एक रूपयाची नोट झाली शंभर वर्षांची!
ब्रिटीश सरकारने एक रूपयाची नोट चलनात आणून गुरूवारी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या शंभर वर्षांत एक रूपयाच्या नोटेने पाचव्या जॉर्जच्या छायाचित्रापासून महात्मा गांधी, अशोक स्तंभापर्यंतचा प्रवास केला आहे. 



ब्रिटीश सरकारने सर्वात प्रथम एक रूपयाची नोट ३० नोव्हेंबर १९१७ मध्ये चलनात आणली. या नोटेवर पाचव्या जॉर्जचे छायाचित्र होते. या नोटेची पांढऱ्या हातकागदावर छपाई केली होती. एक रूपयाची नोट चेकबुकप्रमाणे पंचवीस नोटांच्या संख्येत मिळत होती. 

२३ वर्षांनी म्हणजे २४ जुलै १९४० मध्ये छापलेल्या एक रूपयाच्या नोटेवर पाचव्या जॉर्जचे तर २४ जुलै १९४४ मध्ये काढलेल्या नोटेवर सहाव्या जॉर्जचे छायाचित्र होते. 

स्वतंत्र भारतातील पहिली एक रूपयाची नोट १२ ऑगस्ट १९४९ मध्ये चलनात आली. यावर अर्थ सचिव के. आर. के. मेनन यांची सही होती. त्यानंतर १९५० व १९५३ मध्ये व्हॉयलेट रंगात छापलेल्या एक रुपयाच्या नोटेवर के. जी. आंबेगावकर यांची सही होती. 

महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त (२ ऑक्टोंबर १९६९) छापलेल्या एक रूपयाच्या नोटेवर महात्मा गांधीचे छायाचित्र होते तर अर्थसचिव डॉ.आय.जी. पटेल यांची सही होती. 

एक रूपयाच्या नोटांच्या छपाईसाठी खर्चामध्ये वाढ होत असल्याचे कारण देत १९९४ नंतर एक रूपया नोटेची छपाई बंद करण्यात आली. त्यानंतर तब्बल २२ वर्षांनी म्हणजेच २०१६ मध्ये पुन्हा एक रूपया नोटेची छपाई सुरू करण्यात आली. 



एअर इंडियाचे नवे सीएमडी प्रदीप सिंह खरोला
वरिष्ठ आयएएस अधिकारी प्रदीप सिंह खरोला यांची एअर इंडियाच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी (सीएमडी) निवड करण्यात आली आहे. खरोला हे कर्नाटक कॅडरचे असून सध्या ते बेंगळुरुतील मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालकपदी कार्यरत होते.

ऑगस्टमध्ये एअर इंडियाचे सीएमडी अश्वनी लोहानी यांची रेल्वे मंडळाच्या प्रमुखपदी निवड झाली होती. यानंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने राजीव बन्सल यांची तीन महिन्यांसाठी एअर इंडियाच्या सीएमडीपदी नियुक्ती केली होती. 

एअर इंडियांवर सुमारे ५०००० कोटींचे कर्ज असून एअर इंडियाचे खासगीकरण करण्याच्या दिशेने सरकारच्या हालचाली सुरु आहेत. त्यामुळे खरोला यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.



सर्वोत्कृष्ट चित्रपट गोल्डन पिकॉक पुरस्कार
मोरोक्को इथे जन्मलेले फ्रेंच दिग्दर्शक रॉबिन कॅम्‍पीलो यांच्या ‘वन ट्वेंटी बिट्स पर मिनिट’ या चित्रपटाने ४८ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ‘गोल्डन पिकॉक’-सुवर्ण मयुर पुरस्कार मिळवला. 

१९९० च्या दशकातल्या फ्रान्समधल्या आयुष्यावर आधारीत हा चित्रपट समलैंगिकता आणि एड्स या विषयावर भाष्य करतो. यंदाच्या ‘कांस’ चित्रपट महोत्सवात हा चित्रपट पहिल्यांदा दाखवला गेला, तर भारतात इफ्फीमध्ये त्याचा प्रिमियर शो झाला. 

हुएल पेरेझ बिस्कायार्ट यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात अरनॉड व्हॅलोयस आणि अॅडेले हेनेल यांच्याही भूमिका आहेत. नहुएल पेरेझ बिस्कायार्ट यांना ‘वन ट्वेंटी बिट्स पर मिनिट’ या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

इफ्फीच्या समारोपाच्या दिवशी २८ नोव्हेंबर रोजी या चित्रपटाच्या नावाची घोषणा झाली. ४० लाख रुपये, सुवर्ण मयुराची प्रतिमा आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. 

याच महोत्सवात चीनचे दिग्दर्शक व्हीव्हीयन क्यू यांच्या ‘अँजल्स वेअर व्हाईट’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार म्हणून रजत मयुर आणि १५ लाख रुपये दिले जातील. 

चीनमधल्या एका छोट्या गावात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारांची कहाणी सांगणारा हा चित्रपट आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना वाचा फोडणाऱ्या या सामाजिक चित्रपटातून ही समस्या प्रभावीपणे मांडली आहे.



बी. एन. शर्मा  राष्ट्रीय नफेखोरी रोधी प्राधिकरण (NAA) चे अध्यक्ष
वस्तू आणि सेवा कर (GST) अंतर्गत नवनिर्मित ‘राष्ट्रीय नफेखोरी प्रतिबंधक प्राधिकरण (NAA)’ च्या अध्यक्ष पदावर १९८५ सालचे IAS अधिकारी बी. एन. शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या सचिव स्तरावरच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली या प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार असून केंद्र वा राज्यांमधून चार तंत्रविषयक सदस्यांचा यात समावेश असणार.


सुरीना राजन BIS च्या महासंचालिका
भारतीय मानक ब्यूरो (BIS) च्या महासंचालक पदावर १९८५ सालच्या IAS अधिकारी सुरीना राजन ह्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती अलका पांडा ह्यांच्या जागेवर झाली आहे. 

भारतीय मानक ब्यूरो भारतामध्ये राष्ट्रीय मानक निर्धारित करणारी संस्था आहे. ही ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयांतर्गत कार्य करते. यापूर्वी याचे नाम ‘भारतीय मानक संस्था ‘ (Indian Standards Institution / ISI) असे होते, जी सन १९४७ मध्ये स्थापन केली गेली होती. 

भारतीय मानक अधिनियम १९८६ अन्वये २३ डिसेंबर १९८६ रोजी BIS कार्यान्वित झाले. ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे प्रमुख यांच्याकडे BIS चे प्रशासकीय नियंत्रण असते. BIS चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आणि कोलकाता, चेन्नई, मुंबई, चंदीगड आणि दिल्ली येथे प्रादेशिक कार्यालये व 20 शाखा कार्यालये आहेत.



एन. के. सिंग १५ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष
माजी संसदीय सभासद आणि महसूल सचिव एन. के. सिंह यांना १५ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले आहे. त्यांचा कार्यकाळ ३० ऑक्टोबर २०१९ पर्यंत असेल.

आयोगाचे अन्य सभासद म्हणजे वित्त मंत्रालयाचे माजी सचिव शक्तिकांत दास, माजी मुख्य आर्थिक सल्लागार अशोक लाहिडी, NITI आयोगाचे सदस्य रमेश चंद आणि जॉर्जटाऊन विद्यापीठामधील प्रा. अनूप सिंह.

आयोग आपला अहवाल ऑक्टोबर २०१९ पर्यंत सादर करतील. 

१५ वा वित्त आयोग १ एप्रिल २०२० पासून पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी आपल्या शिफारसी प्रदान करणार.

वित्त आयोगाची स्थापना हे संविधानाच्या कलम २८० (१) नुसार एक नियतकालिक कायदेशीर बंधन आहे. 

यापूर्वी १९ एप्रिल २०१५ पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी शिफारशी करण्यासाठी १४ वे वित्त आयोग स्थापन केले गेले. आयोगाने १५ डिसेंबर २०१४ पर्यंत आपला अहवाल सादर केला. १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशी आर्थिक वर्ष २०१९ पर्यंत वैध आहेत.



शक्तिकांत दास भारताचे जी-२० शेरपा
आर्थिक व्यवहार विभागाचे माजी सचिव शक्तिकांत दास यांना जी-२० मध्ये भारताचे शेरपा म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ही नियुक्ती ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत प्रभावी असणार. त्यांना अरविंद पनगारीया यांच्या जागेवर नियुक्त करण्यात आले आहे.

भारताचे शेरपा जी-२० मध्ये देशाचा अधिकारिक प्रतिनिधी असतो आणि जी-२० मध्ये विकाससंबंधी वाटाघाटीसाठी जबाबदार असतो. 

जी-२० हा जगातल्या २० प्रमुख अर्थव्यवस्थांच्या २० वित्त मंत्र्यांचा आणि केंद्रीय बँकांचे गवर्नर यांचा समूह आहे. या समूहात भारताला पकडून १९ देश आणि यूरोपीय संघाचा समावेश आहे. या समूहाचे प्रतिनिधित्व यूरोपीय परिषदेचे अध्यक्ष आणि यूरोपीय केंद्रीय बँकेद्वारा केले जाते. या समूहाची स्थापना १९९९ साली झाली.



पंकज अडवाणीने १८ वा जागतिक स्नूकर किताब जिंकला
भारताचा स्नूकर विश्वविजेता पंकज अडवाणी याने ‘IBSF जागतिक स्नूकर चॅम्पियनशिप २०१७’ स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त केले आहे. हा त्याचा १८ वा जागतिक स्नूकर किताब आहे. कतारच्या दोहा शहरात खेळल्या गेलेल्या स्पर्धेत अंतिम सामन्यात इरानच्या आमिर सरखोशचा पराभव केला.

इंटरनॅशनल बिलियर्ड्स आणि स्नूकर फेडरेशन (IBSF) ही एक संस्था आहे, जी जगभरात गैर-व्यावसायिक स्नूकर आणि इंग्लिश बिलियर्ड्स खेळांचे आयोजन करते. याची स्थापना १९७१ साली करण्यात आली. महासंघाचे दुबई (संयुक्त अरब अमीरात) मध्ये मुख्यालय आहे.



उत्तर कोरियाकडून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी
उत्तर कोरियाने २९ नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली. हे क्षेपणास्त्र जपानच्या विशिष्ट आर्थिक क्षेत्रात जाऊन पडले. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता लक्षात घेतल्यास वॉशिंग्टन आणि अमेरिकेचा पूर्वेकडील किनारा उत्तर कोरियाच्या टप्प्यात येतो. 

उत्तर कोरियाच्या दक्षिण प्योंगयांग प्रांतातून क्षेपणास्त्र डागण्यात आल्याचे वृत्त दक्षिण कोरियाची वृत्तसंस्था योनहापने दिले. 



म्यानमारच्या औंग सन सु की यांचा ‘फ्रीडम ऑफ ऑक्सफर्ड’ सन्मान काढून घेतला
ऑक्सफर्ड सिटी कौन्सिलने म्यानमारच्या नेत्या औंग सन सु की यांना दिलेला ‘फ्रीडम ऑफ ऑक्सफर्ड’ सन्मान काढून घेण्यात आला आहे.

म्यानमारमधील हिंसाचारामुळे रोहिंग्या लोकांना त्यांचे घर सोडून शेजारी बांग्लादेशात पळावे लागलेल्याच्या पार्श्वभूमीवर सु की यांनी दिलेल्या अपुर्‍या प्रतिसादाला प्रतिक्रिया म्हणून ऑक्सफर्ड सिटी कौन्सिलने हा निर्णय घेतला.

१९९७ साली ‘लोकशाहीसाठी दीर्घ लढा’ दिल्याबद्दल सु की यांना ऑक्सफर्ड सिटी कौन्सिलकडून ‘फ्रीडम ऑफ ऑक्सफर्ड’ हा सन्मान दिली गेला होता.



भारत आणि ग्रीस यांच्यात हवाई सेवा करार 
ग्रीसचे विदेश मंत्री निकोस कोत्झीयास यांच्या भारत दौर्‍यादरम्यान दोन्ही देशांमध्ये हवाई सेवा क्षेत्रात सामंजस्य करार करण्यात आला आहे.
याशिवाय नवीन व नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात सहकार्य चालविण्यासाठी आणखी एक सामंजस्य करार केला गेला.

ग्रीस हा आग्नेय युरोपमधील एक देश आहे. अथेन्स ही या देशाची राजधानी आहे आणि देशाचे चलन युरो हे आहे.