०१. लॉस एंजलिस टाइम्स’चे माजी संपादक आणि पुलित्झर पुरस्कार विजेत्या जॉन कॅरोल या पत्रकाराचे नुकतेच निधन झाले आहे. कॅरोल यांनी पाच वर्षे ‘लॉस एंजलिस टाइम्स’चे संपादक पद सांभाळले होते. याकाळात त्यांना १३ वेळा पुलित्झर पुरस्कार मिळाला होता. 


०२. शेवटच्या वर्षांमध्ये त्यांना तब्बल सातवेळा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पत्रकारितेत ४० वर्षे ते कार्यरत होते. २००५मध्ये त्यांनी ‘लॉस एंजलिस टाइम्स’च्या संपादक पदाचा राजीनामा दिला होता.


०३. देशातील नक्षली हिंसाचारात आतापर्यंत तीन हजार सुरक्षा जवानांसह पंधरा हजार जण गेल्या ३५ वर्षात ठार झाले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार १९८० पासून १२१७७ नागरिक नक्षलवाद्यांच्या हिंसाचारात बळी पडले असून, ३१२५ सुरक्षा कर्मचारीही मरण पावले आहेत. 


०४. १९८० ते ३१ मे २०१५ दरम्यान सुरक्षा दलांनी ४७६८ नक्षलवाद्यांना ठार केले आहे.पोलीस दलांच्या आधुनिकीकरणासाठी विविध राज्यांना गेल्या तीन वर्षांत ३०३८.८६ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. नक्षलवादग्रस्त १० राज्यांत ४०० तटबंदी असलेले पोलीस स्टेशन्स मंजूर करण्यात आले आहेत. त्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनला २ कोटी रुपये देण्यात आले.


०५. पहिल्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त २१ जूनला संयुक्त राष्ट्रात होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज  असणार आहेत. 


०६. अमेरिकेची नासा ही अवकाश संशोधन संस्था २०१६ मध्ये मंगळावर एक नवीन यांत्रिक गाडी पाठवीत असून तिच्या समवेत मंगळाभोवती फिरू शकतील, असे दोन क्यूबसॅट उपग्रह सोडणार आहे. क्यूबसॅट हे असे उपग्रह आहेत जे अतिशय लहान असूनही अचूक तंत्रज्ञानाने माहिती गोळा करू शकतात.


०७. दोन क्यूबसॅट हे रिले पद्धतीने काम करणार असून, ते कॅलिफोर्नियातील पॅसाडेनात जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीने तयार केले आहेत, असे नासाने म्हटले आहे. मार्स क्यूब १ (मार्को) हा छोटा उपग्रह त्यात समाविष्ट आहे. 


०८. मार्च २०१६ मध्ये तो नासाच्या इनसाइट लँडर समवेत सोडला जाईल. मंगळाची अंतर्गत रचना समजण्यासाठी इनसाईट लँडर ही नासाची पहिलीच मोहीम आहे. मार्को उपग्रह हे मंगळाभोवती फिरतील व इनसाईट मंगळावर सप्टेंबर २०१६ मध्ये उतरेल.


०९. अॅीटलास बूस्टरच्या मदतीने हे उपग्रह सोडले जाणार आहेत. दोन सोलर पॅनेल व रेडिओ अँटेना सुरू करणे हे त्यांच्याबाबत मोठे आव्हान असणार आहे. मंगळासाठी वेगळी संदेशवहन प्रणाली तयार करण्यासाठी मार्को (मार्स क्यूब वन) उपग्रहांचा प्रयोग उपयोगी पडणार आहे.


१०. अणुदुर्घटनेत मदतीसाठी अणुदायित्व कायद्यातील तरतुदींनुसार सरकारने १५०० कोटींच्या आण्विक विमा संचयाची घोषणा केली आहे.  जनरल इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया व न्यू इंडिया, ओरिएंटल इन्शुरन्स, नॅशनल इन्शुरन्स, युनायटेड इंडिया इन्शुरन्स अशा ११ कंपन्यांना यात सहभागी केले आहे.


११. ईशान्य भारतातील आठ अतिरेकी संघटनांच्या ‘युनायटेड पीपल्स फ्रन्ट’ने केंद्र सरकारशी नुकताच शांतता करार केला आहे.  मिझो नॅशनल फ्रन्टचे अध्यक्ष झोरामथांगा यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या तसेच या संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत नवी दिल्लीत गृह विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. 


१२. या करारानुसार परस्परांवरील हल्ल्यांना पूर्णविराम देण्यात आला आहे. ‘युनायटेड पीपल्स फ्रन्ट’मध्ये कुकी नॅशनल फ्रन्ट, झोमी क्रांतीकारी दल, कुकी क्रांतीकारी दल, झोमी संरक्षण दल, संयुक्त कुकी मुक्ती संघटना, कुकी क्रांतीकारी संघटना, झोमी संरक्षण स्वयंसेवक आणि मार पीपल्स कन्वेन्शन (डेमोक्रॅटिक) यांचा समावेश आहे.


१३. अरुणाचल प्रदेशातील धरण विरोधी कार्यकर्त्यांनी सियांग नदीवर दोन मोठय़ा धरणांना विरोध केला आहे. स्वयंसेवी संस्था असलेल्या सियांग पीपल्स फोरमने या धरणांना विरोध केला आहे.
सियांग नदीवर चाळीस धरणे बांधली जाणार आहेत, तिचा उगम यारलुंग सानगपो नदीच्या रूपात तिबेटच्या पठारावर होतो व नंतर ती ब्रह्मपुत्रेला मिळते. सियांग नदी राज्यात २९४ कि.मी भागातून जाते व २.५ लाख लोकांची ती जीवनदायिनी आहे.


१४. चंडीगड मधील ‘रॉक गार्डन’ची निर्मिती करणाऱ्या नेकचंद सैनी या स्थापत्य विशारदाचे नुकतेच वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले आहे. नेकचंद यांना भारत सरकारने १९८४ मध्ये ‘पद्मश्री’ देऊन गौरवले होते.पंजाबमध्ये १९५१ मध्ये ते रस्तेनिरीक्षक म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्यात काम करीत होते. सुकना सरोवराच्या ठिकाणी बाग सजवली. 


१५. रॉक गार्डनचे उद् घाटन १९७६ मध्ये झाले. हे गार्डन चाळीस एकर जागेत असून, अडीच लाख लोक त्याला दरवर्षी भेट देतात, त्याचे वार्षिक उत्पन्न १.८ कोटी आहे. नेकचंद यांच्या टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या कलाकृती वॉशिंग्टनच्या राष्ट्रीय बाल संग्रहालयात आहेत. त्यांची ४० शिल्पे ब्रिटनमध्ये वेस्ट ससेक्स येथे चिसेस्टरच्या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. नेकचंद यांचे पुत्र अनुज सैनी यांनी त्यांना रॉक गार्डन तयार करण्यात मदत केली होती.


१६. एच १-बी व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याच्या शक्यतेवरून अमेरिकी सरकारने भारतातील आऊटसोर्सिंग क्षेत्रातील टाटा कन्सल्टंन्सी सर्व्हिसेस आणि इन्फोसिस या दोन मोठ्या कंपन्याची चौकशी सुरू केली आहे. 


१७. राज्य सरकारच्या आग्रहामुळे चर्चगेट-विरार एलिव्हेटेड प्रकल्प गुंडाळण्यात आला असून त्याऐवजी अंधेरी ते विरार एलिव्हेटेड प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. 


१८. सरकारी कामांसाठी अधिकाऱ्यांच्या भेटीची वेळ ऑनलाईन ठरविता येणार असून यासाठी राष्ट्रीय माहिती केंद्राकडून हाताळण्यात येणारे myvisit.gov.in हे पोर्टल ‘डिजिटल इंडिया’ मोहीमेतंर्गत सुरू करण्यात आले आहे. 


१९. ब्रिटनमधील ‘पील पोर्टस’ने जवाहरलाल नहेरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) सोबत करार केला आहे. याअंतर्गत उभय बंदरांतर्गत भागीदारी व्यवहार होणार आहेत. गेल्या वर्षी ब्रिटनमार्फत भारतात ३२ कोटी डॉलरची गुंतवणूक झाली. यात भारतातील एकूण थेट विदेशी गुंतवणुकीपैकी १० टक्का हिस्सा आहे.या करारांतर्गत जेएनपीटी आणि पील पोर्टस यांच्या दरम्यान बंदर व्यवस्थापन तसेच बंदर वाहतूक व व्यापारासाठी सहकार्य करण्याचे निश्चित करण्यात आले.


२०. शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रा. डॉ. देवानंद शिंदे यांची  निवड झाली आहे. 


२१. अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात अल्‌-कायदा या दहशतवादी संघटनेचा नासीर अल्‌-वुहायशी हा म्होरक्या् ठार झाला आहे, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे. येमेनी भागाची जबाबदारी त्याच्याकडे होती. वुहायशीची माहिती देणाऱ्यास अमेरिकन सरकारने दहा मिलियन डॉलरचे बक्षीस जाहीर केले होते.


२२. अभिनेता आणि तृणमूल कॉंग्रेसचा खासदार मिथुन चक्रवर्ती याने

शारदा ग्रुपचा “ब्रॅण्ड ऍम्बेसेडर‘ म्हणून स्वीकारलेली १ कोटी १९ लाख ८८ हजार ५६० रुपयांची रक्कम अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) परत केली आहे. मागील महिन्यात अंमलबजावणी संचालनालयाने मिथुनची चौकशी केली होती. जून २०१४ मध्ये शारदा ग्रुपने मिथुनच्या खात्यात २ कोटींपेक्षा कमी रक्कम हस्तांतरित केल्याने मिथुनची चौकशी करण्यात आली होती.


२३. बांगलादेश स्वातंत्र्ययुद्धादरम्यान अत्याचार केल्याप्रकरणी माजी मंत्री तथा इस्लामिक पक्षाच्या अशन मोहम्मद मोजाहिद (वय ६७) या नेत्याला सर्वोच्च न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. अशन मोहम्मद मोजाहिद हा जमात-ए-इस्लामी पक्षाचा सरचिटणीस आहे. वंशहत्या, विचारवंतांचा खून आदी गुन्ह्यांमध्ये तो २०१३ मध्ये दोषी ठरला होता. २००१-०६ दरम्यान माजी पंतप्रधान खालीदा झिया यांच्या काळात तो मंत्री होता.


२४. राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या परळी वैजनाथ येथील स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणी प्रसुतिपूर्व गर्भलिंग निदान कायद्यानुसार येथील डॉ. सुदाम मुंडे व डॉ. सरस्वती मुंडे या दांपत्याला विविध आठ कलमांखाली दाखल झालेल्या गुन्ह्यांत प्रत्येकी सहा महिने कैद, दहा हजार रुपये दंड अशी एकूण ४८ महिने कैद व ८० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.


२५. राज्यात गाजलेल्या या प्रकरणाला लेक वाचवा अभियानाच्या कार्यकर्त्या ऍड. वर्षा देशपांडे यांनी वाचा फोडली होती. प्रसुतिपूर्व गर्भलिंग निदान तंत्र कायद्यानुसार या दांपत्यावर १९ सप्टेंबर २०१० मध्ये परळी उपजिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक कैलास दुधाळ यांच्या फिर्यादीवरून विविध आठ गुन्हे दाखल झाले होते.