जगातील संकटग्रस्त दुर्मीळ पक्ष्यांतील ‘मोठी लालसरी’ हतनूर परिसरात
जळगाव जिल्ह्य़ातील हतनूर (मुक्ताईसागर) धरणाच्या जलाशयात ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झव्‍‌र्हेशन नेटवर्क’ (आययुसीएन) द्वारा घोषित जगातील संकटग्रस्त दुर्मीळ पक्ष्यांमधील ‘रेड क्रेस्टेड पोचार्ड’ (अल्बीनो प्रकारातील स्थानिक भाषेतील ‘मोठी लालसरी’) हा स्थलांतरीत पाणपक्षी आढळून आला आहे. 

या पक्षाची भारतातील ही पहिलीच नोंद ठरली आहे. आंतरराष्ट्रीय विज्ञान पत्रिकेने याची दखल घेतली असून त्यासंदर्भातील माहिती मार्चच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 


केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातंर्गत कार्यरत ‘इन्व्हायरमेंटल इन्फार्मेशन सिस्टिम’ (ईएनव्हीआयएस) ने भुसावळ तालुक्यातील वरणगांव येथील चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन यांच्या या संशोधनावर शिक्कामोर्तब केले आहे.

डिसेंबर २०१४ मध्ये वेटलॅण्ड इंटरनॅशनल या स्वित्र्झलंडमधील पर्यावरण संस्थेकडून देशभरात पक्षीगणना झाली. त्यावेळी वरणगावच्या चातक निसर्ग संवर्धन संस्थेने या गणनेत सहभाग घेत मुक्ताईसागर (हतनूर) धरणाच्या जलाशय परिसरात गणना केली. 
यावेळी पक्षीमित्र शिवाजी जवरे (बुलढाणा) यांना एक पक्षी दिसला असता तज्ज्ञांची मते जाणून घेतलीम् असता हा पक्षी मोठी लालसरीच असल्याचे निष्पन्न झाले. 

महाजन यांनी याबाबतचा शोधनिबंध तयार करुन तो ‘न्यूजलेटर ऑफ बर्ड वॉचर’ या आंतरराष्ट्रीय विज्ञान पत्रिकेला पाठवला असता तो मार्च २०१७ मध्ये प्रसिद्ध झाला. यापूर्वी अशा पक्षाची भारतात कोठेही नोंद झालेली नसल्याचे तसेच यापूर्वी इंग्लडमध्ये नोंद झालेली असल्याची माहिती देण्यात आली



हॉटेलमधील सेवाशुल्क लवकरच होणार बंद
हॉटेलमधील बिलांवरील सेवाशुल्क वसुलीला कायदेशीर आधार नाही, असे सांगत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी सेवाशुल्क वसुली बेकायदा ठरवली आहे. लवकरच यासंदर्भात सुधारित परिपत्रक काढले जाणार आहे. 

जानेवारीत केंद्र सरकारने सेवाशुल्क ऐच्छिक असल्याचे परिपत्रक काढले होते. तरीही हॉटेलमधील कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये खटके उडत होते. 

या निर्णयामुळे मेनू कार्डवरील सेवाशुल्काचा उल्लेख हॉटेलमालकांना काढून टाकावा लागेल. राज्य सरकारला या आदेशाची अंमलबजावणी करावी लागणार असून, महिनाअखेर ही परिपत्रकाची प्रक्रिया पूर्ण होईल.

काचेचे छत असलेल्या रेल्वे डब्यांचे सुरेश प्रभूंच्या हस्ते लोकार्पण



काचेचे छत असलेल्या रेल्वेचे लोकार्पण
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रविवारी विस्टाडोम कोच (काचेचे छत असणारे डबे) असलेल्या रेल्वेचे लोकार्पण केले. विस्टाडोम कोच असलेली रेल्वे विशाखापट्टणम ते अरकू दरम्यान धावणार आहे. काचेच्या छतांसह एलईडी दिवे, फिरती आसने आणि जीपीएस आधारित सूचना यंत्रणा ही नव्या रेल्वेची वैशिष्ट्ये आहेत.

नव्या रेल्वेचे सर्व डबे वातानुकूलित असतील आणि या डब्यांचे छत काचेचे असल्याने प्रवाशांना अरकूच्या दऱ्यांमधील निसर्ग सौंदर्य पाहता येणार आहे.

अपंगांचा विचार करुन डब्यांची रचना करण्यात आली असून रेल्वेच्या डब्यांना सरकणारे स्वयंचलित दरवाजे असतील.

चार विस्टाडोम कोच उभारण्यासाठी रेल्वेला ४ कोटींचा खर्च आला आहे. सध्या या डब्यांची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी सुरु आहे. यातील दोन डबे विशाखापट्टणम-अरकू मार्गावर धावणार आहेत. तर इतर दोन डबे जम्मू-काश्मीरमध्ये पाठवले जाणार आहेत.



यंदाचा ‘सिंगापूर ओपन’ करंडक भारताकडेच
भारतीय बॅडमिंटनमधील ‘स्टार’ खेळाडू स्पर्धेबाहेर पडलेले असताना नवोदित साई प्रणित आणि श्रीकांत किदम्बी यांनी सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. यामुळे यंदा सिंगापूर ओपनमध्ये विजेतेपदासाठी दोन्ही भारतीय खेळाडूच लढणार आहेत. 

साई प्रणितने त्याच्या लौकिकास साजेसा खेळ करत कोरियाच्या ली डॉंग क्‍युनवर सहज मात केली. साई प्रणितने ली डॉंग क्‍युनवर २१-६, २१-८ असा विजय मिळविला. एखाद्या सुपर सीरिज मालिकेची अंतिम फेरी गाठण्याची ही साईची पहिलीच वेळ आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये झालेल्या सय्यद मोदी ग्रां.प्री. ची अंतिम फेरी साईने गाठली होती. 

दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताच्या श्रीकांत किदम्बीने इंडोनेशियाच्या अँथनी सिनिसुका गिंटिंग याच्यावर मात केली. श्रीकांतने २१-१३, २१-१४ असा विजय मिळविला.

सिंगापूर ओपनमध्ये अंतिम फेरी गाठलेले दोन्ही खेळाडू एकाच देशाचे असण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी चीन, इंडोनेशिया आणि डेन्मार्कच्या खेळाडूंनी अशी कामगिरी केली होती. 



जगातील वयोवृद्ध व्यक्तीचे निधन
जगातील सर्वात वयोवृद्ध व बहुदा एकोणिसाव्या शतकात जन्म झालेल्या शेवटच्या व्यक्तीचे वयाच्या ११७ व्या वर्षी निधन झाले. 

टलीतील एम्मा मार्टिना ल्युईगिया मोरानो या महिलेचा जन्म २९ नोव्हेंबर १८९९ रोजी झाला होता. त्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सप्रमाणे सर्वात वयोवृद्ध असलेल्या व्यक्ती व महिला होत्या. 

मोरानो यांचे शनिवारी निधन झाले असून गेल्या वर्षी मे पर्यंत त्यांचे नाव गिनीज बुकात सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून होते. वय संशोधन गटाने केलेल्या संशोधनानंतर त्यांचे नाव गिनीज बुकमध्ये समाविष्ट केले होते. 

मोरानो या सर्वात जास्त जगलेल्या जीन लुईस कॅलमेंट यांच्यापेक्षा पाच वर्षांनी तरुण होत्या. कॅलमेंट हे १२२ वर्षे १६४ दिवस जगले. 

वयोवृद्धता संशोधन गटाने केलेल्या यादीनुसार १९०० मध्ये जमेकात जन्मलेल्या व्हायोलेट ब्राऊन या आता जिवंत व्यक्तीत सर्वात वयोवृद्ध आहेत. त्यांचे वय ११३ वर्षे ३७ दिवस आहे.