पार्श्वभूमी
१९५० साली जगाची लोकसंख्या २.५ अब्ज होती. अवघ्या ३७ वर्षात दिनांक 11 जुलै 1987 रोजी जागतिक लोकसंख्या सुमारे 5 अब्ज बनली होती. त्यामुळे लोकसंख्येची वाढ हा सार्वजनिक स्तरावरील सर्वाधिक स्वारस्यपूर्ण विषय बनला होता. 


या स्वारस्यात दिवसेंदिवस वाढ होत राहिल्यामुळे लोकसंख्यावाढीच्या संदर्भात अनेक कार्यक्रम राबविण्यात येऊ लागले. सन 1989 मध्ये ‘संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकासविषयक कार्यक्रमा’च्या (UNDP) संचालक मंडळाने 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून जगभर साजरा केला जावा, अशी शिफारस केली. 

या शिफारशीनुसार, सन 1989 पासून 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम जगभर आयोजित केले जातात. लोकसंख्यावाढीमुळे जाणवणार्‍या समस्यांकडे लोकांचे लक्ष वेधणे, त्याविषयी जनजागृती करणे आणि या समस्येशी लढा देणे यासाठी हा दिवस साजरा केला जातो.जागतिक लोकसंख्येबद्दलची आकडेवारी
एप्रिल 2019 पर्यंतची जागतिक लोकसंख्या – 770 कोटी

जागतिक लोकसंख्येला 100 कोटींचा टप्पा गाठण्यासाठी 2 लक्ष वर्षांचा कालावधी लागला. तर जागतिक लोकसंख्येनी 100 कोटींवरुन 700 कोटींचा आकडा अवघ्या 200 वर्षांमध्ये गाठला.

1955 ते सन 1975 या काळात जागतिक लोकसंख्या वाढ सर्वाधिक म्हणजे वर्षाला 1.8 टक्क्यांनी वाढली. सन 2010 ते सन 2015 या काळात जागतिक लोकसंख्येची वाढ 1.2 टक्क्यांनी घटली.

2050 पर्यंत जागतिक लोकसंख्येचा आकडा 1 हजार कोटींपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. सन 2100 मध्ये जागतिक लोकसंख्या 1100 कोटी इतकी असण्याची शक्यता आहे.

2018च्या आकडेवारीनुसार जागतिक लोकसंख्येचे सरासरी वयोमान 30 वर्षे 4 महिने इतके आहे.

सर्वाधिक लोकसंख्या असणारे खंड: 
 • आशिया (लोकसंख्या: 443.6 कोटी)
 • आफ्रिका (121.6 कोटी)
 • युरोप (73.8 कोटी)
 • उत्तर अमेरिका (57.9 कोटी)
 • दक्षिण अमेरिका (42.2 कोटी)
 • ऑस्ट्रेलिया (39.9 कोटी)
 • अंटार्टिका (1200 अस्थायी बहुतेक संशोधक).

2014 च्या आकडेवारीनुसार सर्वाधिक लोकसंख्या असणारे देश (प्रथम दहा): चीन, भारत, अमेरिका, इंडोनेशिया, पाकिस्तान, ब्राझील, नायझेरिया, बांग्लादेश, रशिया, जपान. 438 कोटी लोक या दहा देशांमध्ये राहतात. हा आकडा जागतिक लोकसंख्येच्या 57 टक्के इतका आहे.


2027 मध्ये भारत चीनला मागे टाकत जगातला सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश होण्याची शक्यता आहे.

भारत
आज भारताची लोकसंख्या 133 कोटी इतकी आहे, जी जागतिक लोकसंख्येच्या जवळपास 17.5 टक्के आहे. भारत 2020 सालापर्यंत जगातला सर्वात तरुण देश बनणार आहे, ज्यात 64 टक्के तरुण असतील.

गर्भधारणा-संबंधित गुंतागुंतीमुळे दररोज सुमारे 800 महिला मृत्युमुखी पडतात आणि यापैकी 20 टक्के मृत्यू भारतात होतात. भारतात प्रसूतीदरम्यान मृत्यूचा दर 2007 च्या तुलनेत 83 टक्के कमी झाला आहे म्हणजेच 2012 साली प्रत्येक 100,000 जन्मात 178 मृत्यू झाले, जे 2007 साली 212 होते.जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याची उद्दिष्टे
 • मुले आणि मुलींचे (दोन्ही लिंगांच्या) तरुणाईचे समान संरक्षण करणे आणि त्यांचे सक्षमीकरण करणे.
 • तरुण-तरुणींना आपल्या जबाबदार्‍या समजून घेण्याची क्षमता येईपर्यंत त्यांना लैंगिकता आणि उशिरा लग्न करण्यासंबंधीची तपशीलवार माहिती देणे.
 • संततीनियमनविषयक योग्य साधने वापरून आणि उपाययोजना योजून अनैच्छिक गर्भारपण टाळण्यासाठी तरुणाईला शिक्षित करणे.
 • समाजातून लिंगनिहाय तेच ते (स्टिरिओटाईप) दृष्टिकोन हद्दपार करण्यासाठी लोकांना शिक्षित करणे.
 • कमी वयातील प्रसूतीच्या धोक्यांविषयी जागृती करण्यासाठी गर्भारपणाशी संबंधित आजारांविषयी शिक्षित करणे.
 • लैंगिक संबंधातून संक्रमित होणार्‍या आजारांविषयी शिक्षित करणे.
 • मुलींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी काही प्रभावी कायदे करण्याची आणि धोरणे आखण्याची मागणी करणे.
 • मुलांना आणि मुलींना समान प्राथमिक शिक्षण मिळेल याची खात्री करणे.
 • मूलभूत प्राथमिक आरोग्याचा एक भाग म्हणून प्रत्येक जोडप्याला प्रजननविषयक आरोग्य सेवा सहजगत्या सर्वत्र उपलब्ध होतील याची खात्री करून घेणे.