ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर यांचे निधन
०१. ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. मूलगामी आणि सर्वंकष लेखनासाठी ते ओळखले जात होते. ‘नवभारत’ या मासिकाचे ते संपादकही होते.

०२. वसंत पळशीकर यांचा जन्म १९३६ मध्ये झाला होता. वैयक्तिक आयुष्यात वैचारिकतेला महत्त्व देणारे पळशीकर हे त्यांच्या साधेपणासाठीही तितकेच ओळखले जात. गेल्या काही वर्षांपासून त्यांना अर्धांगवायूने ग्रासले होते. शनिवारी पहाटे नाशिकमधील राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले.



ज्ञानेश्वरीच्या जन्मठिकाणी ‘गाव तेथे वाचनालय’!
०१. राज्यातील पहिला पुस्तकांचा तालुका उभा राहत असून त्याला लोकांचा प्रतिसादही मिळत आहे. संत ज्ञानेश्वरांनी जेथे ज्ञानेश्वरीची निर्मिती केली त्याच नगर जिल्ह्य़ातील नेवासे तालुक्यात हा उपक्रम साकारला गेला आहे. तब्बल १०० गावात वाचनालये सुरू करण्यात आली असून हजारो वाचक त्याचा लाभ घेत आहेत.

०२. माजी खासदार यशवंतराव गडाख हे साहित्यिक आहेत. अर्धविराम, सहवास ही पुस्तके त्यांनी लिहिली. नगर येथे झालेल्या साहित्य संमेलनाचेही ते मुख्य आयोजक होते. त्यांना वाचनाची जशी आवड आहे, तसाच त्यांच्या पुस्तकांचाही संग्रह मोठा आहे. त्यांचे स्वत:चे असे वाचनालय आहे. 

०३. त्यांचे चिरंजीव प्रशांत गडाख यांनी वाढदिवसानिमित्त त्यांना यावर्षी अनोखी भेट दिली. ज्ञानेश्वरांनी नेवासे येथे ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरीची निर्मिती केली, त्या ज्ञानेश्वर मंदिरातील पैसाच्या खांबाला साक्षी ठेवून यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून वाचनसंस्कृती रुजविण्याचा संकल्प सोडला. 

०४. या दिवशी नेवासे तालुक्यातील जुनी बंद पडलेली ५१ वाचनालये पुन्हा सुरू करण्यात आली. प्रत्येक वाचनालयाला १०५ पुस्तके देण्यात आली. उपक्रम सुरू होऊन अवघे सहा महिने झालेले असताना आणखी नवीन ५० वाचनालये सुरू करण्यात आली आहेत.

०५. माजी खासदार गडाख यांनी या वाचनालयांना पुस्तके भेट दिली. त्यानंतर सोनई परिसरातील ६० प्राथमिक शिक्षकांनी उपक्रमासाठी ३० हजारांची पुस्तके भेट दिली.

०६. पाचगणीपासून सात किलोमीटर अंतरावर असलेले भिलार गावचे रुपांतर पुस्तकांच्या गावात केले जाणार आहे. केशवसुतांच्या मालगुंडलाही असे गाव बनविण्याचा प्रयत्न आहे. ते उभे राहण्यापूर्वीच पुस्तकांच्या गावाची मात्र स्वप्नपूर्ती झाली आहे



कंबोडियाच्या पहिल्या पंतप्रधानांचे निधन
०१. कंबोडियातील हुकूमशाही ख्मेर राजवटीला विरोध करून प्रथमच पंतप्रधानपदावर विराजमान झालेल्या पेन सोवान यांचे शनिवारी निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. ते जून ते डिसेंबर १९८१ पर्यंत पंतप्रधान पदावर होते. 

०२. कंबोडियामधील व्हिएतनामचे सैन्य माघारी घेण्याची मागणी केल्याबद्दल त्यांना पदावरून हटवण्यात आले होते. तसेच त्यांना १० वर्षे हनोईमध्ये तुरुंगवासात ठेवले होते.



सलग दुसऱ्या वर्षी जागतिक अग्रस्थान सानियाकडे
०१. महिला दुहेरीचे जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान भारताच्या सानिया मिर्झाने सलग दुसऱ्या वर्षी आपल्याकडे राखले आहे. मार्टिना हिंगिसच्या साथीने सिंगापूरला झालेल्या डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धेत मात्र आपले जेतेपद टिकवण्यात ती अपयशी ठरली होती.

०२. शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीत एकाटेरिना माकारोव्हा आणि एलिना व्हेस्नीना जोडीने सानिया-मार्टिनाचा पराभव केला होता. मग एकाटेरियाना-एरिना जोडीने बेथानी मॅटके-सँडस आणि ल्युसी सॅफारोव्हा जोडीला हरवून विजेतेपद काबीज केले.

०३. या वर्षी सानियाने मार्टिनाच्या साथीने ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकली. मग बाबरेरा स्ट्रायकोव्हासोबत सिनसिनाटी मास्टर्स स्पर्धा जिंकली. मग मार्टिनाने सानियाची साथ सोडली, परंतु डब्ल्यूटीए फायनल्सचे जेतेपद टिकवण्यासाठी त्या दोघी एकत्रित आल्या.



भारताने पटकावला आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडक
०१. भारताने आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव केला आहे. भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर निर्धारित वेळेत ३-२ अशी मात केली.


०२. पाच वर्षांपूर्वी भारताने पेनल्टी शूटमध्ये धूळ चारत पहिल्यांदाच आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडक जिंकला होता. आता पाच वर्षानंतर भारताने पुन्हा एकदा अंतिम फेरीत पाकिस्तानला धूळ चारली आहे.



आईचे नाव असलेल्या जर्सी घालून ‘टीम इंडिया’ मैदानात
०१. या मालिकेसाठी बीसीसीआय आणि स्टार प्लस यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या सन्मानासाठी ‘नई सोच’ हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. या उपक्रमाचा भाग म्हणून आज भारतीय संघाचे सर्व खेळाडू स्वत:च्या आईचे नाव असलेल्या जर्सी घालून मैदानात उतरले होते. 

०२. गेल्या काही दिवसांपासून टेलिव्हिजनवर महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि अजिंक्य राहणे या उपक्रमाची जाहिरात करताना दिसत आहे. मात्र, आज संपूर्ण भारतीय संघच आईचे नाव असलेल्या जर्सी घालून मैदानात उतरला.