‘जीएसटी’ विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयक अर्थात जीएसटी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. देशात १ जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी होणार आहे.


केंद्रात जीएसटी विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यात शनिवारपासून तीन दिवसाचे विशेष अधिवेशन घेण्यात आले होते. सोमवारी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी जीएसटीसंदर्भातील विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले.


केंद्र सरकारने घटना दुरुस्तीने ‘जीएसटी’चे विधेयक मंजूर केले असल्याने प्रत्येक राज्याला हा कायदा मंजूर करणे बंधनकारक होते. 

महापालिकांना
जकात, एल.बी.टी.चे २०१६-१७ चे उत्पन्न गृहीत धरून नुकसान भरपाईची रक्कम ठरवणार. प्रत्येक वर्षी या रकमेवर ८ टक्के चक्रवाढ पद्धतीने वाढ दिली जाईल

राज्याचा ऊस खरेदी कर, केंद्रीय विक्रीकर, वाहनावरील प्रवेशकर, वस्तूवरील प्रवेशकर, बेटिंग कर, लॉटरी कर, वन उत्पन्न कर, तसेच जकात व एलबीटी हे कर रद्द होतील.



एवरेस्ट सर करणारा प्रथम भारतीय नौदल संरक्षण अधिकारी ठरले ब्रिझ शर्मा
ब्रिजमोहन शर्मा (ब्रिझ शर्मा) हे एवरेस्ट सर करणारा प्रथम भारतीय नौदल संरक्षण अधिकारी बनले आहेत. शर्मा हे यापूर्वी २०१६ साली अमेरिकेमधील ‘बॅडवॉटर’ शर्यतीत सर्वात वेगवान भारतीय ठरले होते.



NASA, ISRO मिळून NISAR उपग्रह विकसित करणार
नॅशनल एरोनॉटिक्स ऍण्ड स्पेस अॅडमिनिसट्रेशन (NASA) आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) यांनी US$ १.५ अब्ज खर्चाचे जगातील सर्वात महागडे अर्थ-इमेजिंग उपग्रह विकसित करणार आहे.

NASA-ISRO Synthetic Aperture Radar (NISAR) उपग्रह वर्ष २०२१ मध्ये पृथ्वीच्या कक्षेत पाठवले जाण्याची शक्यता आहे. हा उपग्रह भारताच्या GSLV द्वारे सोडण्यात येईल.

NISAR 2,200 किलोग्रॅम वजनी असणार आणि प्रगत रडार इमेजिंग तंत्रज्ञान वापरून पृथ्वीचे एक तपशीलवार दृश्य प्रदान करेल.
पृथ्वीच्या काही सर्वात जटिल प्रक्रियांचे निरीक्षण आणि मोजमाप करणार आहे.

NISAR मार्फत संकलित माहितीमुळे पृथ्वीच्या जमिनीची स्थिती उघड होणार आणि त्यामुळे शास्त्रज्ञांना ग्रहांच्या प्रक्रिया आणि हवामान बदल समजून घेता येईल आणि भविष्यातील संसाधन आणि धोके व्यवस्थापीत होण्यास मदत होईल.

या उपग्रहामध्ये NASA चे L-बॅन्ड (२४सेंटीमीटर तरंगलांबी) पोलरिमेट्रिक SAR आणि ISRO चे S-बॅन्ड (१२ सेंटीमीटर तरंगलांबी) पोलरिमेट्रिक SAR ही वैज्ञानिक उपकरणे प्रस्थापित करण्यात येतील. 
हा उपग्रह १२ दिवसांत संपूर्ण जगाची माहिती गोळा करू शकणार आहे.



WWE च्या रिंगणात जिंदर महालला मिळाली चॅम्पियनशीप
वर्ल्ड रेसलिंग एंटरटेन्मेंट’च्या (डब्ल्यूडब्ल्यूई) रिंगणात भारताने पराक्रम केला आहे. भारताचा खेळाडू जिंदर महाल याने डब्ल्यूडब्ल्यूईची चॅम्पियनशीप पटकावली आहे. ‘डब्ल्यूडब्ल्यूई’मध्ये अशी कामगिरी करणारा जिंदर महाल पहिला भारतीय ठरला. 

याआधी ‘ग्रेट खली’ने या क्षेत्रात भारताची ओळख निर्माण केली होती. खलीने थेट ‘वर्ल्ड हेवी वेट चॅम्पियनशीप’ला गवसणी घातली होती. पण त्याला आजवर डब्ल्यूडब्ल्यूच्या चॅम्पियनशीपचा बेल्ट जिंकता आला नाही.

‘डब्ल्यूडब्ल्यूई’च्या रिंगणात जिंदर महालची ‘दि महाराजा’ अशी ओळख आहे. 


जिंदर महालने तब्बल १३ वेळा चॅम्पियशीपचा बेल्ट जिंकलेल्या सुपरस्टार रँडी ऑर्टनचा पराभव केला. 



‘जेम्स बाँड’ स्टार सर रॉजर मूर यांचे निधन
माजी ‘जेम्स बॉंड’ स्टार सर रॉजर मूर यांचे कर्करोगाने स्विर्त्झलंड येथे निधन झाले. ते ८९वर्षांचे होते.मूर यांच्या कुटुंबियांनी ट्विटरवरून सर रॉजर मूर यांच्या निधनाची माहिती दिली. 

हॉलिवूडमध्ये जेम्स बाँड मालिकेतील सात चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली होती. यामुळे जेम्स बाँड म्हणून त्यांची ओळख झाली होती.



स्टायरोफोमइतकी घनता असलेल्या ग्रहाचा शोध
पृथ्वीपासून ३२० प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या मोठय़ा ग्रहाचा शोध वैज्ञानिकांनी लावला असून त्याची घनचा स्टायरोफोमइतकी आहे. स्टायरोफोम हे फुगवलेले पॉलिस्टायरिन असते व ते अन्नाचे कंटेनर तयार करण्यासाठी वापरले जाते. 

हा ग्रह फुगलेला असून त्याचा फायदा जीवसृष्टी असणाऱ्या ग्रहांचा अंदाज घेण्यासाठी करता येणार आहे, त्यासाठी तेथील वातावरणाच्या चाचण्या घ्याव्या लागतील. प्रखर ताऱ्यांभोवती फिरणारे ग्रह शोधण्यासाठी केइएलटी प्रकल्प राबवण्यात आला असून केइएलटी ११ बी या ग्रहाचा शोध यात महत्त्वाचा आहे. 

हा ग्रह फुगलेला असून त्याचे वस्तुमान गुरूच्या एक पंचमांश आहे पण तो ४० टक्के मोठा आहे. त्याचे वातावरण विस्तृत आहे.या ग्रहाचा मातृतारा चमकदार असून त्यामुळे या ग्रहाच्या वातावरणाचे मापन सहज शक्य आहे. 

इतर ग्रहांच्या वातावरणाच्या मापनासाठी हा ग्रह म्हणजे एक सराव प्रयोगशाळा ठरणार आहे. या ग्रहाचे नाव केइएलटी ११ बी असे असून तो ताऱ्याभोवतीच अगदी जवळच्या कक्षेतून फिरत आहे. या कक्षेत फिरण्यास त्याला पाच दिवस लागतात. 

केइएलटी ११ हा तारा अणुइंधन वापरत असून त्याचे रूपांतर लाल मोठय़ा ग्रहात होत आहे. त्यानंतर तो ग्रह ताऱ्याने वेढला जाईल व पुढील शेकडो दशलक्ष वर्षांत तो तग धरू शकणार नाही.

केइएलटी म्हणजे किलोडिग्री लिटल टेलिस्कोपच्या पाहणीत अ‍ॅरिझोना व दक्षिण आफ्रिका अशा दोन ठिकाणच्या दुर्बिणी वापरण्यात आल्या आहेत. या दुर्बिणी ५० लाख ताऱ्यांची प्रकाशमानता मोजू शकतात. 



‘एनएसजी’तील भारताच्या प्रवेशात चीनचा खोडा
अणू पुरवठादार गटात भारताच्या प्रवेशाबाबतच्या आमच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही असे चीनने म्हटले आहे. चीनच्या भूमिकेमुळे एनएसजीमध्ये प्रवेश करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा हादरा बसला आहे. पुढील महिन्यात स्वित्झर्लंडमधील बर्न येथे एनएसजीतील देशांचे अधिवेशन होणार आहे.

चीनने भारताला एनएसजी गटात प्रवेश मिळू नये यासाठी नेहमी विरोध दर्शवला आहे. भारत २००८ पासून एनएसजीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत आहे.  
एनएसजीमध्ये प्रवेश मिळाल्यास भारताला आण्विक सामग्रीच्या आयात-निर्यातीसाठी चांगली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होईल.

एनएसजीमध्ये सध्या ४८ देश आहेत. या गटामध्ये नवीन सदस्य सहभागी करून घेण्याचा निर्णय एकमतानेच घेण्यात येतो. भारताच्या प्रवेशासाठी अमेरिकेने पाठिंबा दिला असला चीनने विरोध दर्शवला होता. 

एनएसजीतील आणखी एक अट म्हणजे या गटात एनपीटी म्हणजेच अण्वस्त्रप्रसारबंदी करारावर स्वाक्षरी करणे बंधनकारक असते. पण भारताने अद्याप या करारावर स्वाक्षरी केलेली नाही. चीनने हाच मुद्दा पुढे करत भारताच्या प्रवेशास विरोध दर्शवला आहे.

भारताने एनएसजीसाठी अर्ज केल्यावर पाकिस्ताननेही या गटात प्रवेश मिळावा यासाठी अर्ज केला होता. यासाठी पाकला चीनने छुपा पाठिंबा दिल्याची चर्चाही होती.