उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे निधन 
धृपद गायकीची समृद्ध परंपरा पुढे नेणारे ख्यातनाम गायक उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. 


हिंदुस्थानी संगीतातील अस्सल भारतीय संगीताचा ज्ञात प्रवाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धृपद गायकीला समृद्ध करण्यात डागर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. डागर घराण्याच्या मागील १९ पिढयांकडून हा समृद्ध वारसा उस्ताद सईदुद्दीन यांच्याकडे आला होता. 



विजयदुर्ग होणार आंतरराष्ट्रीय बंदर
विजयदुर्गसह रामेश्‍वर आणि गिर्ये येथील किनारपट्टीवर केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्‍तपणे आंतरराष्ट्रीय बंदर विकसित होणार आहे. 

गोवा आणि मुंबई येथील आंतरराष्ट्रीय बंदरांची वाहतूक क्षमता संपली असल्याने पुढील काळात विजयदुर्ग बंदरातून वाहतूक सुरू होईल. 

त्यासाठी वैभववाडी-विजयदुर्ग रेल्वेमार्ग प्रस्तावित आहे. विजयदुर्ग बंदर विकासासाठी दीड हजार कोटींचा खर्च येईल.



कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एन. धरम सिंह यांचे निधन
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एन. धरम सिंह यांचे निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.

एन. धरम सिंह हे कर्नाटकचे १७ वे मुख्यमंत्री होते. मे २००४ ते फेब्रुवारी २००६ या काळात ते काँग्रेस-जनता दल (सेक्युलर) आघाडी सरकारचे अध्यक्ष होते. 

ते सात वेळा कर्नाटक विधानसभेवर आणि २००९ साली बिदर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते.



भारताने FIBA महिलांचा आशिया चषक जिंकला
बंगळुरू येथे आयोजित FIBA महिलांचा आशिया चषक २०१७ स्पर्धेच्या डिवीजन B गटाच्या अंतिम सामन्यात कझाकस्तानचा पराभव करत भारतीय बास्केटबॉल संघाने स्पर्धा जिंकली आहे.

डिवीजन A गटात जपानने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत विजेता ठरला आहे. 
‘सर्वाधिक मौल्यवान खेळाडू’ चा खिताब ऑस्ट्रेलियाच्या केल्सी ग्रिफीन हिला देण्यात आला आहे.

FIBA महिलांचा आशिया चषक ही FIBA आशिया आणि FIBA ओशिनिया महासंघातील राष्ट्रीय बास्केटबॉल संघासाठी एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. या स्पर्धेची स्थापना १९६५ साली झाली.


२९ जुलै रोजी ‘आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस’ साजरा
दरवर्षी २९ जुलै रोजी ‘आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस’ साजरा केला जातो. यावर्षी सातवा वार्षिक आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस साजरा करण्यात आला.

जगभरात, मुख्यत: आशिया खंडात, वाघांच्या केवळ काही हजार प्रजाती आढळून येत आहेत. फक्त शंभर वर्षांत जगभरातून ९०% वन्य वाघ लोप पावले आहेत. आता जवळपास ३००० पेक्षा जास्त वाघ जंगलांत राहतात आणि बर्‍याच वाघांच्या प्रजाती आधीच नामशेष झालेल्या आहेत.

अनेक देशात खिताब आणि औषधी उद्देशाने वाघाच्या शारीरिक अवयवांची मागणी वाढली असल्याने त्यांची तस्करी केली जाते. अश्या गंभीर समस्येला हाताळण्यासाठी, WWF तर्फे वनांच्या रेंजर्समध्ये गुंतवणूकीच्या माध्यमातून ‘डबल टायगर्स’ अभियान सुरू केले गेले आहे. 

भारतात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) उभारण्यात आले आहे. 

शाश्वत विकासासाठी २०३० कार्यसूचीच्या समर्थनार्थ वन्यजीव क्षेत्रात होणार्‍या बेकायदेशीर व्यापाराविरोधात निर्णायक कारवाई करणे आवश्यक असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने स्पष्ट केले आहे.

२०१० साली सेंट पीटर्सबर्ग टायगर समिट परिषदेत ‘आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस’ याची सुरुवात करण्यात आली. या दिवशी आंतरराष्ट्रीय पातळीवर वाघांच्या अधिवासाचे संरक्षण आणि वाघांच्या संवर्धनामधील समस्या याविषयी जनजागृती आणि समर्थन वाढवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.



पाकिस्तानच्या पंतप्रधान पदासाठी शाहबाझ शरीफ नामनिर्देशीत
नवाज शरीफ यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) पक्षाकडून शेहबाज शरीफ यांचे नामांकन दिले गेले. 

शेहबाज शरीफ हे नवाज शरीफ यांचे बंधु आहेत. ते सध्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री आहेत. २०१३ साली राज्याच्या विधानसभेत निवडून आल्यानंतर त्यांनी तिसऱ्यांदा पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला आहे.

तत्पूर्वी पाकिस्तानच्या सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज) पक्षाने देशाचे अंतरिम पंतप्रधान म्हणून शाहिद खाकन अब्बासी यांची निवड केली आहे. 
अब्बासी हे सध्या पेट्रोलियम व नैसर्गिक संसाधन मंत्री आहेत



उत्तर कोरियाने आंतरखंडीय लक्ष्यभेदी क्षेपणास्त्राची चाचणी घेतली
उत्तर कोरियाने २८ जुलै २०१७ रोजी ‘ताईपेदोंग-२’ या आंतरखंडीय लक्ष्यभेदी क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. ‘ताईपेदोंग-२’ हे लांब पल्ल्याचे आंतरखंडीय लक्ष्यभेदी क्षेपणास्त्र (ICBM) आहे आणि सैद्धांतिकदृष्ट्या १०४०० किलोमीटर अंतरावर मारा करू शकण्यास सक्षम आहे.

क्षेपणास्त्र देशाच्या जगॅंग प्रांतातून सोडण्यात आले आणि ते पूर्व समुद्रात उतरले. यापूर्वीच ४ जुलैला उत्तर कोरियाने ‘हाऊसोंग-१४’ क्षेपणास्त्राची प्रथम चाचणी घेतली होती.