवठा केला आहे. हा पुरवठा २०१० पेक्षा २० पटींनी जास्त आहे. 

या इंधनाचा वापर भारतातील लाखोंनी असलेल्या कंपन्या आणि प्रकल्पांमध्ये करण्यात येतो. आणि याच कंपन्यांमधून घातक अशी प्रदूषित हवा वातावरणात सोडण्यात येत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.



जागतिक एड्स दिवस १ डिसेंबर 
जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या नेतृत्वात दरवर्षी १ डिसेंबर या दिवशी जगभरात ‘जागतिक एड्स दिवस’ साजरा केला जातो.

वर्ष २०१७ मध्ये हा दिवस ‘राइट टु हेल्थ (आरोग्याचा अधिकार)’ या विषयाखाली साजरा केला जात आहे. ‘एव्हरीबडी काऊंट्स’ हे यावर्षीचे घोषवाक्य आहे.

आज जगभरात ३६.७ दशलक्ष लोक HIV-ग्रस्त जीवन जगत आहेत.



भारत आणि ब्रिटन यांच्या ‘अजय वॉरियर – २०१७’ या लष्करी सरावाला सुरवात
राजस्थानच्या बीकानेर येथील महाजन फायरिंग क्षेत्रात १ डिसेंबर २०१७ पासून भारतीय आणि ब्रिटनच्या लष्करांमधील ‘अजय वॉरियर – २०१७’ या संयुक्त लष्करी सरावाला सुरवात झाली.

‘अजय वॉरियर’ सराव मालिकेमधील हा (२०१३, २०१५ नंतर) तिसरा सराव आहे. हा युद्धाभ्यास १६ डिसेंबर २०१७ पर्यंत चालणार आहे. यात भारतीय लष्कराची २० राजपूताना राइफल्स तुकडी आणि ब्रिटनची प्रथम बटालियन रॉयल एंग्लिकन रेजिमेंटची तुकडी यांनी भाग घेतला.