शैक्षणिक व संशोधन परिषद आता विद्या प्राधिकरण
०१. शिक्षणक्षेत्रात महाराष्ट्रास देशपातळीवर प्रथम तीन क्रमांकात आणण्याच्या हेतूने राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेची पुनर्रचना करण्यात आली असून आता ती विद्या प्राधिकरण नावाने ओळखली जाईल. 


०२. प्राधिकरण शैक्षणिक सुधारणेचे व्यापक कार्यक्रम हाती घेईल.शालेय शिक्षण विभागाच्या (डाएट) अंतर्गत आता विद्या प्राधिकरण कार्यरत होईल. 


०३. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमात डिसेंबर २०१७ पर्यंत राज्यातील १०० टक्के शाळा प्रगत करण्याचे उद्दिष्टय़ ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर १७ ऑक्टोबरच्या निर्णयाद्वारे गठित विद्या प्राधिकरण ही संस्था हे उद्दिष्टय़ साध्य करण्यासाठी कार्यरत होईल. 

०४. वीस सदस्यांच्या या प्राधिकरणात अधिकाऱ्यांसह शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश राहील. शिवाय, प्रादेशिक पातळीवर सहा प्राधिकरणे अस्तित्वात येतील. 

०५. प्राधिकरणाद्वारे अभ्यासक्रम व पाठय़क्रम विकसित करणे, शैक्षणिक साहित्य व शिक्षकांचे विकसन, मूल्यमापन प्रक्रिया, विकसित व संगणक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संशोधन करण्याचे ठरले आहे.

०६. उर्दूसाठी अतिरिक्त दोन पदे राहतील. या प्रक्रियेत शिक्षक व खात्याबाहेरील तज्ज्ञांना प्रामुख्याने सहभागी करून घेण्यावर भर देण्यात आला आहे.



धनोत्रयोदशीला पहिला ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिन’
०१. दिवाळीतील ‘धनोत्रयोदशी’ हा दिवस दरवर्षी ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय अखेर केंद्रीय आयुष मंत्रालयाने घेतला असून पहिला आयुर्वेद दिन २८ ऑक्टोबरला मधुमेहाचे जनजागरण करून साजरा होणार आहे.

०२. गत १५ ते २० वर्षांंपासून याविषयी आयुर्वेद क्षेत्रातील जाणकारांकडून मागणी होत होती. इतर शाखांचा ‘डॉक्टर डे’ मान्यताप्राप्त आहे, पण भारतीय उपचार पध्दती असलेल्या आयुर्वेदाचा कुठलाही दिनविशेष नव्हता. 

०३. या मागणीचा पाठपुरावा केल्यानंतर आयुषचा स्वतंत्र प्रभाग असणारे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी कोणत्या दिवशी आयुर्वेद दिन साजरा करावा म्हणून मते जाणून घेतली. बहुसंख्य आयुर्वेदप्रेमींनी दिवाळीतील ‘धनोत्रयोदशी’ या दिवसाचाच आग्रह धरल्यावर तो मंजूर करण्यात आला.

०४. आयुष मंत्रालयाचे सल्लागार डॉ.मनोज नेसरी (आयुर्वेद) यांनी यासंदर्भात परिपत्रक जाहीर केले आहे. केंद्र शासनाने दरवर्षी ‘धनोत्रयोदशी’ला आयुर्वेद दिन साजरा करण्याचे निश्चित केले असून यंदा प्रमुख कार्यक्रम २८ ऑक्टोबरला नवी दिल्लीत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

०५. यंदाचा पहिला राष्ट्रीय आयुर्वेद दिन हा ‘मधुमेह नियंत्रणासाठी आयुर्वेद’ या संकल्पनेवर साजरा केला जाणार आहे. सर्व राज्यातील आयुष संचालनालय, आरोग्य विभाग, आयुर्वेद महाविद्यालये, आयुर्वेद फोर्मसी कंपन्या, तसेच शुभचिंतक विविध कार्यक्रमांचे आयोजन करतील.



अमेरिकी लेखक पॉल बेट्टी यांना ‘बुकर’ पुरस्कार
०१. अमेरिकेतील वर्ग व वंशभेद व्यवस्थेवर टीका करणाऱ्या पॉल बेट्टी यांच्या ‘द सेलआउट’ या कादंबरीस बुकर साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. अमेरिकी व्यक्तीला बुकर पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

०२. लंडनच्या गिल्डहॉल येथे झालेल्या कार्यक्रमात लेखक बेट्टी यांना ५० हजार पौंडांचा पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या लेखनाची तुलना मार्क ट्वेन व जोनाथन स्विफ्ट यांच्याशी केली आहे.

०३. बेट्टी यांनी ‘स्लम्बरलँड’, ‘टफ’ व ‘द व्हाइट बॉय स्कफल’ या तीन कादंबऱ्या लिहिल्या आहेत.सलग तिसऱ्या वर्षी कादंबरी प्रवर्गातील स्पर्धा सर्व देशांच्या लेखकांसाठी खुली होती. या पुरस्कारासाठी दोन ब्रिटिश, दोन अमेरिकी, एक कॅनेडियन व एक ब्रिटिश कॅनेडियन लेखक स्पर्धेत होते.

०४. बेटी यांना डचेस ऑफ कॉर्नवेल कॅमिला पार्कर बॉवेल्स यांच्या हस्ते बुकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.



यंदा अर्थसंकल्प महिनाभर आधीच सादर होणार
०१. योजनांची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी, नव्या प्रकल्पांची कामे लवकर सुरू व्हावी, यासाठी सरकारने अर्थसंकल्प महिनाभर आधीच सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. 

०२. भारताचे आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च असे असते. जगातील अनेक देशांमध्ये आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर असे असते.

०३. दरवर्षी अर्थसंकल्प फेब्रुवारीत सादर होतो. त्यानंतर तो संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर केला जातो. मात्र यंदा जानेवारी महिन्यामध्येच अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

०४. त्यामुळे सरकारला वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीसाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. १ एप्रिलपासून वस्तू आणि सेवा कर अंमलात आणला जाणार आहे.

०५. यंदापासून रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प सादर केला जाणार नाही. रेल्वेशी संबंधित सर्व गोष्टींचा समावेश केंद्रीय अर्थसंकल्पात केला जाईल.

०६. याआधी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी २००१ मध्ये अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ बदलली होती. आधी अर्थसंकल्प संध्याकाळी ५ वाजता सादर केला जायचा. मात्र ही ब्रिटिशकालीन प्रथा वाजपेयींनी मोडीत काढली आणि अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता सादर करण्यात येऊ लागला.



खतावरील अनुदानाचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात
०१. शेतीसाठी खतावर देण्यात येणारे अनुदान आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. केंद्र सरकारकडून १६ जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असलेल्या या योजनेच्या यशानंतर ही योजना पूर्ण देशभरात राबविण्यात येणार आहे.

०२. सरकार थेट हस्तांतरण योजनेवर (डीबीटी) काम करत आहे. त्यामुळे देशभरातील सर्व शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे थेट त्यांच्या खात्यावर जमा होतील.

०३. खते क्षेत्रासाठी थेट हस्तांतरण योजना राबविण्याची सरकारची योजना आहे. यामध्ये प्रामुख्याने युरियाचा समावेश आहे. खतांसाठी केंद्र सरकारकडून जवळपास वार्षिक ७५ हजार कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येते.



भारत – न्यूझीलंड द्विपक्षीय संबंध बळकट
०१. भारताला अणुपुरवठादार देशांच्या गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळण्यासाठी न्यूझीलंडची भूमिका सकारात्मक असल्याचे न्यूझीलंडचे  पंतप्रधान जॉन की यांनी बुधवारी स्पष्ट केले. यामुळे भारताची एनएसजी सदस्यत्वाची दावेदारी अधिक बळकट झाली आहे. 

०२. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जॉन की यांच्यात बुधवारी चर्चा झाली. त्यात व्यापार, संरक्षण आणि सुरक्षा या क्षेत्रांत द्विपक्षीय संबंध बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला.

०३. दुहेरी करआकारणी टाळण्यासंबंधीच्या करारासोबतच उभय देशांनी तीन करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. परस्पर सहकार्याद्वारे दहशतवादाविरोधात लढण्याचा निर्धारही मोदी आणि जॉन की यांनी या वेळी केला.



लैंगिक समानतेच्याबाबतीत जगात भारत ८७ वा 
०१. लैंगिक समानतेबाबत नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक आकडेवारीनुसार १४४ देशांच्या यादीत भारत ८७ व्या क्रमांकावर असल्याचे निदर्शनास आले आहे. 

०२. विशेष म्हणजे स्त्री-पुरूषांच्या शिक्षण आणि वेतनातील फरक बऱ्याच अंशी मिटविण्यात भारताला यश आल्यामुळे यंदा या क्रमवारीत भारताचे स्थान २१ क्रमाकांनी वधारले आहे. 

०३. या क्रमवारीत बांगलादेशासह दक्षिण आशियातील अनेक देशांनी भारताला मागे टाकले आहे. 

०४. जागतिक आर्थिक मंचाने (डब्ल्यूईएफ) केलेल्या या सर्वेक्षणात भारताचा शेजारी पाकिस्तान मात्र शेवटहून दुसऱ्या स्थानावर असून येमेन अखेरच्या स्थानावर आहे.

०५. जागतिक जेंडर गॅप रिपोर्टमध्ये भारताने प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील शिक्षणाच्या नोंदणीतील मुले आणि मुलींच्या संख्येतील तफावत जवळपास मिटवली आहे. 

०६. या क्रमवारीत आईसलँड पहिल्या क्रमांकावर असून त्यापाठोपाठ फिनलँड, नॉर्वे, स्वीडन या देशांचा क्रमांक आहे. जागतिक महासत्ता असणारी अमेरिका या यादीत ४५ व्या स्थानी आहे.



विषारी प्रथिनांना रोखल्यास अल्झायमरला प्रतिबंध
०१. मेंदूत विषारी प्रथिन रेणूंची साठवणूक करण्यास प्रतिबंध करणाऱ्या गोळ्या घेतल्याने अल्झायमर व इतर मेंदूरोग टाळता येतात, असे नवीन अभ्यासात दिसून आले. 

०२. टेक्सास येथील बेयलर कॉलेज ऑफ मेडिसीन व जॉन हॉपकिन्स स्कूल ऑफ मेडिसिनच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की अल्झायमरची लक्षणे दिसण्यापूर्वी त्याचा मुकाबला करता येतो व त्यात तीन पद्धतीच्या उपाययोजना करता येतात. 

०३. ताऊ प्रथिनांची साठवणूक झाल्याने अल्झायमरची शक्यता वाढते.ताऊ प्रथिनांची साठवणूक कमी केली तर अनेक बाबी साध्य होतात. नुआक-१ या एन्झाइमची क्रियाशीलता रोखल्यास ताऊ प्रथिन साठण्याचे प्रमाण कमी होते.न्यूरॉन जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.



प्रथमा माईणकर यांना ओपीपीआय महिला वैज्ञानिक पुरस्कार 
०१. सीएसआयआरच्या हैदराबाद येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या वैज्ञानिक प्रथमा माईणकर यांना अलीकडेच ओपीपीआय महिला वैज्ञानिक पुरस्कार मिळाला आहे. 

०२. त्यांच्या संशोधनाने औषधनिर्मितीत महत्त्वाची भर टाकली आहे, त्यामुळे त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्या मूळ तेलंगणातील आहेत. त्यांना सीएनएस म्हणजे चेतासंस्थेशी संबंधित रोग तसेच कर्करोग व क्षयरोगावर संशोधनासाठी हा पुरस्कार मिळाला आहे.

०३. १९९२ मध्ये त्या सीएसआयआरच्या संस्थेत वैज्ञानिक म्हणून काम करू लागल्या. वैद्यकीय रसायनशास्त्र, औषध संशोधन या शाखांत त्यांचे संशोधन आहे.

०४. एड्स, इबोला व हेपॅटिटिस बी या रोगांवर त्यांनी संशोधन केले असून त्यात त्यांनी असे दाखवून दिले की, सापाचे विष जर होमिओपॅथी औषधाच्या रूपात वापरले तर त्याचा विषाणू रोगांवर चांगला उपयोग होतो.