नवउद्योजकांना चालनेसाठी स्टार्ट अप धोरण
नवनवीन संकल्पाचा वापर करून राज्यात उद्यमशीलता वाढीस लावणे, यातून तरुण उद्योजकांना चालना देत उद्योग-व्यवसायाची भरभराट करणे या हेतूने राज्याच्या कौशल्य विकास व उद्योजकता या विभागाने ‘महाराष्ट्र राज्य नावीन्यता व स्टार्ट अप धोरण- २०१७’ हे धोरण तयार केले आहे. 


हे धोरण २०१७-२२ असे पाच वर्षांसाठी राहणार आहे. स्टार्ट अपकरिता पाच हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणे, तसेच तरुण व नवउद्योजकांसाठी २५०० कोटी निधीची व जोखीम भांडवल (व्हेंचर कॅपिटल) २५०० कोटी उभारण्यात येणार आहे. 

प्रत्येक जिल्ह्यात स्टार्ट अपच्या नावाखाली दहा लाख चौरस फूट जागेचा विकास करण्यात येणार आहे. याअंतर्गत पायाभूत व अनुषंगिक सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. यात सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर विकास करण्यात येणार आहेत.

यामध्ये विविध तरतुदींचा समावेश असून, महिलांना तीन पाळ्यांत (शिफ्ट) काम करण्याची संधी मिळणार आहे.
नामांकित शिक्षण संस्था-विद्यापीठे यांच्या आवारात स्टार्ट अप केंद्रे विकसित करणे.
२५ हजार चौरस मीटर आकाराची किमान सहा स्टार्ट अप व्हिलेज तयार करणे.
प्रत्येक प्रशासकीय विभागात किमान एक याप्रमाणे सहा विभागात सेंटर ऑफ एक्‍सलन्सी केंद्र उभारणे.
राज्य, जिल्हा पातळीवर सोसायटी अधिनियमाअंतर्गत नावीन्यता संस्थांची स्थापना करणे.



भाट्ये, मिऱ्या किनाऱ्यावर आढळले ‘ब्ल्यू बटणफिश’
रत्नागिरीतील मांडवी वगळता इतरत्रच्या भाट्ये, मिऱ्या तसेच मिऱ्यापासून पश्‍चिमेला असलेल्या पुंगळी परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किनारी ‘ब्ल्यू बटणफिश’ मोठ्या प्रमाणावर आढळून आले. 

हे मासे जेलीफिशसारखे दिसत असले, तरी ते जेलीफिश नव्हेत. त्यांना ‘ब्ल्यू बटणफिश’ म्हणतात. त्यांचे शास्त्रीय नाव ‘पॉर्पिटा पॉर्पिटा’ असेच आहे. जेलीफिशप्रमाणे याचे अंग मऊ अथवा मृदू नसते, तर ते बटणासारखे टणक असते. 

या माशाच्या मधोमध असलेले छिद्र हेच त्याचे तोंड आणि येथूनच तो उत्सर्जनही करतो. हे मासे स्वतः पोहू शकत नाहीत, फक्त तरंगतात. पाण्याचा वेग आणि वाऱ्याची दिशा याप्रमाणे ते जातात. 

ब्ल्यू बटणफिश व जेलीफिश हे वाळूवर येत नाहीत. ते खोल पाण्यातच आढळतात. जिल्ह्यातील किनारपट्टीवर ते अपवादानेच आढळतात. हे मासे पायाला लागले तर खाज सुटते. ते थोडे विषारीही असतात. 

रत्नागिरी किनारपट्टीला ३० वर्षांपूर्वी १९८५ च्यादरम्यान हे मासे दिसल्याची आठवण बुजुर्ग मच्छीमार वस्ता (मिरकरवाडा) यांनी सांगितली. १५ वर्षांपूर्वीही काही प्रमाणात असे मासे आढळले होते.



गीरचे ‘ईएसझेड’ कमी करण्यास मनाई
गीर अभयारण्याभोवतीचे ‘पर्यावरण संवेदनशील क्षेत्र’ (ईएसझेड) कमी करण्याच्या सुधारित प्रस्तावावर अंतिम अधिसूचना काढण्यास गुजरात उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. 

खाण आणि पर्यटन उद्योजकांच्या फायद्यासाठी गीर अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानाभोवतीचे संवेदनशील क्षेत्र कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप आहे.

गीर हे आशियाई सिंहांचे अखेरचे आश्रयस्थान आहे, त्यामुळे या अभयारण्याचे संवेदनशील क्षेत्र कमी करण्याचा सुधारित प्रस्ताव राज्य सरकारने मांडताच त्याला विरोध करणारी याचिका पर्यावरण कार्यकर्ते वीरेन पंड्या यांनी दाखल केली होती. 

पूर्वीच्या प्रस्तावाप्रमाणे गीरभोवतीच्या संवेदनशील क्षेत्राचा आकार ३.३२ लाख हेक्‍टर होता. सुधारित प्रस्तावामध्ये तो लक्षणीयरीत्या कमी करून केवळ १.१४ लाख हेक्‍टर इतकाच नक्की करण्यात आला होता. 

यामुळे अभयारण्याच्या सीमेपासून अंतर्गत भागापर्यंत असलेला बफर झोनचा पट्टा ८ ते १७ किलोमीटरवरून थेट ५०० मीटर ते ४ किमी अंतराचाच राहणार होता. पूर्वीच्या बफर झोनमध्ये २९१ गावांचा समावेश होता, तर नव्या प्रस्तावानुसार ही संख्याही ११९ पर्यंत घटणार होती. या बफर झोनमध्ये औद्योगिक आणि व्यावसायिक कामांना बंदी असते.

अभयारण्यांचे बफर झोन किमान १० किमी अंतराचे असावेत, अशी सर्वोच्च न्यायालयाची मार्गदर्शक सूचना आहे. मात्र, राज्य सरकारने सुधारित प्रस्तावामध्ये या सूचनेचा भंग केला होता.

गीरमधील ५२३ सिंहांपैकी १६८ सिंह बफर झोनमध्ये वावरतात. या भागातील सिंह सध्याच शिकार आणि रस्ते अपघातांना बळी पडत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये गीरच्या बाहेर सुमारे २५ सिंहांना अनैसर्गिक मृत्यू आला आहे.



नौदलाकडून ब्राह्मोसची यशस्वी चाचणी
नौदलाने आपल्या भात्यातील ब्राह्मोस हे अत्याधुनिक क्षेपणास्त्र आज आयएनएस तेग या युद्धनौकेवरून यशस्वीरित्या डागले. ध्वनिपेक्षाही जास्त वेगाने जाणारे क्रूझ क्षेपणास्त्र नौकेवरून जमिनीवर डागण्याचे कौशल्य असलेल्या नौदलांमध्ये आता भारताचा समावेश झाला आहे.

भारत व रशिया या दोघांनी हे क्षेपणास्त्र संयुक्तपणे विकसित केले आहे. यापूर्वी भारताने हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर तसेच जहाजांवर डागण्याची क्षमता विकसित केली होती. 

मात्र, आता हे क्षेपणास्त्र जहाजावरून सोडण्यात यश आल्याने युद्धनौकेवरून हे क्षेपणास्त्र शत्रूदेशाजवळ नेऊन ते शत्रूदेशात डागण्याची क्षमता भारताला मिळाल्याचे मानले जात आहे. 

भारताच्या बहुतेक आधुनिक युद्धनौकांवर हे क्षेपणास्त्र आहे. पण आतापर्यंत ते फक्त शत्रूच्या युद्धनौकांवर डागण्याचेच कौशल्य आपल्याकडे होते. मात्र, आता शत्रूदेशाच्या अंतर्भागात असलेली महत्त्वाची ठिकाणेही ब्राह्मोसच्या साह्याने नष्ट करता येतील. 

या क्षेपणास्त्राचा पल्ला छोटा (तीनशे ते चारशे किलोमीटर) असल्याने आपल्या देशातून ते शत्रूदेशावर डागण्यास मर्यादा येतात. मात्र, जहाजावरून हे क्षेपणास्त्र शत्रूदेशाजवळ नेल्याने त्याचा पल्ला आपोआपच वाढतो.



‘टाईम’च्या १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत मोदी 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेटीएम चे संस्थापक विजय शंकर शर्मा टाइम मासिकाच्या जगातील सर्वात प्रभावशाली १०० व्यक्तींच्या यादीत समावेश झाला आहे. या यादीत फक्त दोन भारतीयांचा समावेश करण्यात आला आहे. 

या यादीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांची मुलगी इवांका ट्रम्प, पोप फ्रांसिस, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि उत्तर कोरीया चे प्रमुख किम जोंग उन यांचा समावेश आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन व ब्रिटीश पंतप्रधान टेरेजा मे यांचाही समावेश आहे. टाइम मासिकाच्या यादीत जगभरातील कलाकार, नेते व महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश करण्यात येतो.

भारत सरकारने नोटबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर पेटीएमने त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थीतीचा फायदा घेतला. नोटबंदीनंतर ग्राहकांना त्यांनी आपल्याकडे आकर्षून घेतले. २०१६ वर्षाच्या सुरवातीला १२.२ कोटी असलेला पेटीएम युजर्सचा आकडा वर्षाच्या १७.७ कोटी पर्यंत गेला होता.

गेल्या वर्षी टाइमच्या प्रभावशाली १०० लोकांच्या यादीत रघुराम राजन, सानिया मिर्झा, प्रियंका चोप्रा, गूगलचे सीईओ सुंदर पिचाई व फ्लिपकार्टचे संस्थापक बिन्नी बंसल व सचिन बंसल यांचा समावेश होता.



तुषार आरोठे भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक
बडोद्याचे माजी फलंदाज तुषार आरोठे यांच्याकडे भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सध्याच्या प्रशिक्षक पूर्णिमा राव यांच्या जागी त्यांची नियुक्ती झाली आहे.

महिलांची विश्वचषक स्पर्धा जून व जुलैमध्ये होणार असून या स्पर्धेसाठी आरोटे यांच्याकडे प्रशिक्षकपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. आरोठे २००८ ते २०१२ या कालावधीत महिला संघाचे क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक होते.

भारतीय महिला संघ दक्षिण आफ्रिकेत पुढील महिन्यात चार देशांच्या आंतरराष्ट्रीय मालिकेत सहभागी होणार आहे. भारत व आफ्रिका यांच्याबरोबरच आर्यलड व झिम्बाब्वे यांचाही या मालिकेत समावेश आहे. या मालिकेनंतर विश्वचषक स्पर्धा होणार असून भारताला पहिल्या सामन्यात डर्बीशायर येथे इंग्लंडशी खेळावे लागणार आहे.



म. गांधींच्या टपाल तिकिटांची पाच लाख पौंडांना विक्री
ब्रिटनमध्ये झालेल्या लिलावात महात्मा गांधींचे चित्र असलेल्या चार दुर्मिळ टपाल तिकिटांची पाच लाख पौंडांना विक्री झाली आहे. कोणत्याही भारतीय टपाल तिकिटाला आतापर्यंत मिळालेली ही सर्वाधिक किंमत असल्याचे विक्रेत्याने सांगितले.


१९४८ मध्ये गांधींचा चेहरा असलेले दहा रुपयांची टपाल तिकिटे वितरित करण्यात आले होते. गुलाबी, तपकिरी रंगाचे ही केवळ तेरा टपाल तिकिटे सध्या विविध संग्राहकांकडे आहेत. त्यातील चार तिकिटांचा सेट ऑस्ट्रेलियातील खासगी तिकीट संग्राहकाने विकत घेतला. 

भारतीय टपाल तिकिटाला मिळालेली ही सर्वाधिक किंमत असल्याचे ब्रिटनमधील ‘स्टेनली गिब्बन्स’ या लिलाव करणाऱ्या कंपनीने निवेदनात म्हटले आहे. यातील उर्वरित तिकिटे राणी एलिझाबेथ यांच्या मालकीच्या रॉयल संग्रहाकडे आहेत.