चंद्रपूर औष्णिक केंद्रात ९ वा संच

०१. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील ५०० मेगावॅटचा ९ व्या क्रमांकाचा संच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात व्यावसायिकदृष्टय़ा सुरू करण्यात येणार आहे. नववा संच सुरू होताच या वीज केंद्राची स्थापित क्षमता २ हजार ९२० मेगावॅट होणार आहे. हा सर्वात मोठा वीज प्रकल्प राहणार आहे.


०२. आशिया खंडातील क्रमांक दोनचे विजनिर्मिती केंद्र, अशी या महाऔष्णिक विद्युत केंद्राची ओळख होती. कालांतराने ती पुसली गेली. दरम्यान, ५०० मेगावॅटचा आठव्या क्रमांकाचा संच ५ जुलैला व्यावसायिकदृष्टय़ा सुरू झाला. आता नवव्या क्रमांकाचा संचही तातडीने सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्नरत आहे.

०३. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र एकमेव आहे ज्या केंद्राचे स्वत:चे इरई धरण आहे. या धरणातूनच या वीज केंद्राला नियमित पाणी पुरवठा होतो, तसेच वेकोलिच्या कोळसा खाणीही या केंद्राच्या आजूबाजूला आहे, त्यामुळे कोळशा व पाण्याची टंचाई या केंद्राला कधीच जाणवली नाही.



न्यूयॉर्क खंडपीठामध्ये डायने गुजराती न्यायाधीश
०१. अमेरिकेतील जिल्हा न्यायालयाच्या न्यूयॉर्क खंडपीठामध्ये ४७ वर्षीय डायने गुजराती यांची ओबामा यांनी न्यायाधीशपदी नियुक्तीकेली असून, सिनेटच्या मंजुरीनंतर त्या कार्यभार स्वीकारतील असे सांगण्यात आले. 

०२. भारतीय-अमेरिकन वंशाच्या गुजराती या २०१२ पासून दक्षिण न्यूयॉर्क जिल्ह्याच्या न्यायाधीशांच्या कार्यालयात गुन्हे विभागाच्या उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. 

०३. गुजराती या अमेरिकेतील वेस्ट पॉइंट येथील लष्करी अकादमीतील प्राध्यापक दामोदर गुजराती यांच्या कन्या आहेत.  
दामोदर गुजराती यांनी १९६० मध्ये मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी संपादन केली होती. तसेच १९६५ मध्ये शिकागो विद्यापीठातून पीएचडी प्राप्त केली होती.



कॅसिनी यान प्रवासाच्या अंतिम टप्प्यात
०१. शनी व त्याची कडी व चंद्र यांचा अभ्यास केल्यानंतर आता नासाचे कॅसिनी यान त्याच्या प्रवासातील अंतिम टप्प्यात जाणार आहे. आता ते शनि ग्रह व त्याच्या कडय़ांची अधिक जवळून निरीक्षणे करणार आहे. या ऐतिहासिक वैज्ञानिक सफरीची सांगता पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये होणार आहे, पण त्याआधी दोन टप्प्यांचा कार्यक्रम हे यान पूर्ण करणार आहे.

०२. ३० नोव्हेंबरला कॅसिनी यान शनिच्या कडय़ाच्या कक्षांमध्ये जाणार असून, त्याला एफ रिंग ऑर्बिट्स असे म्हणतात. कॅसिनी यान एफ रिंगपासून ७८०० किलोमीटर अंतरावर असणार आहे. एफ रिंग कक्षांमध्ये ही कडी व शनिचे लहान चंद्र अधिक स्पष्टपणे दिसणार आहेत. गेल्या वेळी २००४ मध्ये हे यान शनिजवळ गेल्यानंतर कडय़ांच्या अगदी जवळ गेले होते.

०३. कॅसिनीचा अंतिम टप्पा हा ग्रँड फायनल म्हणून ओळखला जात असून तो पुढील वर्षी एप्रिलमध्ये सुरू होईल. शनिच्या टायटन या चंद्राच्या अगदी जवळून हे यान मार्गस्थ होईल व शनि तसेच त्याच्या कडय़ांमधील जागेतून हे यान जाणार असून, त्यात २४०० किलोमीटरचा आतापर्यंत न पाहिला गेलेला भाग बघितला जाणार आहे.

०४. कडय़ांवरील धुळीच्या आकाराचे कण तपासले जाणार आहेत. शनिची अशी मापने प्रथमच केली जाणार आहेत. एफ रिंगचा अभ्यास महत्त्वाचा असून, अंतिम टप्प्यात यान वेगळय़ा कक्षेतून प्रवास करणार आहे. २०१६ पासून कॅसिनी यानाची कक्षा बदलण्याचे प्रयत्न वैज्ञानिकांनी सुरू केले आहेत.



बलुच भाषेत संकेतस्थळ व मोबाईल ऍप
०१. बलुचिस्तानमध्ये रेडिओ कार्यक्रमांचे प्रसारण करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतल्यानंतर तेथील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोचण्याच्या हेतूने आता बलुच भाषेत संकेस्थळ व मोबाईल ऍप सुरू करण्याची योजना ऑल इंडिया रेडिओने (एआयआर)आखली आहे. येत्या आठवड्याभरात ही सुविधा प्रत्यक्ष कार्यान्वित होणार आहे. 

०२. बलुचिस्तानशी असलेले संबंध वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने तेथे रेडिओ कार्यक्रमांचे प्रसारण करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला होता. 
त्यानुसार आता दररोज विविध कार्यक्रम रेडिओद्वारे प्रसारित केले जातात. यात दैनंदिन बातम्यांचाही समावेश आहे. 

०३. बलुच नेते ब्रह्ममदाग बुग्ती यांची मुलाखत घेण्यासाठी डीडी न्यूजने नुकतीच आपली एक टीम जिनिव्हा येथे पाठविली होती. 

०४. सध्या ‘ऑल इंडिया रेडिओ’चे  १०८ देशांमध्ये प्रसारण होते. २७ भाषांमध्ये विविध कार्यक्रम होतात. या कार्यक्रमांत १५ परदेशी भाषांचा अंतर्भाव आहे.



भारतीय नौदलात मोरमुगाओचे जलावतारण
०१. भारतीय नौदलाच्या मोरमुगाओ या दिशादर्शक क्षेपणास्त्र विनाशिकेचा अनावरण सोहळा शनिवारी मुंबईत पार पडला. मोरमुगाओची बांधणी नौदलाच्या मुंबईच्या माझगाव येथील गोदीत करण्यात आली आहे. मोरमुगाओ ही १५ बी प्रकल्पातील दुसरी युद्धनौका असून ही भारतीय नौदलातील अत्याधुनिक युद्धनौकांपैकी एक आहे. 

०२. नौदलप्रमुख अॅडमिरल सुनील लांबा व त्यांच्या पत्नी रीना लांबा यांच्या उपस्थितीत मुंबईच्या समुद्रात मोरमुगाओचा जलावतरण सोहळा पार पडला. प्राथमिक चाचण्यांनंतर मोरमुगाओ पुढील दोन वर्षांत ही नौदलात सहभागी होणार आहे.

०३. मारूमुगाओचे पाण्यातील आकारमान ७३०० टन असून ही युद्धनौका ३० नॉट इतक्या वेगाने प्रवास करू शकते. या युद्धनौकेवर जमिनीवरून जमिनीवर, जमिनीवर हवेत मारा करणारी आणि पाणबुडीविरोधी क्षेपणास्त्रे तैनात असतील.

०४. या युद्धनौकेवरून पाणबुडीविरोधी युद्धतंत्राने सुसज्ज असलेली हेलिकॉप्टर्सही वाहून नेता येतील. आगामी काळात या विनाशिकेवर सहा ब्रह्मोस क्षेपणास्त्रे तैनात करण्यात येणार आहेत. ही नौका ५६ किमी प्रतीतास वेगाने ७५ हजार किमीपर्यंत सागरी सीमांचे संरक्षण करणार आहे. 

०५. या नौकेवर तैनात असलेली सर्व क्षेपणास्त्रे ही स्वदेशी बनावटीची असणार आहेत. ‘मारमुगाओ’वर ईस्त्राइलमध्ये विकसित झालेली मल्टी फंक्शन सर्व्हिलान्स थ्रेट अलर्ट रडार यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यामुळे क्षेपणास्त्र विनाशक म्हणून तिची ओळख झाली आहे.



अर्जुन पुरस्कार प्रदान
०१. क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांना अर्जुन पुरस्कारने गौरवले. अजिंक्य रहाणेला या वर्षीचा तर रोहित शर्माला गेल्या वर्षी अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.

०२. जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये आयोजित एका सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार खेळाडूंना मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पाच लाख रुपये रोख देण्यात आले.



एशिया कप ट्रॅक सायकलिंग मध्ये भारताला १६ पदके
०१. भारतीय संघाने आशिया चषक ट्रॅक सायकल शर्यतीत १६ पदकांसह (५ सुवर्ण, ४ रौप्य आणि ७ कांस्यपदक) स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले. ११ सुवर्ण, ४ रौप्य आणि ३ कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या हाँग काँगने अव्वल स्थान पटकावले.

०२. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारताने दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदकांची कमाई केली. 


०३. देबोराह हेरोल्डने अंतिम शर्यतीत पहिल्या व दुसऱ्या फेरीत अनुक्रमे १२.५७६ सेंकद व १२.४९३ सेंकदाची वेळ नोंदवून अव्वल स्थान पटकावले.हाँग काँगच्या झाओजुआनला रौप्य, तर मलेशियाच्या फरीना शवातीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. 

०४. मात्र, केइरीन प्रकारात देबोराहला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. केझीया वर्घेस्सेला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. 

०५. या स्पर्धेत देबोराहने एकूण तीन सुवर्ण व एक रौप्यपदकाची कमाई केली.

०६. पुरुषांच्या केइरीन गटात भारताच्या अमरजीत सिंगला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले, परंतु कनिष्ठ गटात इमर्सनने भारतासाठी कांस्यपदक जिंकले. कनिष्ठ गटात भारताच्या सनुराज पी. याने कांस्यपदक जिंकले. 

०७. महिलांच्या गटात नयना राजेश व अनु चुटीया यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक पटकावले. सांघिक महिला गटात भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. राज कुमारी देवी, बिद्या लक्ष्मी तौरांगबाम, ऋतुजा सातपुते व जी. अम्रिता यांचा या संघात समावेश होता.



सांस्कृतिक संचालकपदी संजय पाटील
०१. सांस्कृतिक संचालनालयाच्या संचालकाची जबाबदारी संजय पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. लवकरच पाटील या पदाचा भार स्वीकारतील.

०२. अजय आंबेकर हे संचालकपदावरून गेल्यानंतर संचालकपदाचा प्रभारी कार्यभार शैलेश जाधव आणि संजय पाटील यांनी सांभाळला होता. तीन वर्षांच्या कालावधीसाठी पाटील सांस्कृतिक संचालनालयाच्या संचालकपदाचा कार्यभार सांभाळतील. 



चीनने अवकाश प्रयोगशाळेचे प्रक्षेपण केले
०१. अंतराळ स्थानकाच्या निर्मितीसाठी आवश्‍यक असलेल्या दुसऱ्या अवकाश प्रयोगशाळेचे चीनने प्रक्षेपण केले.  २०२२ पर्यंत कायमस्वरूपी अवकाश स्थानक तयार करण्यासाठीच्या दूरगामी आराखड्याचा हा एक भाग असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.



देशात २७००० किमीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर
०१. देशातील २७ हजार कि.मी. लांबीच्या ४४ महामार्गांचा ‘इकॉनॉमिक कॉरिडॉर’ म्हणून विकास करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या महामार्गावरील ३0 मोठ्या शहरांचाही विकास करण्यात येणार आहे.

०२. वाजपेयी सरकारने गोल्डन क्वॉड्रिलॅटरल आणि नार्थ साउथ इस्ट वेस्ट कॉरिडॉर या दोन योजना आखून १३ हजार कि.मी. महामार्गांचा विकास केला होता. त्यानंतरचा सर्वांत मोठा महामार्ग विकास कार्यक्रम म्हणून इकॉनॉमिक कॉरिडॉरकडे पाहिले जात आहे. 

०३. हे महामार्ग मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर्स, बंदरे आणि अन्य बड्या औद्योगिक वसाहतींमधून जातील. त्यामुळे त्यांना इकॉनॉमिक कॉरिडॉर असे नाव देण्यात आले आहे. ही योजना सहा वर्षांत पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. 

०४. प्रकल्पाला निधी मिळविण्यासाठी रस्ते विकास उपकर, कर्ज आणि खासगी गुंतवणूक या उपायांचा वापर केला जाऊ शकतो. महामार्गांना जोडणारे आणखी १५ हजार कि.मी. लांबीचे रस्ते विकसित करण्यात येतील. एकमेकांना जोडणारे ४0 कॉरिडॉर विकसित केले जातील.

०५. ते ४४ इकॉनॉमिक कॉरिडॉरला, तसेच गोल्डन क्वॉड्रिलॅटरलला जोडले जातील. या मार्गांवरून देशातील ८0 टक्के मालवाहतूक होईल.