ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे निधन
ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ५९ वर्षांच्या होत्या. 


हिंदी, मराठी चित्रपट, नाटक तसेच टेलिव्हिजन मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. 
बॉलिवूडची ‘फेव्हरेट मॉम’ म्हणूनही त्या ओळखल्या जायच्या. 

‘सविता दामोदर परांजपे’, ‘विठो रखुमाय’, ‘घर तिघांचं हवं’, ‘चल आटप लवकर’, ‘झाले मोकळे आकाश’, ‘तो एक क्षण’, ‘पुरुष बुलंद’ ही त्यांची नाटकं विशेष गाजली होती. 


राजश्री प्रॉडक्शनच्या बहुतेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके हैं कौन’, ‘हम साथ साथ है’, ‘वास्तव’, ‘साजन’, ‘कुछ कुछ होता है’, ‘आशिकी’, ‘आई शप्पथ’, ‘बिंधास्त’, ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’, ‘सातच्या आत घरात’, ‘मुक्ता’ यांसारख्या असंख्य मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. 

त्यांना ‘मैने प्यार किया’ (१९९०), ‘आशिकी’ (१९९१), ‘हम आपके है कौन’ (१९९५) आणि ‘वास्तव’ (२०००) या चित्रपटांतील भूमिकेसाठी ‘फिल्मफेअर’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

१९५८ मध्ये भडभडे यांच्या कुटुंबामध्ये रिमाताईंचा जन्म झाला. रिमाताईंना अभिनयाचा वारसा त्यांच्या आईकडूनच मिळाला. त्यांची आई मंदाकिनी भडभडे या मराठी रंगभूमीवर अभिनेत्री म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे लेकुरे उदंड जाहली हे नाटक त्यावेळी रंगभूमीवर गाजत होते. 

पुण्यातील हुजूरपागा शाळेतून शिक्षण घेत असतानाच रिमाताईंनी आपल्यातील अभिनय गुण दाखवून दिले होते. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी लगेचच रंगभूमीवर छोट्या भूमिका करण्यास सुरुवात केली. 

‘हिरवा चुडा’, ‘हा माझा मार्ग एकला’ अशा चित्रपटांतून ‘बेबी नयन’ नावाने बालकलाकार म्हणून रिमाताईंनी चित्रपटसृष्टीत सुरुवात केली व लवकरच त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली. अभिनेते विवेक लागू यांच्याशी विवाहबद्ध झाल्यावर रिमा लागू या नावाने त्या विविध भूमिका साकारू लागल्या.

अभिनेता संजय दत्त याची प्रमुख भूमिका असलेल्या वास्तव चित्रपटामध्ये त्यांनी साकारलेली आईची भूमिका त्यावेळी खूप गाजली होती. अनेक मराठी नाटकं आणि चित्रपटांमधूनही त्यांनी भूमिका साकारली होती



केंद्रीय पर्यावरणमंत्री अनिल माधव दवे यांचे निधन
केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल माधव दवे यांचे निधन झाले आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. वयाच्या ६१ व्या वर्षी अनिल दवे यांनी अखेरचा श्वास घेतला. 

भारतीय जनता पक्षाचे  राज्यसभेचे खासदार असलेले अनिल दवे मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांचा जन्म मध्य प्रदेशमधील बडनगर येथे ६ जुलै १९५६ रोजी झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नर्मदा नदीच्या बचावाच्या मोहिमेसाठी ते काम करत होते. 

अनिल दवे यांच्याकडे पर्यावरण, वन आणि हवामान बदल या खात्यांचा स्वतंत्र प्रभार होता.विविध समित्यांचे सदस्य असलेले अनिल दवे २००९ पासून राज्यसभेचे सदस्य होते.

अनिल माधव दवे दिल्लीतील राजकीय वर्तुळात त्यांच्या शिस्तबद्ध जीवनशैलीसाठी परिचित होते. दिवसातून दोन वेळा योगसाधना हा त्यांच्या दैनंदिनीचा भाग होता. 

त्याचबरोबर अनिल दवे हे शिवभक्त म्हणूनही परिचित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर त्यांनी ‘शिवाजी वा सूरज’ पुस्तक लिहिले होते. त्याचबरोबर ते हिंदी आणि इंग्रजीतून शिवाजी महाराजांच्या कर्तृत्त्वावर व्याख्यानही द्यायचे. शिवाजी महाराजांचे कार्य हा त्यांच्या अभ्यासाचा आणि जिव्हाळ्याचा विषय होता.



‘जिओ’मुळे अंबानी फोर्ब्जच्या ‘ग्लोबल गेम चेंजर्स’ यादीत
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे फोर्ब्जच्या ‘ग्लोबल गेम चेंजर्स’ यादीत समावेश झाला आहे. 

रिलायन्सने वर्षभरापुर्वी सादर केलेल्या ‘जिओ’मुळे भारतात कोट्यावधी लोकांना इंटरनेटचा वापर करता येणे शक्य झाले. सहा महिन्यात जिओने १० कोटी ग्राहकांचा टप्पा गाठला आहे. अंबानींच्या या प्रयत्नामुळे त्यांचा ‘ग्लोबल गेम चेंजर्स’च्या यादीत समावेश झाला आहे. 

फोर्ब्जच्या यादीत सौदी अरबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, ‘डायसन’ कंपनीचे संस्थापक जेम्स डायसन, आफ्रिकेतील रिटेल उद्योजक क्रिस्टो वीजे आणि अमेरिकी ग्लोबल इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन ब्लॅक रॉकचे संस्थापक लॅरी फिंक यांचा देखील समावेश आहे.



‘मेक इन इंडिया’द्वारे उभारणार दहा स्वदेशी अणुभट्ट्या
संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या दहा अणुभट्ट्या उभारण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतला. या निर्मितीसाठीचा कालावधी किंवा वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. प्रत्येकी ७०० मेगावॉटप्रमाणे एकंदर सात हजार मेगावॉट आण्विक वीजनिर्मितीची या अणुभट्ट्यांची क्षमता असेल.

‘प्रेशराइज्ड हेवी वॉटर’ तंत्रज्ञानच या संभाव्य अणुभट्ट्यांसाठी वापरले जाणार आहे. यामुळे स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे अणुभट्ट्या निर्मितीच्या भारतीय कौशल्यास, तसेच निर्मिती क्षमतेला मोठी चालना मिळणार आहे. 

यामुळे देशी उद्योगांना ७०००० कोटी रुपयांचा व्यवसाय उपलब्ध होणार आहे. यातून सुमारे ३३४०० रोजगारांची निर्मिती अपेक्षित आहे. ‘स्वच्छ व प्रदूषणविरहित ऊर्जानिर्मिती’ आणि “मेक इन इंडिया’ या दोन उद्दिष्टांची यामुळे पूर्तता होणार आहे.



भारतात आयफोनच्या निर्मितीला सुरवात
अॅपलने भारतात आयफोनचे प्रायोगिक तत्त्वावर उत्पादन सुरु केले असून लवकरच कंपनी देशातील ग्राहकांसाठी ही उत्पादने सादर करणार आहे, असे वृत्त वॉल स्ट्रीट जर्नल या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहे. 

महिन्याच्या सुरुवातीला आयफोनचे सर्वात स्वस्त मॉडेल असणाऱ्या ‘द एसई’ची चाचणी घेण्यात आली. तैवानच्या विस्ट्रन कॉर्पने आपल्या बंगळूर येथील जुळणी प्रकल्पात ही चाचणी घेतली आहे. विस्ट्रन कंपनी बंगळुरु येथील पीन्या या औद्योगिक क्षेत्रात स्थापन होणाऱ्या जुळणी प्रकल्पाचे व्यवस्थापन करणार आहे. 

या प्रकल्पातील उत्पादने आठवडाभरात भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध होतील. परंतू कंपनीने याविषयी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. भारतीय बाजारपेठेत या मॉडेलची नेमकी किंमत काय असेल हे स्पष्ट झालेले नाही. चीनमधील व्यवसाय मंदावल्यानंतर अॅपल आता भारतात आपला विस्तार वाढवू पाहत आहे. 

कंपनीने भारतात प्रकल्प स्थापन करण्यासाठी सरकारकडे करसवलतींची मागणी केली आहे. अॅपलने उत्पादन आणि दुरुस्ती प्रकल्प, स्मार्टफोन्समधील सुट्या भागांवर १५ वर्षांच्या कालावधीसाठी विविध शुल्कातून सूट देण्याची मागणी केली होती. याअंतर्गत आयात व उत्पादन शुल्कात विशेष सवलत देण्याची मागणी करण्यात आली आहे.



‘नोकिया ३३१०’ मिळणार ३३१० रुपयांत
भारतीयांना नव्या स्वरुपातील ‘नोकिया ३३१०’ साठी आता आणखी वाट पाहण्याची गरज नाही. देशातील प्रमुख मोबाईल स्टोअर्समध्ये येत्या 18 मेपासून हा फोन उपलब्ध असेल. कंपनीतर्फे या फोनची ३३१० रुपयेएवढी किंमत निश्चित करण्यात आली आहे.नोकियाने काही महिन्यांपूर्वी मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये नोकिया ३३१० नव्या रुपात सादर करण्याची घोषणा केली होती. 



अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात चीन, भारताची घोडदौड
अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या देशांमध्ये चीन आणि भारताने अमेरिकेला मागे टाकले आहे. ब्रिटनमधील ‘अर्न्स्ट अँड यंग’ संस्थेच्या मानांकनातून हे मंगळवारी स्पष्ट झाले.

‘अर्न्स्ट अँड यंग’च्या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील बाजारपेठांच्या मानांकनात पहिल्या ४० देशांमध्ये चीन अव्वल स्थानी असून, भारत दुसऱ्या स्थानी आहे. गेल्या वर्षी या मानांकनात अमेरिका प्रथम क्रमांकावर होता. आता तो तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऊर्जा धोरणात केलेल्या बदलांमुळे ही घसरण झाली आहे. ट्रम्प प्रशासनाने याआधीची तापमान बदलाबाबतची अनेक धोरणे रद्द करीत अमेरिकेतील कोळसा उद्योगाचे पुरुज्जीवन करणारे धोरण अवलंबले आहे.

चीनने या वर्षी अपारंपरिक ऊर्जानिर्मितीसाठी २०२० पर्यंत ३६३ अब्ज अमेरिकी डॉलर खर्च करण्याची घोषणा केली आहे. भारत सरकारने २०२२ पर्यंत अपारंपरिक ऊर्जानिर्मितीचे उद्दिष्ट १७५ गिगावॉट ठेवले आहे. ‘अर्न्स्ट अँड यंग’च्या मानांकनात युरोपीय देशांमधील जर्मनी चौथा, फ्रान्स आठवा तर ब्रिटन दहावा आहे. ब्रिटन गेल्या वर्षी या मानांकनात चौदावा होता.