जम्मू-काश्‍मीर विधिमंडळात ‘जीएसटी’ मंजूर 
जम्मू-काश्‍मीर विधिमंडळात आज वस्तू आणि सेवाकर विधेयकास (जीएसटी) मान्यता देण्यात आली. 


राष्ट्रपतींचा आदेश विधिमंडळामध्ये वाचून दाखविल्यानंतर द्राबू यांनी संबंधित विधेयक सभागृहाच्या पटलावर मांडले ते आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.



भारत-ASEAN दिल्ली संवाद परिषद संपन्न
४-५ जुलै २०१७ रोजी नवी दिल्लीत भारत-ASEAN ‘दिल्ली संवाद ९’ परिषद संपन्न झाली. हे संवादाचे ९ वे सत्र होते. 

परिषदेचे आयोजन भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे केले गेले. परिषदेत ‘ASEAN-इंडिया रिलेशन्स: चार्टिंग द कोर्स फॉर द नेक्स्ट २५ इयर्स’ या विषयावर चर्चा करण्यात आली आहे.

दक्षिणपूर्व आशियाई देशांची संघटना (ASEAN) सदस्य राष्ट्रे आणि भारत यांच्यातील संबंधाना सुदृढ करण्यासाठी २००९ सालापासून दरवर्षी दिल्ली संवाद आयोजित केले जात आहे. परिषदेच राजकीय-सुरक्षा, आर्थिक आणि सामाजिक-सांस्कृतिक भागीदारीसंबंधी चर्चा केली जाते.

ASEAN ही दहा दक्षिणपूर्व राष्ट्रांची एक प्रादेशिक आंतरसरकारी संघटना आहे. याची स्थापना ८ ऑगस्ट १९६७ रोजी इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपिन्स, सिंगापुर आणि थायलंड यांनी केली. इतर सदस्य ब्रुनेई, कंबोडिया, लाओस, म्यानमार आणि व्हिएतनाम हे आहेत.



भारताने स्वतःला एव्हीयन इन्फ्लूएंजा मुक्त घोषित केले 
भारताने ६ जून २०१७ रोजी एव्हीएन इन्फ्लूएंजा/बर्ड फ्ल्यू (H5N8 व H5N1) रोगापासून स्वतःला मुक्त घोषित केले आहे.

ऑक्टोबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ दरम्यान एव्हीयन इन्फ्लूएंजा या रोगाच्या तीव्र संक्रमणाने देशाचे विविध भाग ग्रासलेले होते. या काळात रोगाच्या नियंत्रण मिळविण्यासाठी तयार केलेल्या कृती आराखड्यानुसार प्रतिबंधक कार्य पार पाडले गेले.



बंगालच्या उपसागरात भारत-अमेरिका मलबार सरावाला सुरुवात 
७ जुलै २०१७ रोजी भारत आणि अमेरिका यांच्या नौदलांतील ‘मलबार’ या संयुक्त सरावाला सुरुवात झाली आहे. हा सराव १७ जुलै २०१७ पर्यंत चालणार आहे.

जपान देखील या सरावाचा कायम भागीदार बनला आहे. या सरावात देशाच्या सागरी क्षेत्रात आणि समुद्रात प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित केले जातील. तसेच मानवतावादी कार्यांसह युद्धसरावांचा तज्ञांकडून अनुभव घेतला जाणार आहे.



भारत आणि इस्राइल यांच्यात सात सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४-६ जुलै २०१७ या काळात इस्राइलचा दौरा पूर्ण केला आहे. 

दोन्ही देशांनी ‘जल व कृषी विषयक धोरणात्मक भागीदारी’ स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. शिवाय या भागीदारीच्या व्यवस्थापनेसाठी संयुक्त कार्यदल उभे करण्यास मान्यता दर्शवली आहे. 

या भागीदारीत जलसंवर्धन, सांडपाण्यावर उपचार, कृषी विषयक तसेच प्रगत जल तंत्रज्ञानाचा वापर करून गंगा आणि इतर नद्या स्वच्छ करण्यावर भर दिला जाईल.


या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये विविध विषयांवर संयुक्तपणे सहकार्य करण्याच्या उद्देशाने सात सामंजस्य करार करण्यात आले आहेत.
—– भारत-इस्राइल इंडस्ट्रीयल R&D अँड टेक्नोलॉजिकल इनोव्हेशन फंड (I4F) स्थापन करण्यासाठी भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि इस्राइलच्या नॅशनल टेक्नोलॉजिकल इनोव्हेशन अथॉरिटी यांच्यात सामंजस्य करार.
—– भारतात जलसंवर्धनासाठी राष्ट्रीय मोहिमेवर सामंजस्य करार
—– भारतामधील स्टेट वॉटर युटिलिटी रिफॉर्म कार्यक्रमासंबंधात उत्तरप्रदेश जल निगम आणि इस्राइलचे जलसंपदा मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार.
—– भारत-इस्राइल डेव्हलपमेंट कोऑपरेशन थ्री इयर वर्क प्रोग्राम इन अॅग्रिकल्चर २०१८-२०२०
—– GEO-LEO ऑप्टिकल लिंक यामध्ये सहकार्यासाठी ISRO आणि इस्राइल स्पेस एजन्सी (ISA) यांच्यात सामंजस्य करार.
—– अटॉमिक क्लॉक विषयामध्ये सहकार्यासाठी ISRO आणि ISA यांच्यात सहकार्य योजना
—– लहान उपग्रहांसाठी इलेक्ट्रिक प्रॉप्लशन विषयामध्ये सहकार्य करण्यासाठी ISRO आणि इस्राइल स्पेस एजन्सी (ISA) यांच्यात सामंजस्य करार.

भारत-इस्राइल संबंधांना यावर्षी २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. भारत हा इस्राइलच्या सैन्य उपकरणांच्या खरेदीचा सर्वात मोठा ग्राहक आहे आणि रशियानंतर इस्राइल हा भारतासाठी दुसरा सर्वात मोठा संरक्षण क्षेत्रात पुरवठादार आहे.



आशियाई धावण्याच्या स्पर्धेत ४२ वर्षानंतर भारताला सुवर्ण 
मुसळधार पाऊस असूनही उत्सुकता ताणल्या गेलेल्या पुरुषांच्या चारशे मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या महंमद अनस याने सुवर्णपदक मिळविले.

अनसच्या कामगिरीमुळे ४२ वर्षांनंतर या शर्यतीमधील सुवर्णपदकाचा भारताचा दुष्काळ संपुष्टात आला. 

राष्ट्रीय विक्रमवीर महंमद अनसने ४५.७७ सेकंदात दिमाखात अंतिम रेषा पार केली. या शर्यतीत यापूर्वी १९७५ च्या सेऊल स्पर्धेत श्रीराम सिंग यांनी भारतासाठी एकमेव सुवर्ण व पदकही मिळविले होते. त्यानंतरही चारशे मीटरमध्ये एकाही भारतीय धावपटूला पदक मिळविता आले नव्हते. 

अनसपाठोपाठ आरोक्‍य राजीवने ४६.१४ सेकंदात रौप्यपदक मिळवून आनंदात आणखी भर घातली. तिसरा भारतीय अमोल जेकबचे ब्रॉंझपदक थोडक्‍यात हुकले. 

महिलांच्या शर्यतीतही तीन भारतीयांचा समावेश होता. त्यात ऑलिंपियन निर्मलाने ५२.०१ सेकंदात सुवर्णपदक जिंकून २००७ नंतर भारताला या शर्यतीत यश मिळवून दिले. सुवर्णपदकामुळे अनस व निर्मला लंडन विश्‍व स्पर्धेसाठी पात्र ठरले.



भारताने जिंकली आशियाई स्नूकर चॅम्पियनशिपभारताचा स्टार खेळाडू पंकज अडवाणी याने लक्ष्मण रावतच्या साथीने अंतिम फेरीत पाकिस्तानला धूळ चारत आशियाई सांघिक स्नूकर चॅम्पियनशिप जिंकली.

सर्वात आधी अडवाणीने मोहंमद बिलालविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली.  
तसेच दुसरीकडे त्याचा सहकारी रावतनेदेखील  संधीचे सोने करताना बाबर मसिह याला धूळ चारली.



भारतीय विद्यार्थ्यांचा ‘कलामसॅट’ उपग्रह अंतराळात
भारतीय विद्यार्थ्यानी विकसित केलेल्या ‘कलामसॅट’ उपग्रहाच्या समावेशासह एकूण ७० लहान उपग्रहांना २२ जुलै २०१७ रोजी वॉलॉप्स, व्हर्जिनिया येथून NASA ने अंतराळात सोडले आहे.

‘कलामसॅट’ हा उपग्रह चेन्नई येथील स्पेस किड्झ इंडिया या संस्थेमधील सहा जणांच्या चमूने विकसित केलेला आहे. या चमूचे नेतृत्व के. यज्ञ साई याने केले होते.

‘कलामसॅट (KALAM Sat)’ हा जगातील वजनाने सर्वांधिक हलका (सुमारे 64 ग्राम वजनाचा) आणि पहिला 3D-प्रिंटेड उपग्रह आहे.