स्मृती इराणींकडे माहिती प्रसारण तर तोमर यांच्याकडे नगरविकास
केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांच्याकडील माहिती व प्रसारण मंत्रालयाची धुरा स्मृती इराणी यांच्याकडे, तर गृह व नगरविकास मंत्रालयाची जबाबदारी नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.


इराणी या सध्या केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री आहेत, तर तोमर यांच्याकडे ग्रामीण विकास मंत्रालयाची जबाबदारी आहे. 

सरकारमधील संरक्षण व पर्यावरण ही मंत्रालयेही सध्या रिक्त असून अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे संरक्षण, तर विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री हर्ष वर्धन यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला आहे



अमेरिकेत उत्पादन केंद्र सुरु करणारी पहिली भारतीय कंपनी ‘महिंद्रा अँड महिंद्रा’
देशातील मोठी ऑटोमोबाईल कंपनी असलेली महिंद्रा अँड महिंद्रा वर्षभरात अमेरिकेत पहिले उत्पादन केंद्र सुरु करणार आहे. 

अमेरिकेत उत्पादन केंद्र सुरु करणारी महिंद्रा अँड महिंद्रा पहिलीच भारतीय कंपनी ठरणार आहे. महिंद्रा अँड महिंद्रा वर्षभरात डेट्रॉयटमध्ये उत्पादन केंद्र सुरु करणार आहे.

अमेरिकेचा समावेश जगातील महत्त्वाच्या ऑटोमोबाईल बाजारपेठांमध्ये होत असल्याने या देशात विस्तार करण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

महिंद्रा अँड महिंद्राने अमेरिकेत १.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. कंपनीच्या अमेरिकेतील उत्पादन केंद्रामुळे ३००० लोकांना रोजगार मिळणार आहे. 

कंपनीकडून अमेरिकेतील उत्पादन केंद्रात ऑफ रोड वाहनांची निर्मिती केली जाणार आहे. या वाहनांचे डिझाईन कंपनीच्या उत्तर अमेरिकेतील तंत्रज्ञान केंद्रात तयार केले जाणार आहे.


कर्नाटकने राज्याच्या वेगळ्या ध्वजासाठी समिती गठीत केली
कर्नाटक सरकारने राज्यासाठी स्वतंत्र ध्वज रचण्यासंबंधी अहवाल तयार करण्यासाठी आणि त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया प्रदान करण्यासाठी नऊ सदस्यीय समिती गठीत केली आहे.

कन्नड व संस्कृती विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती आहे. कार्मिक व प्रशासकीय सेवा, गृह, कायदा आणि संसदीय कामकाज या विभागांचे सचिव यांचा देखील समावेश आहे.

जर ध्वजाला मान्यता मिळाली, तर जम्मू-काश्मीर नंतर कर्नाटक हा दुसरा राज्य असेल ज्याचे अधिकृत ध्वज असेल आणि त्याला घटनेतील कलम ३७० अंतर्गत विशेष दर्जा प्राप्त होईल.



भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी भरत अरुण
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (BCCI) भरत अरुण यांची विश्वचषक २०१९ पर्यंत भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

याआधी २०१४ साली अरुण यांना संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले गेले होते.

पक्ष्याच्या रूपातील डायनासोरच्या प्रजातीचा शोध
महाकाय डायनासोरचे अस्तित्व पृथ्वीवर होते हे आता विविध संशोधनांतून सिद्ध झाले आहे. भौगोलिक, नैसर्गिक बदलांमुळे डायनासोरचे अस्तित्व नष्ट झाले तरी त्यांच्याविषयी जगभरात संशोधन सुरू आहे. 

यातूनच डायनासोरच्या पक्ष्याच्या रूपातील प्रजातीचा शोध लागल्याचा दावा कॅनडातील संशोधकांनी केला आहे. कॅनडात त्याचे जीवाश्‍म सापडले आहेत.

जीवाश्‍माच्या संशोधनातून ‘अर्ल्बटाव्हेंटर’ ही डायनोसोरची जात सुमारे सात कोटी दहा लाख वर्षांपूर्वी अर्ल्बटा येथे आढळत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. त्याची उंची मानवाएवढी होती, असे आढळून आले. 

शास्त्रज्ञांनी या नव्या जातीचे नामकरण ‘अर्ल्बटाव्हेंटर क्‍यूरी’ असे करण्यात आले आहे. कॅनडातील अश्‍मीभूत अवशेषांचे अभ्यासक फिलिप जे. क्‍यूरी यांच्या सन्मानार्थ हे नाव नवीन जातीला दिले आहे.

‘अर्ल्बटाव्हेंटर क्‍यूरी’ किंवा क्‍यूरिज अर्ल्बटा असे याचे नामकरण करण्यात आले आहे. निळी
 व मोठी पिसे हे याचे वैशिष्ट होते. कॅनडात तो सुमारे सात कोटी १० लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात होता. रेड डिअर रिव्हर खोऱ्यात त्याच्या जीवाश्‍माचा शोध लागला.



नेपाळ चीनकडून इंटरनेट सेवा घेणार
नेपाळने ऑगस्ट महिन्यापासून चीनकडून इंटरनेट सेवा घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे या परिसरातील भारताची इंटरनेट सेवेबाबतची एकाधिकारशाही संपुष्टात आली आहे.

नेपाळ सध्या भारताकडून पुरवण्यात येणाऱ्या इंटरनेट सेवेवर अवलंबून आहे. भैरहवा, बिरगुंज आणि बिराटनगर या भागातून टाकलेल्या ऑप्टिकल फायबर केबल्सच्या माध्यमातून ही इंटरनेट सेवा पुरवली जाते.

चीनकडून हिमालयाच्या परिसरातून नेपाळपर्यंत ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला नेपाळमध्ये चीनी इंटरनेट सेवा सुरू होईल.

तसेच ही इंटरनेट सेवा चीनच्या मुख्य भागातून न पुरवता हाँगकाँगमधून पुरवण्यात येणार आहे. त्यामुळे नेपाळमधील लोकांना गुगल आणि फेसबुकचा वापर करता येईल.

चीन ऑप्टिकल फायबर केबलच्या माध्यमातून नेपाळला जोडला गेल्याने दक्षिण आशियाई परिसरातील भारताच्या वर्चस्वाला काही प्रमाणात धक्का बसणार आहे.



इजिप्तमध्ये भारताने सौर प्रकल्प सुरू केला
इजिप्तमधील दुर्गम गावांचे विद्युतीकरण करण्यासाठी भारताने अत्याधुनिक तंत्रज्ञानासह एक सौर प्रकल्प सुरू केला आहे. प्रकल्पाचे उद्घाटन इजिप्तमधील भारताचे राजदूत संजय भट्टाचार्य यांनी केले.

हा प्रकल्प आगाविन (मात्रौह) गावात सुरु करण्यात आला आहे. या प्रकल्पाची एकूण वीज निर्मिती क्षमता ८.८ किलोवॅट इतकी आहे.