वायंगणीत ‘कासव जत्रा’ भरणार
ऑलिव्ह रिडले ही कासवांची दुर्मीळ प्रजाती देशात ओरिसा, गोवा आणि कोकणात आढळते. त्यांची पैदास डिसेंबर ते मार्च या कालावधीत होते. त्यानिमित्ताने मऊशार वाळूवर स्वच्छंदीपणे धावणारी कासवांची पिल्ले, कासवांच्या लीलांचे दर्शन घेण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध होणार आहे.


कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात येणाऱ्या वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी गावच्या कासव जत्रेची तारीख जाहीर झाली आहे. १४ ते १६ एप्रिल २०१७ दरम्यान वायंगणीच्या समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिलांची फलटण समुद्राकडे परतताना पाहता येईल. 

दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च महिन्यात ही कासवं या किनाऱ्यावर येऊन अंडी घालतात. ५५ ते ६० दिवसांनी पिल्लं बाहेर आल्यावर त्यांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली समुद्रात सोडलं जातं.



साहित्य अकादमी पुरस्कार परत करता येत नाही
साहित्य अकादमी पुरस्कार बऱ्याच विचारविनिमयानंतर दिले जात असल्यामुळे या पुरस्काराचे मानकरी हा पुरस्कार परत करू शकत नाहीत, असे मत दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी व्यक्त केले.

एकदा दिलेले साहित्य अकादमी पुरस्कार परत घेतले जाऊ शकत नाहीत, असा ठराव अकादमीच्या कार्यकारी मंडळाने २०१५ साली केला होता. त्यामुळे पुरस्कार परत करण्याच्या विरोधात मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची काही गरज नाही, असेही खंडपीठाने सांगितले.


‘असहिष्णुता व जातीयवाद’ यांचे वातावरण याच्या विरोधात २०१५ साली अनेक लेखक, कवी व कलाकार यांनी त्यांना मिळालेले साहित्य अकादमी पुरस्कार परत केले होते.याला विरोध करताना, पुरस्कारासोबत मिळालेला निधीही परत करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली होती.


राष्ट्रीय प्रतीकचिन्हांच्या बाबतीत लावण्यात येणाऱ्या निकषांप्रमाणेच साहित्य अकादमी पुरस्कारांचे पावित्र्य राखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात यावीत, अशी मागणी एक वकील व एक धार्मिक संस्था यांनी या याचिकेत केली होती.


एकदा दिलेला पुरस्कार परत घेण्याची साहित्य अकादमीच्या घटनेत तरतूद नसल्याने या मुद्दय़ावर विचार करण्याची गरज नाही, असे सांगून न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.






‘आयटीआय’साठी सीबीएसईच्या धर्तीवर मंडळ
सरकारने देशभरातील आयटीआय संस्थांमधील पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षण देण्याची खराब स्थिती मान्य करत आयआयटी संस्थांच्या परीक्षा घेण्यासाठी सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या धर्तीवर बोर्ड स्थापन करण्यात येईल, अशी माहिती लोकसभेत दिली. 


यामुळे आयटीआयच्या विद्यार्थ्यांना सीबीएसईप्रमाणे दहावी आणि बारावीच्या समकक्ष प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.

मानव संसाधन विकास (एचआरडी) मंत्रालयाने याबाबतचा प्रस्ताव स्वीकारला आहे. 


यासाठी सीबीएसई आणि आयसीएसईच्या आधारावर केंद्रीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (एनसीव्हीटी) साठी वेगळे मंडळ स्थापण्यात येईल. हे मंडळ आयटीआयमध्ये परीक्षा घेण्यासह आयटीआय प्रशिक्षण प्राप्त करून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीच्या समकक्ष प्रमाणपत्र देण्याचे काम करण्यात येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.






निमलष्करी दलाला हुतात्मा दर्जा लागू
दंगल, निदर्शने अशा प्रकारची कोणतीही बिकट परिस्थिती हाताळताना निमलष्करी दलातील एखाद्या जवानाला मृत्यू आल्यास त्याला ‘हुतात्मा’ असे घोषित केले जाईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी लोकसभेत दिली.


गेल्या चार वर्षांत विविध ठिकाणी निदर्शने व दंगलीसारख्या घटना घडल्या. यात एकूण ३४३६ जवान जखमी झाले आहेत, तर२०१३-१५या काळात अशा घटनांमध्ये १२ पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, ४७८० कर्मचारी जखमी झाल्याचे अहीर यांनी सांगितले.






विख्यात घटनातज्ज्ञ अंध्यारुजिना कालवश
सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील, विख्यात विधिज्ञ आणि घटनातज्ज्ञ थेम्प्टन रुस्तमजी (टी.आर.) अंध्यारुजिना यांचे २८ मार्च रोजी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.


राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पहिल्या सरकारच्या काळात सन १९९६ ते १९९८ पर्यंत अंध्यारुजिना भारताचे सॉलिसिटर जनरल होते. त्याआधी सन १९९३ ते १९९५ या काळात ते महाराष्ट्राचे अ‍ॅडव्होकेट जनरल होते.


तसेच त्यांनी मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून सर चार्लस सार्जंट शिष्यवृत्ती व विष्णू धुरंधर सुवर्णपदकासह कायद्याची पदवी प्राप्त केली. यानंतर अ.भा. सेवा परीक्षा दिली व त्यात तिसरे आल्याने त्यांची भारतीय विदेश सेवेसाठी निवड झाली. परंतु, त्यांनी वकिलीच करण्याचे ठरविले.


मुंबई विद्यापीठ, भारतातील अनेक राष्ट्रीय विधी विद्यापीठ, पुण्याचे सिम्बॉयसिस लॉ कॉलेज आणि इंग्लंडमधील बेलफास्ट विद्यापीठातही त्यांनी कायद्याचे अध्यापन केले. त्यांनी अनेक महत्वाच्या सरकारी समित्यांचे अध्यक्ष म्हणून काम केले. त्यांच्याच समितीने केलेल्या शिफारशीनुसार आताचा ‘सरफासी’ कायदा केला गेला.






जीएसटीशी संबंधित चारही विधेयके लोकसभेत मंजूर
लोकसभेत आज (बुधवार) जीएसटी (वस्तू व सेवा कर) चर्चा झाली. अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सोमवारी हे विधेयक पटलावर मांडले. आज या विषयावर विस्तृत चर्चा झाली. यासाठी भाजपने आपल्या सर्व खासदारांना व्हिप जारी केला आहे. 


केंद्रीय जीएसटी, एकीकृत जीएसटी, केंद्रशासित जीएसटी आणि भरपाई कायद्यावर चर्चा झाली. येत्या एक जुलैपासून सर्वसंमतीने भारतात जीएसटी लागू होईल, अशी अपेक्षा आहे. 


जीएसटीशी संबंधित चारही विधेयके लोकसभेत मंजूर करण्यात आली आहेत.






अंजू जॉर्जला १३ वर्षांपूर्वीच्या उडीसाठी ऑलिम्पिकचे रौप्यपदक
जागतिक अॅथलिट स्पर्धेत लांब उडी प्रकारात भारताला पहिलंवहिलं पदक मिळवून देणारी अॅथलिट अंजू बॉबी जॉर्ज हिचा आता ऑलिम्पिक पदक विजेत्यांच्या यादीतही समावेश होण्याची शक्यता आहे. १३ वर्षांपूर्वी झालेल्या अथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेत मारलेल्या लांब उडीबद्दल तिला रौप्यपदक दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

२००४ सालच्या अथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेत अंजू जॉर्ज हिने ६.८३ मीटर लांब उडी मारून नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. पण स्पर्धेत तिला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.


सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकावर त्यावेळी रशियाच्याच स्पर्धकांनी नाव कोरले होते. मात्र, रशियाच्या या खेळाडूंच्या कामगिरीबाबत संशय व्यक्त करण्यात आला होता. अखेर २०१३ साली हा संशय खरा ठरला. पदक विजेत्या रशियाच्या खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्या. त्यानंतर विविध स्पर्धांमध्ये त्यांनी मिळवलेली पदकं त्यांच्याकडून काढून घेण्यात आली. 


ही तिन्ही पदकं आता त्यावेळी चौथ्या स्थानावर समाधान मानाव्या लागलेल्या ऑस्ट्रेलियाची ब्रॉनविन थॉम्पसन, पाचव्या स्थानावर भारताची अंजू आणि सहाव्या स्थानावरील ब्रिटनची जेड जॉन्सन यांना दिली जाण्याची शक्यता आहे.