‘जीएसएलव्ही एमके-३’ चे यशस्वी प्रक्षेपणभारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) तयार केलेल्या जीएसएलव्ही एमके-३ या आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या प्रक्षेपकाचे (रॉकेट) श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण झाले. 


जीएसएलव्ही एमके-३ हा पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा उपग्रह प्रक्षेपक असून, त्यात भारतीय बनावटीच्या क्रायोजेनिक या शक्तिशाली इंजिनाचा वापर करण्यात आला आहे. 

सतीश धवन केंद्राच्या दुसऱ्या तळावरून सायंकाळी ५ वाजून २८ मिनिटांनी हा प्रक्षेपक अवकाशात झेपावला. या प्रक्षेपकाद्वारे ३.१३ टन वजनाचा ‘जी सॅट-१९’ हा दळणवळण उपग्रह अवकाशात पाठविण्यात आला असून, प्रक्षेपनानंतर १६ मिनिटांनी तो अवकाशात सोडण्यात आला. 

या यशस्वी प्रक्षेपणामुळे चार टन वजनाचे उपग्रह स्वबळावर अवकाशात पाठविण्याची भारताची क्षमता सिद्ध झाली असून, यापूर्वी २.३ टनापेक्षा अधिक वजनाचे उपग्रह अवकाशात पाठविण्यासाठी भारताला इतर देशांची मदत घ्यावी लागत होती.



जीएसटी दर जाहीर
देशातील करगुंता सोडवत सुटसुटीत करआकारणीसाठी येत्या १ जुलैपासून लागू होणाऱ्या वस्तू व सेवा करांतर्गत (जीएसटी) विविध वस्तूंचे कर जीएसटी परिषदेने शनिवारी निश्चित केले. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी परिषदेची १५ वी बैठक शनिवारी झाली.

त्यानुसार, सोन्यावर तीन टक्के, ५०० रुपयांखालील पादत्राणांवर पाच टक्के आणि बिस्किटांवर १८ टक्के कर लागू होणार आहे. तयार कपडय़ांवर १२ टक्के, सौरऊर्जा पॅनेलवर ५ टक्के तर कच्च्या हिऱ्यावर ०.२५ टक्के जीएसटी आकारला जाईल. 

तेंदूपत्ता आणि विडीवर अनुक्रमे १८ आणि २८ टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे. जीएसटी परिषदेने गेल्या महिन्यात १२०० वस्तू आणि ५०० सेवा ५, १२, १८ आणि २८ टक्क्यांच्या कररचनेत बसवल्या आहेत.

परिषदेची ११ जूनला पुन्हा बैठक होणार आहे. त्यात जीएसटी लागू करण्यासाठी सर्व सज्जतेचा आढावा घेण्यात येईल.



TRAI तर्फे ‘माय कॉल’ अॅप लाँच
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) माय कॉल (mycall aap) हा नवा अॅप सुरू केला आहे. या अॅपवर यूजर्स आपल्या मोबाईल फोन कॉलला क्वालिटी रेटिंग देऊ शकतील. तसेच संबंधित यूजर्स ही माहिती दूरसंचार नियामक प्राधिकरणालाही देऊ शकतात.

हा अॅप डाऊनलोड केल्यास प्रत्येक कॉलनंतर संबंधिताला पॉप-अप नोटिफिकेशन येईल. त्यात कॉलच्या गुणवत्तेबाबत आलेला अनुभव आणि त्याची माहिती देण्यासंबंधी विनंती करण्यात येईल. 

यात यूजर्सला आपले रेटिंग स्टार्सही देता येणार आहेत. रेटिंगसह यूजर्सना आवाज, आवाजातील अडथळा आणि कॉल ड्रॉपसारख्या समस्यांविषयीही अधिकची माहिती ट्रायला देता येणार आहे.



साईप्रणितने जिंकली थायलंड ओपन ग्रांप्री स्पर्धा
भारताच्या बी. साईप्रणितने चुरशीच्या सामन्यात इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीला तीन सेटमध्ये हरवत थायलंड ओपन ग्रां प्री गोल्ड करंडक बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले. १ तास ११ मिनिटे चाललेल्या या खेळात साईप्रणितने १७-२१, २१-१८, २१-१९ असा विजय मिळवला.  प्रणितचे हे पहिलेच ग्रांपी विजेतेपद आहे. 

थायलंड ओपनमध्ये मिळवलेल्या विजयानंतर साईप्रणितने २०१७ मधील घोडदौड कायम राखली आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या सिंगापूर सुपर सीरिजमध्ये साईप्रणितने किदंबी श्रीकांतला हरवून पहिले सुपर सीरिज विजेतेपद पटकावले होते.



रिअल माद्रिदने पटकाविले चँपियन्स लीगचे विजेतेपद
ख्रिस्तियानो रोनाल्डोने केलेल्या दोन गोलमुळे रिअल माद्रिदने युव्हेंट्सचा ४-१ असा पराभव करत चॅंपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. 

रिअल माद्रिदने गेल्या चार वर्षांत तिसऱ्यांदा विजेतेपद मिळविले असून, आतापर्यंतचे १२ वे विजेतेपद आहे.

इंग्लंडमधील कार्डीफच्या मैदानावर इटलीच्या युव्हेंट्‌स आणि स्पेनमधील रिअल  माद्रिद या दोन तुल्यबळ संघांमध्ये शनिवारी रात्री हा अंतिम सामना झाला. झिनेदिन झिदानच्या प्रशिक्षणासाठी रेयालने मिळविलेले हे विजेतेपद खास आहे. 

युव्हेंट्‌सने यापूर्वी दोनदा ही स्पर्धा जिंकली आहे, तर रिअल माद्रिदने बारा वेळा. या स्पर्धेत रिअलचे ५०३ गोल झाले आहेत, पाचशे गोलचा टप्पा गाठणारा पहिला संघ आहे.

रिअलकडून १९९० नंतर प्रथमच एक संघ सलग दोनदा विजेता होण्याची कामगिरी. यापूर्वी एसी मिलानकडून ही कामगिरी. 



चार आखाती देशांनी कतारशी संबंध तोडलेमुस्लिम ब्रदरहूड, अल कायदा, इस्लामिक स्टेटला (आयएस) पाठिंबा देणे आणि इराणशी संबंध असल्याबद्दल चार अरब देशांनी कतारशी राजनैतिक संबंध तोडले. या निर्णयामुळे आखातातील अरब देशांतील संबंध आणखी ताणले गेले आहेत.

बहारिन, इजिप्त, सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिरातने कतारशी संबंध तोडल्याची घोषणा करताना आम्ही आमचे राजनैतिक कर्मचारी माघारी बोलावत आहोत, असे सांगितले. 

एमिरेट्स या विमान कंपनीने कतारमधील विमान सेवा बंद करण्याचे ठरविले असून, त्याची अंमलबजावणी होणार आहे

कतार हा नैसर्गिक वायूने समृद्ध असून २०२२ मध्ये जागतिक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद त्याच्याकडे आहे. शिवाय अमेरिकेचा कातारमध्ये १० हजार सैनिकांचा महत्त्वाचा लष्करी तळही आहे. 



भारताच्या NSG सदस्यत्वाला चीनचा पुन्हा विरोध
आण्विक पुरवठादार संघाच्या भारताच्या सदस्यत्वाबाबत चीननं पुन्हा एकदा आक्षेप नोंदवला आहे. 

आण्विक पुरवठा संघ अर्थात NSG चं सदस्यत्व जसं भारताला हवं आहे तसंच ते पाकिस्तानलाही हवं आहे. मात्र आंतरराष्ट्रीय आण्विक करारावर भारतानं स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत. कारण भारताला यातल्या काही अटी मान्य नाहीत. 

NSG मध्ये 48 देशांचा सहभाग आहे. तर अण्वस्त्रप्रसार बंदी करारांवर NPT स्वाक्षऱ्या न केलेल्या देशांचाही एक गट आहे. ज्यामध्ये भारतही आहे. त्यामुळे भारताचे सदस्य जास्त असूनही भारताला या संघात सहभागी होण्याच्या अडचणी येणार आहेत.

पाकिस्तानच्या सदस्यत्वाबाबत चीननं उघडपणे पाठिंबा दर्शवलेला नाही. असं असलं तरीही NSG आणि NPT असे दोन वर्ग तयार करून चर्चा व्हावी अशी मागणी चीननं केली आहे. चीननं यासाठी सहा सदस्यीय समितीही तयार केली आहे. ही समिती भारत आणि पाकिस्तानच्या सदस्यत्त्वासंदर्भातला निर्णय घेईल, असंही ली यांनी स्पष्ट केलं आहे.