ओबामांनी फेटाळले सौदीवरील कारवाईचे विधेयक

०१. अमेरिकेतील ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांना सौदी अरेबियावर खटला भरण्यास परवानगी देण्याची तरतूद असलेले विधेयक अध्यक्ष बराक ओबामा यांनी फेटाळले आहे.


०२. जस्टिस अगेन्स्ट स्पॉन्सर्स ऑफ टेररिझम अॅक्ट बिल रिपब्लीकनांचे बहुमत असलेल्या काँग्रेसमध्ये दोन्ही सभागृहात मंजूर झाले होते, पण त्या विधेयकास मान्यता दिले तर दीर्घकालीन आंतरराष्ट्रीय तत्त्वांचे उल्लंघन होऊ शकते व अमेरिकेचे परदेशातील हितसंबंध धोक्यात येऊ शकतात, असे ओबामा यांनी काल सांगितले.



महात्मा फुलेंना ‘भारतरत्न’ देण्याची शिफारस
०१. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्याची अधिकृत शिफारस निवृत्त न्यायाधीश के. ईश्व्रय्या यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय इतर मागासवर्गीय आयोगाने केल्याचे समजते. अशीच शिफारस यापूर्वी महाराष्ट्र सरकारनेही केलेली आहे. 


०२. महात्मा फुले यांच्याबरोबरच बी.पी. मंडल यांनाही भारतरत्न देण्याची शिफारस आयोगाची आहे. इतर मागासवर्गीयांना २७ टक्के आरक्षण देण्याची शिफारस करणारया मंडल आयोगाचे बी.पी. मंडल हे अध्यक्ष होते. अशी शिफारस आयोगाच्या अखत्यारित येत नसल्याने ती केंद्र सरकारवर बंधनकारक नाह. पण त्यामुळे या जुन्या मागणीला बळ मिळणार आहे.

०३. महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस केली आहे. याशिवाय काँग्रेसचे हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केली होती.



अमेरिका व भारतामध्ये ‘दोस्ती हाऊस’ 
०१. दोन देशांतील संबंध सुधारण्यासाठी विविध उपक्रम आंतरराष्ट्रीय पातळीवर राबविले जातात. तशाचप्रकारे अमेरिकन आणि भारतीय नागरिकांनी एकत्र येऊन विचारांची, माहितीची देवाण-घेवाण करावी यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यात आले. तसेच यानिमित्ताने वांद्रे-कुर्ला संकुलात यूएस कौन्सुलेटमध्ये ‘दोस्ती हाऊस’ सुरू करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

०२. दोन्ही देशांतील व्यक्तींना एकत्र येण्यासाठी पूर्वी ज्या ठिकाणी अमेरिकन लायब्ररी होती त्या ठिकाणी हे ‘दोस्ती हाऊस’ तयार करण्यात आले आहे. 
या ठिकाणी काही बदल करून तयार करण्यात आलेल्या या हाऊसमध्ये दोन्ही देशांतील नागरिक एकत्र येऊन शिकू शकतात, कला सादर करू शकतात.

०३. या पद्धतीने अमेरिकेने १६९ देशांत अशाप्रकारे ७०० जागा निर्माण केलेल्या आहेत. त्याच धरतीवर हे हाऊस उभारण्यात आले आहे. 
हाऊसमध्ये महत्त्वाची एक बाब म्हणजे लायब्ररी तयार करण्यात आली आहे. ‘ट्रॅडिशनल लायब्ररी’त १० हजार पुस्तके, ७०० चित्रपट आणि १३० पिरीऑडिकल्स उपलब्ध आहेत.



पतधोरण समितीवर तीन जणांची नियुक्ती
०१. रिझर्व्ह बँकेचे धोरणात्मक व्याजदर काय असावेत, हे ठरविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पतधोरण समितीवर (एमपीसी) सरकारने तीन सदस्यांची नेमणूक केली.रिझर्व्ह बँकेच्या नामित सदस्यांसह व्याजदर ठरविण्याचे काम हे सदस्य करतील.

०२. महागाईचा दर ४ टक्क्यांवर ठेवण्याचे उद्दिष्ट सरकारने रिझर्व्ह बँकेला दिले. 
तसेच त्यानुसार, व्याजदर ठरविण्याचे आव्हान समितीसमोर असेल.

०३. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या नेतृत्वाखाली या समितीवर प्रा. चेतन घाटे (भारतीय सांख्यिकी संस्था), पामी दुआ (संचालक, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स) व प्रा. रवींद्र एच. ढोलकिया (आयआयएम अहमदाबाद) यांच्या नेमणुका सरकारने केल्या आहेत.






मंगळयान मोहिमेला दोन वर्षे पूर्ण
०१. मार्स ऑर्बिटर मिशन (मॉम) या भारताच्या मंगळ मोहिमेला काल दोन वर्षे पूर्ण झाली असून अपेक्षेपेक्षा यानाने अधिक काळ काम दिले आहे. आता पुढील वर्षी या अवकाशयानाचा अंधारात असण्याचा काळ म्हणजे ग्रहण काळ कमी करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

०२. मॉम मोहिमेला दोन वर्षे पूर्ण झाली असून त्याचा अपेक्षित कार्यकाल सहा महिने होता. त्यानंतर वर्षभर त्याच्या पाच पेलोडमधून मिळालेली माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोने प्रसारित केली. ग्रहण काळात त्याला बॅटरीचा आधार घ्यावा लागतो. जर ग्रहण काळ कमी केला तर ती बॅटरी जास्त काळ टिकू शकेल. 

०३. ग्रहण काळाचा परिणाम अवकाशयानाच्या कार्यक्षमतेवर कमी व्हावा यासाठी हा प्रयत्न केला जाणार असून अजूनही यानात बऱ्यापैकी इंधन आहे. त्यामुळे ते इतके दिवस कार्यरत राहू शकले.

०४. मॉम म्हणजे मंगळयान ५ नोव्हेंबर २०१३ रोजी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने सोडले होते. त्यासाठी पीएसएलव्ही सी २५ हा प्रक्षेपकही वापरण्यात आला होता. खोल अंतराळातील ३०० दिवसांच्या प्रवासानंतर हे यान २४ सप्टेंबर २०१४ रोजी मंगळाच्या कक्षेत यशस्वीरीत्या स्थापित करण्यात आले होते. 

०५. मंगळयानाने पहिल्या दोन वर्षांत मिळवलेली माहिती जाहीर करण्यात आली असून भारताच्या या मोहिमेला अमेरिकेच्या अवकाश संस्थेचा स्पेस पायोनियर पुरस्कार तसेच नि:शस्त्रीकरण व विकासासाठीचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार मिळाला होता. 

०६. यानाने मंगळाच्या उत्तर ध्रुवावरील संप्लवन प्रक्रियेवर प्रकाश टाकला असून तेथील कार्बन डायॉक्साइड व पाण्याचे बर्फ यांचे थर उन्हाळ्यात नष्ट होत असतात. त्याबाबतच्या माहितीत मॉमच्या निरीक्षणांनी भर पडली आहे.



सानिया मिर्जाला विजेतेपद
०१. भारताची सानिया मिर्झा व चेक प्रजासत्ताकच्या बाबरेरा स्ट्रायकोव्हा या जोडीने टोरे पॅन पॅसिफिक टेनिस स्पध्रेत महिला दुहेरीत जेतेपदाला गवसणी घातली. सानिया-बाबरेराने अंतिम लढतीत चेंग लिअँग व झाओक्युअ‍ॅन यांग या चिनी जोडीचा ६-१, ६-१ असा सहज पराभव केला.

०२. सानिया-बाबरेराची एकत्र खेळण्याची ही तिसरी वेळ आहे. गेल्या महिन्यात सानिया-बाबरेरा जोडीने सिनसिनाटी खुल्या स्पध्रेचे जेतेपद पटकावले होते. या स्पर्धेत सानियाने तिची माजी जोडीदार मार्टिना हिंगीस व कोको व्हँडेवेगे जोडीचा ७-५, ६-४ असा पराभव केला होता.

०३. मागील चार वर्षांतील सानियाचे हे तिसरे जपान खुल्या स्पध्रेचे जेतेपद आहे. याआधी तिने कारा ब्लॅकसह २०१३ व २०१४ मध्ये येथे अजिंक्यपद पटकावले होते. गतवर्षी सानियाने या स्पर्धेतून माघार घेतली होती

०४. सानियाने या वर्षांत आत्तापर्यंत आठ डब्लूटीए जेतेपदे पटकावली आहेत. त्यामध्ये हिंगीससह जिंकलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्पध्रेच्या जेतेपदाचाही समावेश आहे. तसेच तिने ब्रिस्बेन, सिडनी, सेंट पिटर्सबर्ग, इटालियन आणि कॉनेक्टिकट खुल्या स्पध्रेतही बाजी मारली. सानियाने कारकिर्दीत एकूण ४० दुहेरी गटातील जेतेपदे जिंकली आहेत.



स्क्वाशपटू वेलवन सेंथीकुमारला अजिंक्यपद
०१. भारताचा युवा स्क्वॉशपटू वेलवन सेंथीकुमारने क्वालालम्पूर येथे सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ वैयक्तिक स्क्वॉश अजिंक्यपद स्पध्रेत १९-वर्षांखालील मुलांच्या गटात अजिंक्यपद पटकावले. अंतिम लढतीत वेलवनने ०-२ अशा पिछाडीवरुन दमदार पुनरागमन करताना जॉर्डनच्या मोहम्मद अल-सराजवर १२-१४, ९-११, ११-६, ११-८, ११-७ असा धमाकेदार विजय मिळवला.

०२. चेन्नईचा हा खेळाडू भारतीय स्क्वॉश अकादमीत (आयएसए) सराव करत असून आशियाई स्पध्रेत अजिंक्यपद पटकावणारा रवी दीक्षित (२०१०) यांच्यानंतर दुसरा खेळाडू आहे.



दिल्लीत डॉक्टरांचे निवृत्तीवय ६५ वर्षे
०१. दिल्ली सरकारने शहरातील डॉक्टरांच्या सेवानिवृत्तीचे वय ६२ वरून ६५ केले आहे. नायब राज्यपाल नजीब जंग यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

०२. आरोग्य विभागाने याबाबतचा प्रस्ताव नुकताच राज्यपालांकडे दिला होता. राजधानी दिल्लीत सरकारची ३६ रुग्णालये आहेत.

०३. गेल्या वर्षी मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी डॉक्टरांचे निवृत्तीचे वय ६५ वर्षे करण्याची घोषणा केली होती.