महाराष्ट्रातील १२ अधिकारी झाले IAS
महाराष्ट्र राज्याच्या सेवेत कार्यरत असलेल्या १२ अधिकाऱ्यांची ‘भारतीय प्रशासकीय सेवे’त (आयएएस) पदोन्नती झाली आहे. केंद्र सरकारच्या ‘पर्सोनल ऍण्ड ट्रेनिंग’ विभागाने नुकताच आदेश जारी करून या नियुक्‍त्या जाहीर केल्या आहेत.


महाराष्ट्र प्रशासकीय सेवेत ठराविक वर्षे नोकरी केलेल्या व उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकाऱ्यांना आयएएस पदावर पदोन्नती दिली जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या सेवेतील पात्र अधिकाऱ्यांच्या आयएएस पदोन्नतींना कमालीचा विलंब झाला आहे. 

पदोन्नती झाल्याने या अधिकाऱ्यांची आता राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), सहआयुक्त, आयुक्त अशा आयएएस अधिकाऱ्यांसाठी असलेल्या पदांवर नियुक्ती होईल.



GST विधेयकावर उमटली राष्ट्रपतींची मोहर
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नुकतीच वस्तू आणि सेवा कर विधेयकांना (GST) मंजुरी दिली आहे. लोकसभा आणि राज्यसभेने मंजुरी दिल्यानंतर आज (गुरुवार) राष्ट्रपतींनी GST विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. 

GST विधेयकाला २९ मार्च रोजी लोकसभेत तर ६ एप्रिलला मंजुरी देण्यात आली होती. राष्ट्रपतींनी ‘GST’च्या समन्वित, केंद्रीय, राज्य व केंद्रशासित प्रदेशांसाठीच्या चार वित्त विधेयकांना मंजुरी दिली आहे.

राष्ट्रपतींनी GST विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर आता १ जुलैपासून देशभरात GST लागू करण्याचा केंद्र सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे.

GSTमुळे देशभरात एकसमान करप्रणाली तयार होईल आणि त्यामुळे व्यवहारांमध्ये पारदर्शकता येणार असल्याचा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे. वस्तु व सेवा करामुळे (GST) करचुकवेगिरी कठीण होण्याबरोबरच वस्तु व सेवा स्वस्त होतील.


सध्या भारतातील करव्यवस्था गुंतागुंतीची आहे. मात्र आता GSTमुळे जटिल करव्यवस्था सोपी व सुटसुटीत होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ‘GST’ कायदा लागू झाल्यावर केंद्रीय व राज्य अबकारी कर, सेवाकर, ‘व्हॅट’ व इतर करांच्या जंजाळातून जनतेची मुक्तता होणार आहे.



महिला सुरक्षिततेसाठी हरियानामध्ये ‘ऑपरेशन दुर्गा’
महिलांच्या सुरक्षिततेसाठी हरियाना सरकारने महिलांची छेडछाड करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘ऑपरेशन दुर्गा’ ही मोहिम सुरू केली आहे. या मोहिमे अंतर्गत पोलिसांनी आतापर्यंत ७२ जणांना ताब्यात घेतले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिलांची छेडछाड करणाऱ्या रोमिओंविरूद्ध कारवाईची मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेतून प्रेरित होऊन इतर काही राज्यांतही महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. 


हरियाणामध्ये ‘ऑपरेशन दुर्गा’ मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमे अंतर्गत पोलिसांनी २४ भरारी पथकांची स्थापना केली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात महिलांची छेडछाड करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.



भारतात ‘बीबीसी’वर अभयारण्यात पाच वर्षांची बंदी
काझीरंगा अभयारण्याची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनवर (बीबीसी) भारताकडून १० एप्रिल २०१७ पासून पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारने घातलेल्या या बंदीमुळे आता बीबीसीला पुढील पाच वर्षे भारतामधील राष्ट्रीय उद्यानं आणि अभयारण्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण करता येणार नाही. 

काही दिवसांपूर्वी बीबीसीकडून प्रदर्शित करण्यात आलेल्या एका माहितीपटामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या प्रतिष्ठेची न भरुन येणारी हानी झाल्याचे सरकारने म्हटले आहे. 


फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने ( एनटीसीए) काझीरंगा अभयारण्यातील परिस्थितीचे चुकीचे पद्धतीने वार्तांकन केल्याप्रकरणी बीबीसीचे दक्षिण आशियातील प्रतिनिधी जस्टीन रॉवलाट यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच बीबीसीवर बंदी टाकण्याची शिफारसही केली होती. 

बीबीसीकडून तयार करण्यात आलेल्या या माहितीपटात काझीरंगा अभयारण्यातील शिकार रोखण्यासासंदर्भातील धोरणाविषयी भाष्य करण्यात आले होते. 

२७ फेब्रुवारीला एनटीसीएने आसाममधील सर्व व्याघ्र प्रकल्पांच्या प्रमुखांना बीबीसीला कोणत्याही प्रकारच्या चित्रीकरणासाठी परवानगी न देण्याचे आदेशही दिले होते. केंद्रीय वनमंत्रालयाने एनटीसीएचा हा निर्णय उचलून धरला असून त्यानुसार १० एप्रिलपासून बीबीसीला देशभरातील कोणत्याही राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्यांमध्ये चित्रीकरण करता येणार नाही.



साक्षी मलिक, दीपा कर्माकरला पद्मश्री प्रदान
प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्कारांचे आज (गुरुवार) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. ऑलिंपिक पदक विजेती साक्षी मलिक आणि जिम्नॅस्ट दीपा कर्माकर यांच्यासह ७५ जणांना पद्मश्री देण्यात आला.

राष्ट्रपती भवनात आज हा पुरस्कार सोहळा पार पडला. जानेवारीमध्ये या पुरस्कार विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली होती. 
पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री असे ८९ जणांना पुरस्कार घोषित करण्यात आले होते. यात १९ महिला आणि ७०पुरुषांचा समावेश होता.



हुलकावणी देणारा नेपच्यूनसारखा ग्रह सापडला
नेपच्यूनच्या आकाराचा हरवलेला ग्रह खगोलशास्त्रज्ञांना पृथ्वीपासून तीन हजार प्रकाशवर्षे अंतरावर सापडला आहे. 

नवीन ग्रहाचे नाव केप्लर १५० एफ असे असून त्याच्याकडे गेली अनेक वर्षे कुणाचे लक्ष गेले नव्हते, असे येल विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले.

संगणक अलगॉरिथमच्या मदतीने अनेक बाह्य़ग्रहांचा शोध लागला असून त्यात या ग्रहाचा समावेश आहे. 

काहीवेळा संगणकात काही गोष्टी दृष्टोत्पत्तीस येत नसत, त्यातून केप्लर १५० या ग्रहप्रणालीचा शोध लागला. हा ग्रह त्याच्या ताऱ्यापासून सूर्यापासून पृथ्वीचे जेवढे अंतर आहे त्यापेक्षा दूर आहे.

केप्लर १५० एफ या ग्रहाला त्याच्या ताऱ्याभोवती फिरण्यास ६३७ दिवस लागतात. पाच किंवा आणखी ग्रहांच्या प्रणालीत एवढी लांब कक्षा कुणाचीच नाही. केप्लर मोहिमेत चार ग्रह सापडले असून त्यात केप्लर १५० बी, सी,डी व इ यांचा समावेश आहे. त्यांच्या कक्षा मात्र ताऱ्याच्या जवळ आहेत.