प्रदूषित शहरांच्या यादीत राज्यातील 17 शहरे
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या देशभरातील प्रदूषित शहरांच्या यादीत राज्यातील 17 शहरांचा समावेश आहे. 


तसेच या शहरांतील प्रदूषणाची समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे, असे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. 

पर्यावरण विभागाच्या एकदिवसीय ‘शुद्ध हवा संकल्प महाराष्ट्र’ या विषयावरील राष्ट्रीय परिषेदेच्या उद्‌घाटनप्रसंगी पोटे बोलत होते. 

हवेच्या गुणवत्तेची पातळी निर्धारित मानकापेक्षा अधिकअसलेल्या शहरात  अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर आणि उल्हासनगर यांचा समावेश आहे.



सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल तलाक-ए-बिदत  घटनाबाह्य
पतीने एकाच वेळी लागोपाठ तीन वेळा ‘तलाक’ म्हणून पत्नीला सोडचिठ्ठी देण्याची हनाफी सुन्नी मुस्लीम समाजामधील 1400 वर्षांपासूनची प्रचलित प्रथा सर्वोच्च न्यायालयाने 22 ऑगस्ट रोजी घटनाबाह्य ठरवून रद्दबातल केली.

सामाजिक आणि राजकीयदृष्ट्याही अत्यंत संवेदनशील अशा या विषयावरील हा निकाल पाच बहुधर्मीय न्यायाधीशांच्या घटनापीठाने 3 विरुद्ध 2 अशा बहुमताने दिला. 

सरन्यायाधीश न्या. जगदीश सिंग खेहर व न्या. एस. अब्दुल नझीर यांनी तिहेरी तलाक रद्द करण्यास नकार दिला. तर न्या. कुरियन जोसेफ, न्या. रोहिंग्टन फली नरिमन आणि न्या. उदय उमेश लळित यांनी ही प्रथा घटनाबाह्य आणि बेकायदा असल्याचे जाहीर केले.

तसेच यानुसार 3:2 बहुमताच्या निर्णयाने ‘तलाक-ए-बिद्दत’ प्रथा घटनाबाह्य ठरवून रद्द केली गेली. त्याने तलाक-ए-एहसन आणि तलाक-ए-हसन हे दोनच पर्याय उपलब्ध असणार आहेत.



रेल्वे बोर्डाचे नवे अध्यक्ष अश्विनी लोहानी
एअर इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) अश्विनी लोहानी यांची रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधी आदेश जारी करण्यात आला आहे. 

एकाच आठवड्यात दोन मोठे रेल्वे अपघात झाल्यानंतर रेल्वे बोर्डचे अध्यक्ष ए.के. मित्तल यांनी राजीनामा दिला होता. त्यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला होता. 

दुसरीकडे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सोपवला होता. परंतु, मोदींनी त्यांचा राजीनामा फेटाळला आहे.

अपघातानंतर सुरेश प्रभूंनी उत्कल एक्स्प्रेसची जबाबदारी निश्चित करण्यास सांगितले होते. त्यानंतर रेल्वेने मोठी कारवाई करत उत्तर रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक आर.एन. कुलश्रेष्ठ आणि दिल्ली विभागाचे डीआरएम आर.एन. सिंह यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. काही अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आले होते.



अर्जुन पुरस्कारांचे नियम बदलणार 
अर्जुन पुरस्कारापासून कुठलाही पात्र खेळाडू वंचित राहू नये, यासाठी क्रीडा मंत्रालय पात्रता नियमांत बदल करण्याच्या विचारात आहे. नव्या बदलामुळे शिफारस न केलेल्या खेळाडूंच्या नावाचादेखील पुरस्कारासाठी विचार शक्य होणार आहे.

क्रीडामंत्री विजय गोयल यांनी पात्रता नियमात बदल करण्याबाबत पुढाकार घेतला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. 

क्रीडा मंत्रालयाच्या एका अधिका-याने सांगितले, की निवड समितीच्या विश्वसनीयतेवर कुठलीही शंका घेण्यात आली नाही. याशिवाय पारदर्शीपणा जपण्याचा निर्णय झाला आहे. 

समितीत नेहमी प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असतो. पण पुढील वर्षी योजनेत संशोधन होईल. लवकरच नवे निर्देश निघतील. 

तसेच यानुसार ज्या खेळाडूंच्या नावाची शिफारस झाली नसेल किंवा संबंधित महासंघाने त्याचे नाव पाठविले नसेल तरीही त्या खेळाडूच्या कामगिरीची दखल घेत पुरस्कारासाठी विचार केला जाईल.

दिल्लीला मिळणार वॉशिंग्टन डीसीप्रमाणे सुरक्षा कवच
भारताची राजधानी असलेल्या दिल्लीला लवकरच वॉशिंग्टन डीसीप्रमाणे सुरक्षा कवच मिळणार आहे. अमेरिकाच हे सुरक्षा कवच आपल्या देशाला उपलब्ध करून देणार आहे. 

केंद्र सरकारतर्फे लवकरच ‘नॅशनल अॅडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल’ चा उपयोग दिल्लीच्या सुरक्षेसाठी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसोबत भारताचे संबंध सध्या तणावाचे आहेत, चीनने तर वारंवार युद्धाची धमकी दिली आहे आणि पाकिस्तान दहशतवादी कारवाया करण्यात आघाडीवर आहे. 

अशात राजधानी दिल्लीला एका सबळ हवाई सुरक्षा व्यवस्थेची आवश्यकता आहे. ही गरज लक्षात घेऊनच ‘नॅशनल अॅडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल’ चा वापर दिल्लीच्या सुरक्षेसाठी करण्यात येणार आहे.



जगातील सर्वांत धोकादायक संघटना ‘इसिस’
‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ (इसिस) या दहशतवादी संघटनेचा इराक व सीरियातून बीमोड झाला असला तरी जगातील सर्वांत धोकादायक संघटना म्हणून गेल्या वर्षापर्यंत तिची ओळख होती. 

मेरिलॅंड विद्यापीठाच्या अहवालामध्ये याची नोंद करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.

विद्यापीठाने जागतिक दहशतवादासंबंधीच्या संकलित केलेल्या माहितीनुसार ‘इसिस’ किंवा ‘इस्लामिक स्टेट’ने (आयएस) गेल्या वर्षी चौदाशे हल्ले केले. त्यात सात हजार नागरिकांचा बळी गेला. 

2015च्या दहशतवादी कारवायांपेक्षा गेल्या वर्षीच्या हल्ल्यांमध्ये 20 टक्‍क्‍याने वाढ झाली आहे. जगाचा विचार करता 2016 मध्ये दहशतवादी हल्ले आणि त्यातील मृत्यूचे प्रमाण दहा टक्‍क्‍याने वाढले होते. 

स्पेनमधील बार्सिलोनामध्ये गेल्या आठवड्यात लास रामब्लास येथे वर्दळीच्या ठिकाणी व्हॅन घुसवून हल्ला केल्याचा दावा ‘इसिस’ने केला आहे. 

‘इसिस’ शिवाय इराक आणि सीरियात गेल्या वर्षी अन्य दहशतवादी संघटनांनी केलेल्या हल्ल्यांची संख्या 950 होती. यात तीन हजार नागरिक ठार झाले.



गुगलकडून नवीन ऑपरेटिंग सिस्टीम लाँच
गुगलकडून ‘अँड्रॉईड ओ’ ही नवी ऑपरेटिंग सिस्टीमचे लाँच करण्यात आले आहे. 

अँड्रॉईडच्या आत्तापर्यंतच्या सिस्टीम्सना खाद्यपदार्थांची नावे देण्यात आली आहेत. त्याच पद्धतीनुसार या सिस्टीमला ‘ओरियो’ नाव देण्यात आले. 

न्यूयॉर्कमध्ये यासाठी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. 
स्थानिक प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी ‘अँड्रॉईड ओ’ चे लाँचिंग करण्यात आले. 

गुगलकडून लॉन्च करण्यात आलेली नवी ऑपरेटिंग सिस्टीम अनेकार्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे.

अँड्रॉईड ओ या सिस्टीममध्ये ‘पिक्चर-इन-पिक्चर मोड’ आणि नोटिफिकेशन डॉट अशी फिचर्स असणार आहेत. 
पिक्चर इन पिक्चर मोडद्वारे आयकॉनच्या डिझाईनमध्ये बदल करता येणार आहेत. याशिवाय नवे इमोजीही उपलब्ध होणार आहेत. तसेच या मोडमध्ये दोन युझर्स एकाचवेळी एक अॅप वापरू शकणार आहेत.