इंडिया ब्ल्यू संघ दुलीप करंडक स्पर्धेचा विजेता
अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या दहा बळींच्या जोरावर इंडिया ब्ल्यू संघाने दुलीप करंडकाला गवसणी घातली. ब्ल्यू संघाने इंडिया रेड संघापुढे विजयासाठी ५१७ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना रेड संघाचा डाव १६१ धावांवर आटोपला आणि ब्ल्यू संघाने ३५५ धावांनी दणदणीत विजय मिळवला.पहिल्या डावात २५६ धावांची खेळी साकारणाऱ्या चेतेश्वर पुजाराला या वेळी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.




सायकलिंग मध्ये भारताला पहिल्याच दिवशी सहा पदके

०१. भारताच्या सायकलपटूंनी ट्रॅक आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सहा पदकांची कमाई केली. यामध्ये तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्यपदकाचा समावेश आहे. 

०२. इंदिरा गांधी क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत देबोराह हेरोल्डने दोन सुवर्णपदक पटकावली. तिने महिलांच्या एलिट गटात ५०० मीटर शर्यतीत ३५.९६४ सेकंदाची वेळ नोंदवून पहिले सुवर्ण जिंकले. मलेशियाच्या मोहम्मद अदनान फरिना शावती आणि हाँगकाँगच्या यीन यीन यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. 

०३. सांघिक महिला गटात भारतीय संघाने ३५.९६२ सेकंदासह सुवर्णपदक निश्चित केले. या संघात देबोराह आणि केझिया वर्घीसी यांचा समावेश होता. कझाकस्तानला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर राजकुमारी देवीला कांस्यपदक देण्यात आले.

०४. पुरुषांच्या सांघिक गटात इराणने ४६.३३० सेकंदासह सुवर्णपदक पटकावले. मलेशिया (४७.९९९ सेकंद) आणि कझाकस्तान (४७.६४१ सेकंद) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक मिळवले. 

०५. भारताच्या कनिष्ठ पुरुष संघाने रौप्यपदकाची कमाई केली. त्यांनी ४९.२९९ सेकंदासह कझाकस्तानवर कुरघोडी केली. 

०६. कनिष्ठ महिलांनी मात्र सुवर्णपदक पटकावले. तसेच अलेना रेजीने कनिष्ठ महिला गटात रौप्यपदक पटकावले.



आतेगावचा जन-वन योजनेत समावेश
०१. आतेगावच्या गावकऱ्यांनी वन्यजीव संरक्षणात मोलाची भूमिका बजावली आहे. अस्वल आणि तिच्या दोन पिलांना आसरा देऊन गावकऱ्यांनी जंगल आणि वन्यजीव संवर्धनात मोलाची कामगिरी बजावली आहे. ही कामगिरी पाहून वनाधिकाऱ्यांनी या गावाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी सकारात्मक पाऊले उचलली आणि हे गाव डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेत समाविष्ट केले आहे.

०२. गेल्या २०१५ सालच्या दिवाळीत एका गावकऱ्याकडे गाईच्या गोठय़ात अस्वल आणि तिची दोन पिले आढळून आली. गावकऱ्यांसाठी ही बाब धक्कादायक होती. त्यावेळी ग्राम परिस्थितीकीय समितीने गावात वन्यप्राणी संवर्धनासाठी जनजागृती केली. वन्यप्राण्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी गावकऱ्यांना केले 
 

०३. ५२ दिवसांनी मादी अस्वल आणि तिची पिले गावातून जंगलात कायमचे निघून गेले. जोपर्यंत अस्वल आणि तिची पिले गोठय़ात होती, तोपर्यंत गावकऱ्यांनी त्यांची काळजी घेतली. ते जंगलात निघून गेल्यानंतर गावकऱ्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला. 

०४. जंगल आणि वन्यप्राणी संवर्धनात सहभागी झाल्यामुळे हे गाव डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेत समाविष्ट करण्यात आले. वनखात्यातर्फे पुरवण्यात येणाऱ्या एलपीजी गॅस जोडणी, सौर कुंपण, पाठदिवे, स्वच्छता गृह, तसेच गावातील तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.आतेगावच्या या कामगिरीमुळे आता इतर गावांनीसुद्धा जंगल व वन्यजीव संवर्धनात सक्रीय सहभाग घेण्यास सुरुवात केली आहे.



स्त्री व पुरुषांचा मेंदू यांच्या कार्यपद्धतीत फरक नाही

०१. स्त्री व पुरुषांचा मेंदू यांच्या कार्यपद्धतीत फरक असतो, असे प्रतिपादन करणाऱ्या मेन आर फ्रॉम मार्स विमेन आर फ्रॉम व्हीनस या समजाला खोटे ठरवणारे संशोधन सामोरे आले आहे. १९९० मध्ये मेन्स आर फ्रॉम मार्स अँड विमेन फ्रॉम व्हीनस हे मानसशास्त्रावरील पुस्तक गाजले होते. 


०२. बर्मिगहॅमच्या अ‍ॅस्टन विद्यापीठाच्या बोधनशक्तीविषयक मेंदूवैज्ञानिक गिना रिपॉन यांनी म्हटले आहे की, स्त्रिया व पुरुष यांच्या मेंदूतील जोडण्या वेगळ्या पद्धतीच्या असतात याला काहीच आधार नाही. संशोधनानुसार आपण एका स्पेक्ट्रमचे सर्व भाग बायनरी पद्धतीने जोडल्याचे गृहित धरल्यास चुकीचे निष्कर्ष येतात. आपला मेंदू व वर्तन हे विविध गुणांचे पट असतात व त्यात पुरुष व स्त्रियांचा मेंदू असे वेगळे काही नसते. हे संशोधन ब्रिटिश विज्ञान महोत्सवात स्वानसी येथे मांडणार आहे. 

०३. मेन आर फ्रॉम मार्स, विमेन आर फ्रॉम व्हीन्स हे अमेरिकी लेखक जॉन ग्रे यांचे पुस्तक लोकप्रिय असले तरी स्त्री व पुरुषांचे मेंदू वेगळे असतात व त्यांचे वर्तन हे शारीरिक व संप्रेरकातील फरकांवर अवलंबून असते असे त्यांनी म्हटले होते ते खरे नाही. 



भारतीय वंशाचे वैज्ञानिक रासकर यांना ५ लाख डॉलर्सचा पुरस्कार
०१. भारतीय वंशाचे नाशिकला जन्मलेले वैज्ञानिक रमेश रासकर यांना ‘लेमेलसन एमआयटी’चा प्रतिष्ठेचा ५ लाख डॉलर्सचा पुरस्कार मिळाला आहे. 

०२. रासकर हे एमआयटी मीडिया लॅबमधील कॅमेरा कल्चर रीसर्च ग्रुपचे संस्थापक असून मीडिया आर्ट्स अँड सायन्सेस या संस्थेत सहायक प्राध्यापक आहेत. 

०३. त्यांच्या नावावर सध्या ७५ पेटंट असून १२० शोधनिबंध त्यांनी लिहिले आहेत. ‘फेमटो फोटोग्राफी’ या अल्ट्रा फास्ट इमेजिंग सिस्टीमचा शोध लावण्यात त्यांचा सहभाग होता.

०४. कमी खर्चातील डोळ्यांची काळजी घेणारी तंत्रे त्यांनी विकसित केली असून त्यांच्या कॅमेऱ्याच्या मदतीने पुस्तकाची पाने न उघडता पुस्तक वाचता येते.



चंद्रपूरममधील विद्यार्थ्यांना शनिवारपासून ताडोबाची नि:शुल्क शैक्षणिक सहल
०१. या जिल्ह्य़ातील शालेय विद्यार्थ्यांंना व्याघ्र प्रकल्प व वनसंवर्धनाचे महत्व विशद करणे, तसेच वन्यजीव व वनसंवर्धनासंदर्भातील विद्यार्थ्यांच्या जाणिवा अधिक समृध्द होण्याच्या दृष्टीने १७ सप्टेंबरपासून जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांंना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात नि:शुल्क शैक्षणिक सहल घडविण्याचा उपक्रम प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार आहे. 

०२. दरवर्षी साधारणत ६ हजार विद्यार्थ्यांँना याचा लाभ मिळेल. प्रायोगिक तत्वावरील हा उपक्रम येथे यशस्वी झाल्यावर हाच तो राज्यातील सर्वच व्याघ्र प्रकल्पांमध्येही राबवण्यात येणार आहे.

०३. या पाश्र्वभूमीवर प्रायोगिक तत्वावर प्रथमत: याच जिल्ह्य़ातील जिल्हा परिषदेच्या शाळा, आश्रमशाळा, अनाथाश्रमातील विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थ्यांना या व्याघ्र प्रकल्पात निशु:क शैक्षणिक सहल घडविण्याचा उपक्रम प्रकल्पाचे उपसंचालक कोअर कार्यालयामार्फत हाती घेण्यात आला आहे.



देवेंद्र झाझरिया

०१. देवेंद्र आठ-नऊ वर्षांचा असेल. एकदा झाडावर चढताना एका उघडय़ा वायरला त्याचा हात लागला. त्या वायरमधून ११ हजार व्होल्टचा झटका त्याला लागला आणि तो खाली पडला. या अपघातातून तो बचावला. मात्र हा विजेचा धक्का एवढा मोठा होता की त्याचा डावा हात अर्धा काढावा लागला. 

०२. खेळांची त्याला आवड होती. भालाफेकसारखा खेळ हातावर अवलंबून असलेला. एक हात नसला म्हणून काय झाले, आता याच खेळात कारकीर्द करण्याचा त्याने संकल्प केला.

०३. २००२ साली २१ व्या वर्षी देवेंद्र भारतातर्फे पूर्व आणि दक्षिण पॅसिफिक क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी झाला आणि पहिले आंतरराष्ट्रीय पदक पटकावले. त्यानंतर २००४ च्या पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण त्याच्या पदरात पडले. 


०४. त्यानंतर थेट या वेळी त्याने स्वत:चाच विक्रम मोडीत काढत नवा विश्वव्रिकम रचला आहे. २००४ साली देवेंद्रला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर २०१२ साली त्याला पद्मश्री हा किताबही देण्यात आला. 



ग्लुकोमा रुग्णांसाठी स्पर्शभिंगातून औषध
०१. ग्लुकोमा या कायमचे अंधत्व आणणाऱ्या रोगावर उपाय म्हणून वैज्ञानिकांनी स्पर्शभिंग (काँटॅक्ट लेन्स) तयार केले असून त्यात डोळ्यात आपोआप औषध सोडण्याची सुविधा आहे त्यामुळे ग्लुकोमा रुग्णांची स्थिती सुधारते. 

०२. वैज्ञानिकांच्या मते हे स्पर्शभिंग अभिनव असून त्यात औषधाची पॉलिमर फिल्म तयार करून त्यातून औषध सोडले जाते. ते नेहमी लॅटनोप्रोस्ट थेंब टाकण्यापेक्षा सोपे आहे. ग्लुकोमाचे प्रारूप तयार करून त्यात नवीन स्पर्श भिंगाचा वापर करण्यात आला आहे. 

०३. कमी प्रमाणात औषध यात वापरले जाते व त्यात डोळ्यांतील दाब कमी होतो, असे अमेरिकेच्या हार्वर्ड मेडिकल स्कूलचे जोसेफ बी. सियोलिनो यांनी सांगितले. या भिंगांमुळे थेंबापेक्षा जास्त फायदा होतो असे दिसून आले आहे. 

०४. ग्लुकोमामुळे जगात अनेक लोकांना कायमचे अंधत्व येत असते, त्यासाठी डोळ्यांतील दाब कमी करावा लागतो. थेंबामुळे डोळे चुरचुरतात आग होते व ते टाकणेही अवघड बनते. त्यामुळे थेंबाचा वापर ५० टक्के रुग्णातही शिस्तीने होत नाही. 

०५. नव्या पद्धतीत औषध सध्याच्या उणिवा दूर करून आपोआप डोळ्यांत भिंगातूनच सोडले जाते. ऑक्युलर औषधे डोळ्यांत वापरण्यासाठी स्पर्शभिंग उपयोगी असते. या स्पर्श भिंगात औषध असलेला पॉलिमरचा पडदा असतो, त्यामुळे नियंत्रित प्रमाणात औषध घातले जाते. ग्लुकोमा झालेल्या माकडांवर याचे यशस्वी प्रयोग झाले आहेत.