अर्जेटिनात मोठा उल्कापाषाण सापडला


०१. अर्जेटिनातील कॅम्पो डेल सिएलो येथे जगातील आतापर्यंतचा दुसरा


मोठा उल्कापाषाण उत्खननात सापडला आहे. वैश्विक कचऱ्याचा तीस टनांचा भार यात समाविष्ट आहे. तो जगातील दुसरा मोठा उल्कापाषाण आहे. त्यामुळे २६ विवरे तयार झाली आहेत. ४ ते ५ हजार वर्षांपूर्वी हा उल्कापाषाण पडला असावा. 


०२. त्याची पहिली नोंद स्पॅनिश गव्हर्नरांनी १५७६ मध्ये केली असून, काही लोक लोहखनिज गोळा करीत असताना त्यांना तो त्या वेळी दिसल्याचे सांगण्यात येते. हे लोह आकाशातून पडलेले आहे असे त्यांनी म्हटले होते व स्पॅनिश अधिकाऱ्यांना उल्कापाषाण कोसळला ते ठिकाण दाखवले होते. 

०३. कॅप्टन डी मिरावेल यांच्या नेतृत्वाखालील मोहिमेत काही लोहयुक्त उल्कापाषाण आणण्यात आले. त्यातील मेसॉन ड फिएरो हा सर्वात मोठा लोहयुक्त उल्कापाषाण होता. भारतीय लोकांना तो सापडला होता व स्पॅनिश लोकांपेक्षा आकाशातून लोह पडते अशी भारतीय लोकांची परंपरागत समजूत होती. 

०४. कॅम्पो हा त्यातील मोठा उल्कापाषाण आहे. तेथून काही टन भाग बाहेर काढण्यात यश आले आहे. कॅम्पो डेल सिएलो उल्कांमुळे काही छोटी विवरेही तयार झाली. त्यात ७८ बाय ६५ मीटरचे विवर सर्वात मोठे आहे. १० सप्टेंबरला या उल्कापाषाणाचे उत्खनन करण्यात आले. उल्कापाषाणांचे वजन मोजण्यासाठी काही शास्त्रीय पद्धती आहेत. त्यांची खनिजरचना व कालावधीही सांगता येतो. 

०५. आतापर्यंत सापडलेला सर्वात मोठा उल्कापाषाण हा होबा नावाचा असून त्याचे वजन ६० टन होते, तर तो नामिबियातील एका शेतात पडला होता. ८० हजार वर्षांपूर्वी तो जेथे पडला तेथेच तो अजून आहे. 

०६. अ‍ॅस्ट्रॉनॉमी असोसिएशन ऑफ चॅको या संस्थेने अलीकडेच एक मोठा उल्कापाषाण शोधला असून, तो १९६७ मध्ये सापडलेल्या ३७ टनांच्या उल्कापाषाणापेक्षा मोठा आहे. अर्जेटिनात जगातील तीन मोठय़ा उल्कापाषाणांपैकी दोन आहेत. 



ताऱ्याच्या आकाराच्या रेणूंनी महाजीवाणूंवर मात शक्य
०१. सध्या जी प्रतिजैविके उपलब्ध आहेत ती काही रोगांमध्ये प्रभावहीन ठरली आहेत, त्यामुळे आता काही जीवाणूंवर उपाय नसला तरी आता वैज्ञानिकांनी ताऱ्याच्या आकाराचे रेणू तयार केले असून, ते या जीवाणूंना मारू शकतात. प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या जीवाणूंवर यशस्वी उपचारांची शक्यता आता वाढली आहे.

०२. जीवाणू संसर्ग घातक असतो व आता जीवाणू प्रतिजैविकांना फारशी दाद देत नाहीत, यात जीवाणू प्रतिजैविकांपासून वाचण्यासाठी त्यांचे उत्परिवर्तन घडवून आणत असतात. हे उत्परिवर्तित जीवाणू म्हणजे महाजीवाणू मानले जातात, जे औषधांना दाद देत नाहीत. 

०३. गेल्या तीस वर्षांत केवळ दोन नवीन प्रतिजैविके तयार करण्यात यश आले आहे.

०४. क्वियाओ व त्यांच्या सहकाऱ्यांनी पेप्टाईड पॉलिमर्स तयार केले असून, त्यांनी अलीकडे ताऱ्याच्या आकारासारखे पॉलिमर तयार केले, ते ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया या घातक जीवाणूंना मारण्यात प्रभावी ठरत असते. ते शरीराला विषारी ठरत नाही. याबाबत लाल रक्तपेशींवर चाचण्या घेतल्या असता पॉलिमर मात्रा जर १०० पट जास्त असली तरच ते विषारी ठरतात. 

०५. ताऱ्यांच्या आकाराचे पेप्टाईड पॉलिमर्स हे महाजीवाणूंना मारण्यात मदत करतात. त्यांच्या चाचण्या प्राण्यांमध्ये यशस्वी झाल्या आहेत. अनेक पथमार्गिका असलेल्या जीवाणूंना ताऱ्यांच्या आकाराचे पेप्टाइड पॉलिमर्स मारत असतात. 

०६. काही प्रतिजैविके केवळ विशिष्ट मार्गिका असलेल्या जीवाणूंना मारतात, ती मर्यादा यात नाही. ताऱ्यांच्या आकाराचे पेप्टाईड पॉलिमर्स हे प्रतिजैविकांपेक्षा जास्त प्रभावी असतात. जीवाणूंच्या पेशीभित्तिका यात भेदल्या जातात.



फ्रान्समधील शहरात चालकरहित बस सुरू
०१. जगातील पहिली चालकरहित मोटार फ्रान्समधील लायन येथे सुरू झाली असून ती या शहरातील काही भागात सेवा देणार आहे. या बसमध्ये दोन इलेक्ट्रिक शटल असून त्यांच्या मदतीने दहा मिनिटांचा मार्ग प्रवासी पार करू शकतील. चालकरहित बसमध्ये १५ प्रवासी बसू शकतात व त्या इलेक्ट्रिक बसेस आहेत. 

०२. लिडार रडार तंत्रज्ञान त्यात वापरण्यात आले आहे व त्यात अपघात टाळण्यासाठी गती संवेदकांचा वापर केलेला आहे. लिडार रडार तंत्रज्ञान हे आपण नेमके कुठे आहोत व आजूबाजूला काय घडते आहे हे समजून घेण्यासाठी असते. या तंत्रज्ञानाच्या मदतीने बसचे संचालन अतिशय स्मार्ट पद्धतीने करून टकरी टाळल्या जातात. 

०३. लिडार हे लाइट डिटेक्षन अँड रेजिंग या शब्दाचे लघुरूप असून त्याचा उपयोग प्रथम रडारमध्ये केला जात होता. ती टेहळणी तंत्रज्ञानाची पद्धत असून त्यात एखादे लक्ष्य लेसरने प्रकाशित करून त्याचे अंतर मोजले जाते. जास्त विवर्तन क्षमतेचे नकाशे, जिओमॅटिक्स, पुरातत्त्वशास्त्र, भूगोल, भूगर्भशास्त्र, वनसंवर्धन, वातावरणीय भौतिकशास्त्र यात हे तंत्रज्ञान वापरले.



* रशियाची दोन ऑलिम्पिक पदके काढून घेणार
०१. यंदाच्या रिओ ऑलिम्पिकमधून डोपिंगमध्ये दोषी आढळलेल्या रशियन खेळाडूंवर बंदी लादण्यात आली होती. डोपिंगच्या आरोपांचा सामना करत असलेल्या रशियाला आणखी एक धक्का बसला आहे. पुन्हा झालेल्या डोप चाचणीनंतर २००८ बीजिंग ऑलिम्पिक खेळातील रशियाची दोन पदके काढण्यात आली आहेत. 

०२. बीजिंग आणि लंडन ऑलिम्पिकच्या १ हजार नमुन्यांपैकी पुनर्परीक्षणात ९८ चे निकाल पॉझिटिव्ह असल्याचे काही दिवसांपूर्वी आयओसीने सांगितले होते.आयओसी खेळाडूंचे नमुने १० वर्षे सांभाळून ठेवत असते. 

०३. चार रशियन खेळाडूंची पुन्हा चाचणी करण्यात आली. यात ते दोषी आढळले. यातील बीजिंग खेळांचे त्याचे पदक अमान्य करण्यात आले आहे. यात महिला गटातील भालाफेकीत रौप्यपदक जिंकणारी मारिया अबाकुमोवा आणि रशियाची चार बाय ४०० मी. रिले टीमचे कांस्य जिंकणारा डेनिस एलेक्सिव यांचा समावेश आहे, असे आयओसीने सांगितले. या दोन रशियन खेळाडूंची पदके परत घेण्यात आली आहेत. 

०४. रशियाची दोन पदके हिसकावल्यामुळे इंग्लंडला दोन कांस्यपदके मिळू शकतात, तर जर्मनीची भालाफेकपटू क्रिस्टिना ऑबेर्गफोएलला रौप्यपदक, तर चौथ्या स्थानी असलेल्या इंग्लंडच्या गोल्डी सेयर्सला कांस्यपदक मिळेल. 

०५. सेयर्सने बीजिंगमध्ये विक्रम केला होता. या स्पर्धेतील सुवर्ण झेक गणराज्यच्या बारबोरा स्पोटाकोवाला मिळाले होते. पुरुषांच्या रिलेत इंग्लंडने चौथे स्थान पटकावले होते. यामुळे त्यांना आता कांस्यपदक मिळू शकते. रशियन संघ त्या वेळी तिसऱ्या स्थानी होता आणि कांस्यपदक जिंकले होते. यात अमेरिका रिले टीमने सुवर्ण जिंकले होते.