वाराणसीत 15 वी ‘प्रवासी भारतीय दिवस परिषद’ आयोजित
‘प्रवासी भारतीय दिवस 2019’ निमित्त उत्तरप्रदेश राज्याच्या वाराणसी शहरात ‘रोल ऑफ इंडियन डायस्पोरा इन बिल्डिंग न्यू इंडिया’ या संकल्पनेखाली एक परिषद भरविण्यात आली आहे.


21 जानेवारी 2019 रोजी सुरू झालेल्या तीन दिवसांच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले गेले. याशिवाय, तेथे ‘युवा प्रवासी भारतीय दिवस’ हा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला.

‘प्रवासी भारतीय दिन’ भारताच्या विकासामध्ये परदेशात असलेल्या भारतीय समुदायाच्या योगदानाला चिन्हांकित करण्यासाठी दरवर्षी ‘9 जानेवारी’ या दिवशी साजरा केला जातो. 

9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेमधून भारतात परतले आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केले. त्यामुळे ही तारीख प्रवासी भारतीय दिन म्हणून निवडण्यात आली. मात्र या वर्षी (सन 2019) पहिल्यांदाच प्रवासी भारतीय दिवसांचे आयोजन 9 जानेवारीऐवजी 21 जानेवारी ते 23 जानेवारी या काळात केले जात आहे. 

प्रयागराजमधील कुंभ मेळाव्यात भाग घेण्यास आणि राष्ट्रीय राजधानीत होणारे प्रजासत्ताक दिनाचे पथ संचलन बघण्याची परवानगी देण्याच्या उद्देशाने तिथीमध्ये बदल करण्यात आले.



सिद्धगंगा मठाचे मठाधीश शिवकुमार स्वामी यांचे निधन
कर्नाटकातील सिद्धगंगा मठाचे मठाधीश शिवकुमार स्वामी यांचे  21 जानेवारी 2019 रोजी वयाच्या 111 व्या वर्षी निधन झाले.

शिवकुमार स्वामी लिंगायत समुदायाच्या सिद्धगंगा या मुख्य मठाचे प्रमुख होते. 2007 साली त्यांच्या 100व्या जन्मदिनी त्यांना कर्नाटक राज्याचा सर्वोच्च पुरस्कार ‘कर्नाटक रत्न’ने गौरवले गेले होते. 

2015 साली पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. हा मठ बंगळुरूपासून 80 किमीवरील तुमकुरु येथे आहे. हा मठ 300 वर्षांपूर्वीचा आहे.



जगभरात भारत हा सर्वात विश्वसनीय राष्ट्र आहे: GTI अहवाल
दाव्होस (स्वित्झर्लंड) येथे आयोजित जागतिक आर्थिक मंच (WEF) याच्या वार्षिक बैठकीत ‘2019 एडेलमन ट्रस्ट बॅरोमीटर’ शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला गेला

या अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘ग्लोबल ट्रस्ट इंडेक्स’ अनुसार, सरकार, व्यवसाय, स्वयंसेवी संस्था आणि प्रसारमाध्यमांच्या बाबतीत भारत हा जगातील सर्वात विश्वासार्ह देशांपैकी एक ठरला आहे, परंतु देशाचे ब्रँड तितकेसे विश्वासार्ह नाहीत.

‘ग्लोबल ट्रस्ट इंडेक्स’ म्हणजे अशासकीय संस्था, व्यवसाय, सरकार आणि प्रसारमाध्यमांमधील सरासरी टक्केवारीत स्पष्ट केलेला विश्वास होय.


रियो डी जनेरो: 2020 सालासाठी UNESCOची ‘वास्तुकलेची जागतिक राजधानी’
संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) याने 2020 सालासाठी आपली ‘वास्तुकलेची जागतिक राजधानी’ (World Capital of Architecture) म्हणून ब्राझील देशाच्या ‘रियो डी जनेरो’ या शहराची निवड केली आहे.

UNESCO आणि आंतरराष्ट्रीय आर्किटेक्ट संघटना (UIA) या संघटनांनी नोव्हेंबर 2018 मध्ये ‘वास्तुकलेची जागतिक राजधानी’ या शीर्षकाखाली नव्या उपक्रमाला संयुक्तपणे सुरूवात केली. याउपक्रमाच्या अंतर्गत रियो डी जनेरो या शहराची प्रथमच निवड करण्यात आली आहे.

ब्राझिलीया हे राजधानी शहर उभारणार्‍या ऑस्कर निमेयर या प्रख्यात वास्तुकलाकाराची उभी मूर्ती ब्राझील देशात आहे.



नेपाळच्या केंद्रीय बँकेनी भारतीय चलन वापरण्यास बंदी घातली
नेपाळची ‘नेपाळ राष्ट्र बँक’ या केंद्रीय बँकेनी 100 रुपये किंवा त्याखालील मूल्य असलेले भारतीय चलन वगळता त्यावरील भारतीय बँक नोटांचा देशात वापर करण्यावर बंदी घातली आहे.

नेपाळमध्ये भारतीय चलनांचा दैनंदिन व्यवहारांमध्ये वापर केला जातो. नव्या निर्णयानुसार 2000, 500 आणि 200 हे मूल्य असलेल्या भारतीय चलनी नोटांचा वापर आता नेपाळमध्ये केला जाणार नाही.

नेपाळ हा एक दक्षिण आशियाई देश आणि भारताचा शेजारी देश आहे. हा हिमालय पर्वतराजीमध्ये वसलेला भूपरिवेष्टित देश आहे. ‎काठमांडू ही देशाची राजधानी आहे. नेपाळी रुपया (NPR) हे राष्ट्रीय चलन आहे.