कौशल्य विकास विद्यापीठाची स्थापना
सिम्बायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीने महाराष्ट्रातील पहिल्या कौशल्य विकास विद्यापीठाची स्थापना केली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसजवळ किवळे येथे १५ एकराच्या विस्तृत जागेत विद्यापीठाचा कॅम्पस उभारण्यात आला असून राज्य शासनाने त्याला नुकतीच मान्यताही दिली आहे. 


कारखाने आणि उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वास्तविक जीवनातील अनुभवात्मक शिक्षण मिळावे तसेच उद्योग आणि बाजारपेठेत नोकरीसाठी प्रशिक्षित युवक उपलब्ध व्हावेत या हेतूने सिम्बायोसिस कौशल्य विकास विद्यापीठाची स्थापना करण्यात आल्याची माहिती सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार व प्रधान संचालिका डॉ. स्वाती मुजुमदार यांनी दिली. 

स्कूल ऑफ ऑटोमोबाईल अ‍ॅन्ड मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग, रिटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, अर्बन डेव्हलपमेंट, ब्युटी अ‍ॅन्ड वेलनेस, हेल्थ सायन्सेस अ‍ॅन्ड मॅनेजमेंट, पब्लिक पॉलिसी अ‍ॅन्ड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन आदी कोर्सेसचा या विद्यापीठामध्ये समावेश असणार आहे.



भारतीय खगोलशास्त्रज्ञ डॉ. कुलकर्णी यांना डॅन डेव्हिड पुरस्कार
भारतीय शास्त्रज्ञ, महाराष्ट्राचे भूमिपुत्र श्रीनिवास कुलकर्णी यांची अंतराळ विज्ञान क्षेत्रातील भरीव योगदानासाठी नामांकित डॅन डेव्हिड पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. 

दहा लाख डॉलर असे या पुरस्काराचे स्वरूप असून तेल अवीव विद्यापीठातील डॅन डेव्हिड फाउंडेशनच्या वतीने हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. 

कुलकर्णी यांच्याअगोदर तीन भारतीयांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यात लेखक अमिताव घोष, संगीतकार जुबिन मेहता आणि रसायनशास्त्रज्ञ सीएनआर राव यांचा समावेश आहे.

श्रीनिवास कुलकर्णी हे पासाडिना येथील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीत खगोलभौतिकीचे प्रोफेसर आहेत. पॅलोमर ट्रॅन्शेंट फॅक्‍टरीचे संस्थापक आणि संचालक म्हणून ते ओळखले जातात.



भारत आणि सिंगापूरच्या नौदलाचा संयुक्त सराव 
भारत आणि सिंगापूरच्या नौदलाने चीनच्या वाढत्या प्रभावक्षेत्राचा साक्षी असलेल्या दक्षिण चिनी समुद्रात सात दिवस चालणारा संयुक्त सराव सुरू केला.

सिंगापूर-भारत समुद्री द्विपक्षीय सरावात भारतीय नौदलाच्या चार युद्धनौका, तसेच लांब पल्ल्याचा मारा करणारे पाणबुडीविरोधी विमान पी ८१ भाग घेत आहे. 


दोन्ही नौदलांमधील मोहीम वाढविण्याच्या हेतूने हा सराव घेतला जात आहे. या सरावादरम्यान समुद्रातील विविध मोहिमांतर्गत कारवायांची योजना आखण्यात आली आहे.

नौदलाचे प्रवक्ता कॅप्टन डी.के. शर्मा यांनी सांगितले, की या वर्षी समुद्रातील सरावादरम्यान पाणबुडीविरोधी युद्धकौशल्य, जमीन, आकाश तसेच जमिनीखालील दलांबरोबरच हवाई संरक्षण, तसेच जमिनीवरील चकमकींवर भर असेल. 

सिंगापूर नौदलाचे अनेक युद्धनौका या सरावात भाग घेत आहेत. त्याचबरोबर यामध्ये सिंगापूरचे समुद्री गस्त विमान फोकर एफ-५० आणि एफ-१६ विमानही सहभागी होईल.



‘रेरा’च्या अध्यक्षपदी गौतम चटर्जी यांची नेमणूक
महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (रेरा) च्या अध्यक्षपदी माजी अतिरिक्त मुख्य सचिव आणि गृहनिर्माण विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव गौतम चटर्जी यांची नेमणूक करण्यात आली आहे. 

तर सार्वजनिक आरोग्य विभागाचे विद्यमान प्रधान सचिव डॉ. विजय सतबीरसिंग यांचीही सदस्यपदी निवड झाली आहे.
तसेच न्यायपालिकेतून बी.डी. कापडणीस यांचीही सदस्यपदी निवड झाली आहे.



शासकीय निवासामधील अतिरिक्त वास्तव्य थांबवण्यासाठी कायद्यात बदल करण्यास मंजुरी
संसदीय सदस्य यांचे अतिरिक्त कालावधीसाठी शासकीय निवासामधील वास्तव्य करण्यास थांबवण्यासाठी कायद्यात बदल करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

सार्वजनिक निवासस्थाने (अनधिकृत रहिवाशांचे निष्कासन) कायदा-१९७१ मध्ये बदल करण्यात येईल.



चेन्नईमध्ये देशाचे पहिले शोभिवंत माश्यांचे उद्यान
भारताचे पहिले शोभिवंत माश्यांचे उद्यान “अॅक्वाटीक रेनबो टेक्नॉलॉजी पार्क” चेन्नई, तामिळनाडू येथे तयार केले जात आहे. हे उद्यान फिशरीज कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (FCRI), पोन्नेरी (तामिळनाडू) कडून तयार केले जात आहे.



देशभरात मातृत्व लाभ कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला मंत्रिमंडळाची मंजूरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने देशभरात “मातृत्व लाभ कार्यक्रम (Maternity Benefit Programme)” च्या अंमलबजावणीला कार्योत्तर मंजुरी दिली आहे. हा कार्यक्रम आता देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तारित केला गेला आहे. १ जानेवारी २०१७ पासून देशातील सर्व जिल्ह्यात “मातृत्व लाभ कार्यक्रम” विस्तारीत केला गेला आहे.

गरोदर व स्तनदा महिलांना रोख प्रोत्साहन भत्ता देऊन महिलांचे या काळात होणारे वेतन नुकसानाची भरपाई करणे, जेणेकरून बाळाच्या जन्माआधी व जन्मानंतर पुरेशी विश्रांती घेऊ शकता येणार. 

शिवाय गर्भधारणा आणि स्तनपान करवण्याच्या काळात तिला आरोग्य व पोषण सुधारण्यासाठी मदत होण्यासाठी आणि प्रसूतीनंतर बाळाच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वाचे असलेले स्तनपान पहिल्या सहा महिन्यात व्हावे यासाठी ही मदत दिली जात आहे.

रुपये ६००० (३०००+१५००+१५००) चे रोख अनुदान पहिल्या दोन मुलांसाठी तीन हप्त्यांमध्ये देय केले जाते.
थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने आधार क्रमांक जोडलेल्या वैयक्तिक बँक/ टपाल खात्यात रोख रक्कम जमा केली जाईल.

ही एक केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. यामागील खर्च सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश (विधीमंडळ सह) यासाठी केंद्र व राज्य सरकार यांच्यामध्ये ६०:४० याप्रमाणे वाटून घेतली जाईल, तर NER आणि हिमालयीन राज्यांसाठी ९०:१० प्रमाणात आणि केंद्रशासित प्रदेश (विधीमंडळ नसलेले) यांच्यासाठी १००% या प्रमाणे असणार आहे.


एकूण खर्च हा सन २०१६-१७ चा शिल्लक कालावधी आणि सन २०१७-१८ पासून ते सन २०१९-२० पर्यंत १२६६१ कोटी रुपये इतका होणे अपेक्षित आहे. एकूण खर्चापैकी भारत सरकारचा वाटा शिल्लक सन हा ७९३२ कोटी रुपये होणे अपेक्षित आहे.

बाळांना योग्य स्तनपान आणि महिलांना प्रसुतीच्या आधी आणि नंतर पुरेशी विश्रांती मिळावी यासाठी महिला व बाल विकास मंत्रालयाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या कलम 4(b) च्या उपबंधानुसार “मातृत्व लाभ कार्यक्रम” नावाने गरोदर व स्तनदा मातांसाठी योजना तयार केलेली आहे. 



शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात पातळ थराचे होलोग्राम तयार केले
ऑस्ट्रेलिया-चीन मधील शास्त्रज्ञांच्या चमूने जगातील सर्वात पातळ थराचे होलोग्राम तयार केले आहे, ज्यामुळे त्रिआयामी होलोग्राफीसाठी मार्ग मोकळा होत आहे.

बीजिंग इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (BIT) च्या सहकार्यासह ऑस्ट्रेलियाच्या RMIT विद्यापीठाचे प्रा. मिन गु यांच्या नेतृत्वाखाली चमूने नॅनो-होलोग्राम विकसित केले आहे. हे २५ नॅनोमिटर जाड आहे.