सलील पारेख यांची इन्फोसेसच्या CEO पदी नियुक्ती
भारतातील अग्रगण्य आयटी कंपन्यांपैकी एक असणाऱ्या इन्फोसिसने आज सलील एस. पारेख यांची कंपनीच्या मुख्याधिकारी (सीईओ) आणि मॅनेजिंग डायरेक्टर (व्यवस्थापन संचालक) पदी नियुक्ती केली. 


दोन जानेवारीपासून ते पदभार स्वीकारतील.  
या नियुक्तीमुळे मुख्याधिकारी पदासाठी सुरु असलेला इन्फोसिसचा शोध संपला आहे.

सध्या पारेख हे मुळची फ्रान्सची असणारी आयटी कंपनी ‘कॅपजेमीनी’चे ग्रुपच्या कार्यकारी बोर्डाचे सदस्य आहेत. 

त्यांनी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापिठातून कंप्युटर सायन्स आणि मेकॅनिकल इंजिनियरिंगमध्ये मास्टर्सची पदवी घेतली आहे.
तसेच मुंबई आयआयटीमधून अॅरोनॉटिकल इंजिनियरींमध्ये बॅचरल ऑफ टेक्नॉलॉजी (बी. टेक.)चे शिक्षण घेतले आहे.

कंपनीचे सहसंस्थापक असलेले नंदन निलकेणी हेच इन्फोसिसचे अकार्यकारी अध्यक्ष रहातील. कंपनीचे हंगामी मुख्याधिकारी यू. बी. प्रवीण राव यांना मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बढती मिळाली आहे.



भारताचे माजी सरन्यायाधीश ए. एस. आनंद यांचे निधन
माजी भारतीय सरन्यायाधीश (CJI) आदर्श सेन आनंद यांचे नवी दिल्लीत वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले.

आनंद भारताचे २९ वे CJI होते. त्यांनी १० ऑक्टोबर १९९८ ते ३१ ऑक्टोबर २००१ पर्यंत CJI पद सांभाळले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. त्यामध्ये त्यांचे ‘द कॉन्सटीट्यूशन ऑफ जम्मू अँड कश्मीर – इट्स डेवलपमेंट अँड कमेंट्स’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

भारतीय सरन्यायाधीश (CJI) हे भारताच्या न्यायव्यवस्थेचे आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख आहेत. 

भारतीय घटनेच्या कलम १४५ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीचे नियम १९६६ अन्वये, CJI सर्व न्यायाधीशांना एखाद्या प्रकरणासंबंधी कामकाजाचे वाटप करू शकतात. १९५० साली न्या. एच. जे. कानिया हे प्रथम CJI होते.



एस. के. चौरसिया आयुध कारखाना मंडळाचे नवे अध्यक्ष
सुनील कुमार चौरसिया यांची आयुध कारखाना (Ordnance Factories) चे महानिदेशक आणि आयुध कारखाना मंडळ (OFB) चे अध्‍यक्ष या पदांवर नेमणूक करण्यात आली आहे.

ही नवी नियुक्ती १ डिसेंबर २०१७ पासून प्रभावी आहे. OFB देशातील ३९ आयुध कारखान्यांचे संचालन करतात. चौरसिया हे IOFS अधिकारी आहेत.



राष्ट्रपतींच्या हस्ते नागालँडमध्ये १८ व्या हॉर्नबिल महोत्सवाचा शुभारंभ
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते १ डिसेंबर २०१७ रोजी किसामा गावात नागालँडमधील ‘हॉर्नबिल महोत्‍सव २०१७’ आणि राज्य स्थापना दिवसनिमित्त कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले आहे.

दरवर्षी नागालँडमध्ये आयोजित होणारा हॉर्नबिल महोत्‍सव हा संगीत, नृत्‍य आणि पाककृती या क्षेत्रात नगा समुदायाची समृद्ध संस्‍कृती आणि परंपरांचे प्रदर्शन आहे.



दिया मिर्झा UNEP ची सदभावना दूत
भारतीय अभिनेत्री दिया मिर्झा हिला भारतासाठी संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) ची सद्भावना दूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

दिया या नव्या भूमिकेत पर्यावरणसंबंधी मुद्द्यांवर जागृती निर्माण करणार. याशिवाय दिया मिर्झा वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया (WTI) ची सुद्धा ब्रॅंड अँबेसडर आहे.

संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) हा ५ जून १९७२ रोजी स्थापन करण्यात आलेला संयुक्त राष्ट्रसंघाचा एक विभाग आहे, जे पर्यावरणविषयक धोरणे आणि पद्धती यांच्या अंमलबजावणीमध्ये मदत करते. याचे मुख्यालय नैरोबी (केनिया) येथे आहे.



आंध्रप्रदेश विधानसभेत ‘कापू’ जातीला ५% आरक्षण देणारे विधेयक पारित
आंध्रप्रदेश विधानसभाने राज्य शासनाच्या अखत्यारीत नोकरीमध्ये आणि शिक्षण संस्थांमध्ये ‘कापू’ जातीला ५% आरक्षण प्रदान करणारा विधेयक मंजूर केला आहे.

शासनाने एक वेगळी श्रेणी ‘फ’ बनवून वंचित वर्गांमध्ये जातीला समाविष्ट केले आहे. मात्र केंद्र शासनाने आरक्षणाची ५०% मर्यादा या आरक्षणाने पार केली आहे.


सहा व्दिशतके करणारा विराट पहिला कर्णधार
विक्रमामागून विक्रम रचणाऱ्या कर्णधार विराट कोहलीने ३ डिसेंबर रोजी आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. कसोटी क्रिकेटमध्ये सहावे व्दिशतक झळकावून त्याने सर्वाधिक व्दिशतके करणारा कर्णधार म्हणून आपली ओळख निर्माण केली. 

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने २३८ चेंडूत व्दिशतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीत २० चौकारांचा समावेश होता. 

विराटने २ डिसेंबर रोजी सामन्याच्या पहिल्या दिवशी कारकिर्दीत ५००० धावांचा टप्पा पूर्ण केला होता. 

भारताकडून सर्वाधिक व्दिशतके करण्याचा मान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग (६ व्दिशतके) यांच्या नावावर होता. विराटने यांची बरोबरी केली आहे. 

याबरोबरच एकपाठोपाठ एक व्दिशतके करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी विनोद कांबळीने १९९३ मध्ये इंग्लंडविरुद्ध २२४ आणि झिंबाब्वेविरुद्ध २२७ धावा केल्या होत्या.



इराणमधील चाबहार बंदराचे उद्घाटन
भारताच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या इराणमधील चाबहार बंदराच्या पहिल्या विस्तारित टप्प्याचे ३ डिसेंबर रोजी इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 

या बंदरामुळे भारताला इराणमधून अफगाणिस्तानशी संपर्क साधता येणार आहे. तसेच येथून पूर्वेला केवळ ८० किलोमीटर अंतरावर पाकिस्तानच्या किनाऱ्यावर चीन विकसित करत असलेल्या ग्वादर या बंदराला शह देता येणे शक्य होणार आहे.

उद्घाटनाच्या कार्यक्रमाला इराण, भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान यांच्यासह अन्य देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. भारताच्या वतीने सागरी वाहतूक मंत्रालयाचे राज्यमंत्री पोन राधाकृष्णन हे उपस्थित होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे २०१६ मध्ये इराणला दिलेल्या भेटीत भारत, इराण आणि अफगाणिस्तानमध्ये संपर्क विकसित करण्याचा त्रिपक्षीय करार करण्यात आला. त्यानुसार भारत इराणला चाबहार बंदर विकसित करण्यास मदत करणार आहे. 

तसेच इराणमधून पुढे अफगाणिस्तानमधील झरंज आणि देलाराममार्गे थेट काबुलपर्यंत रस्ता व रेल्वे मार्ग विकसित केला जाणार आहे. याशिवाय चाबहारच्यापुढे मध्य आशियातील देश आणि थेट रशियाशी संपर्क साधण्याची योजना आहे.



भारत आंतरराष्ट्रीय सागरी संघटना परिषदेचा पुन्हा एकदा सदस्य
आंतरराष्ट्रीय सागरी संघटना (IMO) परिषदेमध्ये भारत ‘श्रेणी-ब’ अंतर्गत पुन्हा एकदा निवडून आले आहे. परिषदेच्या सभासद जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भारताला १४४ मते प्राप्त झालीत, तर सर्वाधिक मते जर्मनीला (१४६) प्राप्त झाली आहेत.

परिषदेत निवडून आलेल्या अन्य देशांमध्ये ऑस्ट्रेलियाला (१४३), फ्रान्स (१४०), कॅनडा (१३८), स्पेन (१३७), ब्राझील (१३१), स्वीडन (१२९), नेदरलँड (१२४) आणि संयुक्त अरब अमीरात (११५) यांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय सागरी संघटना (International Maritime Organization -IMO) ही १९८२ सालापर्यंत आंतरसरकारी सागरी सल्लागार संघटना (IMCO) म्हणून ओळखली जात होती. 

IMO हे जलवाहतुकीचे नियमन करण्यासाठी त्यासंबंधी सर्व बाबी हाताळण्यासाठी जबाबदार असलेली संयुक्त राष्ट्रसंघाचे एक विशेष विभाग आहे. 

IMO ची स्थापना IMCO म्हणून १९४८ साली करण्यात आली आणि ते १९५९ साली प्रभावी झाले. IMO चे लंडन (ब्रिटन) मध्ये मुख्यालय आहे. IMO मध्ये १७२ सदस्य राष्ट्र आणि तीन सहकारी सदस्य आहेत. भारत प्रारंभीक सदस्यच्या रूपात (सन १९८३ आणि सन १९८४ वगळता) सन १९५९ सालापासून IMO चा सदस्य आहे.