प्रदूषणकारी ड्युकोल कंपनी बंद करण्याचा आदेश
कंपनीतील प्रदूषणामुळे परिसरातील मानवी वस्तीबरोबरच श्‍वान-चिमण्यांसारख्या मुक्‍या प्राण्यांवरही विपरीत परिणाम होण्यास कारणीभूत ठरणारी तळोजा औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) डुकॉल ऑर्गेनिक्‍स ऍण्ड कलर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी बंद करण्याचा आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) दिला. 


एमआयडीसीतील प्रदूषणामुळे श्‍वान, तसेच चिमण्यांचे रंगही निळे झाल्याची बातमी प्रसिद्ध केल्यानंतर प्रदूषणाचा मुद्दा सातत्याने लावून धरल्यामुळे अखेर ‘एमपीसीबी’ला ही कारवाई करावी लागली. 

२४ तासांत या कंपनीचा वीज आणि पाणीपुरवठा बंद करण्याचे निर्देश एमपीसीबीने दिले आहेत, त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनाही दिलासा मिळाला आहे. 

आशिया खंडातील सर्वांत मोठी तळोजा औद्योगिक वसाहत प्रदूषणामुळे पोखरून निघाली आहे. या प्रदूषणाचा फटका मानवाबरोबरच मुक्‍या जिवांनाही बसत असल्याचे वर्तमानपत्राने उघड केले होते.

आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही त्याची दखल घेतली होती. या पार्श्‍वभूमीवर ‘एमपीसीबी’चे प्रादेशिक अधिकारी अनिल मोहेकर यांनी परिसराचा दौरा केला. पाहणीदरम्यान वृत्तात तथ्य आढळून आल्यानंतर मोहेकर यांनी कंपनी बंद करण्याचा आदेश दिला.




इन्फोसिसचे सीईओ विशाल सिक्का यांचा राजीनामासातत्याने होत असलेल्या खोट्या, निराधार, बदनामीकारक आणि वैयक्तिक हल्ल्यांमुळे आपण राजीनामा देत असल्याचे सांगत इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विशाल सिक्का यांनी कंपनीला राजीनामा दिला. 

विशेष म्हणजे, कंपनीचे सहसंस्थापक एन.आर. नारायण मूर्ती यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या आरोपांना कंटाळून सिक्का यांनी राजीनामा दिला असल्याचे कंपनीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

दोन लाखांहून अधिक कर्मचारी असलेल्या इन्फोसिसच्या नवीन एमडी आणि सीईओंची नियुक्ती आता ३१ मार्च २०१८ पर्यंत करण्यात येणार आहे. तोपर्यंत विद्यमान परिचालन अधिकारी प्रवीण राव यांची हंगामी सीईओ म्हणून नेमणूक करण्यात आली.

तसेच कंपनीचे काम सुरळीत चालावे, यासाठी सिक्का काही काळ कार्यकारी उपाध्यक्षपदी राहतील. वार्षिक १ डॉलर वेतनावर ते नव्या सीईओचा शोध घेण्यास मदत करणार आहेत.



५० रुपयांची नवीन नोट येणार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 50 रूपयांच्या नव्या नोटेची घोषणा केली असून लवकरच ती बाजारात येणार आहे.

50 रूपयांच्या या नव्या नोटेवर महात्मा गांधींचे छायाचित्र असेल. तसेच या नोटेवर बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल.

या नव्या नोटेवर देशाचा सांस्कृतिक वारसा दाखवण्यात आला आहे. नोटेच्या मागील बाजूस विजयनगर साम्राज्याची राजधानी हंपीचे छायाचित्र आहे.

गतवर्षी डिसेंबर महिन्यातच आरबीआयने लवकरच 50 आणि 20 रूपयांच्या नव्या नोटा चलनात येणार असल्याचे जाहीर केले होते.

50 रूपयांच्या नव्या नोटेचा रंग हा फिकट निळा आहे. ही नोट आकाराने 135 मिमी लांब आणि 66 मिमी रूंद आहे. त्याचबरोबर यामध्ये अनेक डिझाइन आणि पॅटर्न आहेत.

नोटेच्या वरील भागात डाव्याबाजूस 50 असे अंकी लिहिलेले असेल. प्रकाशातही हा अंक आरपार दिसेल. देवनागरी भाषेत 50 लिहिलेले आहे. मध्यभागी महात्मा गांधी यांचे छायाचित्र. छोट्या अक्षरात ‘RBI’, ‘INDIA’ आणि ’50’ असे लिहिलेले असेल. नोटेत सुरक्षा धागा असेल ज्यावर भारत आणि RBI असले लिहिलेले असेल. 

गॅरंटी क्लॉज, गव्हर्नर यांची स्वाक्षरी त्याचबरोबर प्रॉमिस क्लॉज आणि महात्मा गांधींच्या छायाचित्राच्या उजव्याबाजूस आरबीआयचे चिन्ह. उजव्या बाजूस अशोक स्तंभ. 50 रूपयांचा वॉटरमार्क. नोट क्रमांक पॅनल असेल. यात अंकांचा आकार मोठा होत जाईल.



ट्रायचे कंपन्यांना आदेश कॉल ड्रॉप झाल्यास किंमत चुकवा
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) कॉल ड्रॉपचे प्रमाण रोखण्यासाठी कठोर आदेश दिले आहेत.

तसेच यानुसार दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनीकडून कॉल ड्रॉप रोखण्यासाठीच्या नियमांचा लागोपाठ 3 महिने भंग झाल्यास 10 लाखांचा दंड आकारला जाईल.

‘कॉल ड्रॉप’ प्रकरणात 1 ते 5 लाख इतका दंड आकारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यानुसार एखाद्या कंपनीच्या कामगिरीवर दंड ठरवण्यात येईल.

‘दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या एखाद्या कंपनीला सलगच्या तिमाहींमध्ये कॉल ड्रॉप रोखण्यात अपयश आल्यास दंडाच्या रकमेत दीडपटीने वाढ करण्यात येईल. तर लागोपाठ तीन महिन्यांमध्ये कॉल ड्रॉप रोखण्यात अयशस्वी ठरल्यास दंडाची रक्कम तिसऱ्या महिन्यात दुपटीने वाढेल.



डोकलाम प्रकरणी चीनविरोधात भारताला जपानची साथ
डोकलाम प्रश्नी चीनबरोबर सुरू असलेल्या वादात जपानने भारताला पाठिंबा दिला आहे. 

वादग्रस्त क्षेत्रात पूर्वीची स्थिती (स्टेटस को) बदलण्याचा प्रयत्न करू नये, अशा शब्दांत जपानने चीनला ठणकावले आहे.

सिक्किम-तिबेट-भूतान परिसरात असलेल्या डोकलाममध्ये चीनने रस्ता निर्मितीचा प्रयत्न केला होता. हा परिसर भूतानचा आहे. 


तसेच सामारिक दृष्ट्या अत्यंत संवेदनशील परिसर असल्यामुळे भारताने चिनी सैन्याला रस्ता बनवण्यापासून रोखले हेाते. त्यानंतर मागील दोन महिन्यांपासून भारत आणि चीनचे सैन्य आमने-सामने उभे आहेत.

चीनने रस्त्याचे काम सुरू करून भूतानबरोबर झालेल्या कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप भारताने केला आहे. जपानच्या भूमिकेमुळे भारताला नैतिक समर्थन मिळाले आहे.



भारत अमेरिकेकडून तेल आयात करणारइंडियन ऑइल कार्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम कार्पोरेशनने(बीपीसीएल) चाळीस लाख बॅरल्स तेलाची मागणी अमेरिकेकडे नोंदविली आहे.

इंडियन ऑइलने जून महिन्यातच तेलाची मागणी नोंदवली तर 10 ऑगस्ट रोजी दुसऱ्या मागणीची नोंद केली. 
भारत हा जगातील तेल आयात करणारा जगातील तिसऱ्या क्रमाकांचा देश आहे.

तर चीन, द. कोरिया आणि जपाननंतर भारत हा आशियातील अमेरिकचे तेल खरेदी करणारा चौथा देश बनला आहे.
आता भारतात पहिल्या खेपेत येणारे 2 लाख बॅरल तेल 10 कोटी डॉलर्स किंमतीचे आहे.